टोक्यो येथे झालेल्या गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने वैयक्तिक क्रीडा प्रकारातील सहा आणि हॉकी संघाचे कांस्यपदक अशी सात पदके मिळवली होती. यात भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाचाही समावेश होता. ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. टोक्योतील सहा वैयक्तिक पदकविजेत्यांपैकी चार आणि पुरुष हॉकी संघ यंदा पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्येही सहभागी होणार आहेत. लंडनमधील सहा पदकांची संख्या टोक्योत सात झाली. आता पॅरिसमध्ये ती किती होणार याबद्दलचे कुतूहल वाढू लागले आहे. या वेळी पदकांच्या शर्यतीत राहू शकणाऱ्या खेळाडूंबाबत…

ॲथलेटिक्समध्ये पदकाच्या अपेक्षा किती?

ॲथलेटिक्स स्पर्धा या ऑलिम्पिकचे आकर्षण असतात. ऑलिम्पिकमध्ये भारताला या क्रीडा प्रकारात कधीच पदक नव्हते. ती उणीव नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दूर केली. भालाफेक प्रकारात त्याने सुवर्णपदक मिळवून इतिहास घडवला. भालाफेकीत नीरजला ९० मीटरचा पल्ला गाठता आला नसला, तरी सातत्याने त्याने ८७ ते ८९ मीटरपर्यंत फेक केली आहे. या वेळीही तो पदकाच्या शर्यतीत असेल. मात्र, त्याला खांद्याच्या स्नायूच्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अन्य प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तंदुरुस्ती हेच नीरजसमोर आव्हान असेल. धावण्याच्या शर्यतीत भारताचे धावपटू खूप मागे आहेत. मात्र, यंदा अविनाश साबळे मोठ्या आत्मविश्वासाने सहभागी होत आहे. परदेशातील सराव आणि ऑलिम्पिकपूर्वी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये स्वतःच नवव्यांदा मोडलेल्या राष्ट्रीय विक्रमाने आशा उंचावल्या आहेत. आशियाई स्पर्धेत केनियाच्या धावपटूंवर राखलेले वर्चस्वही त्याला प्रेरणा देणारे ठरेल. पुरुषांचा रिले संघ जिद्दीने उतरला तर अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकेल.

world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
56 year old police officer vishnu tamhane won iron man competition in australia
कौतुकास्पद : ५६ व्या वर्षी विष्णु ताम्हाणे या पोलिस अधिकाऱ्याने ऑस्ट्रेलियातील आयर्न मॅन स्पर्धा जिंकली
Rohit Sharma on Mohammed Shami Fitness and Comeback in Team for last 3 Test Against Australia
IND vs AUS: मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, दुसऱ्या कसोटी पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
anmol kharb
अनमोल, सतीशसह अश्विनी-तनिषा अंतिम फेरीत

हे ही वाचा… समुद्राखाली १३ हजार फुटांवर सापडलेल्या ‘डार्क ऑक्सिजन’ने शास्त्रज्ञही हैराण; काय आहे त्यामागचे रहस्य?

मीराबाई चानूला कितपत संधी?

वेटलिफ्टिंगमध्ये भारताची मीराबाई चानू ही एकमेव खेळाडू पात्र ठरली आहे. टोक्योत मीराबाईने रौप्यपदक मिळवले होते. या वेळी तिला पदकाच्या शर्यतीत राहायचे असेल, तर २०० ते २१० किलोपेक्षा अधिक वजन उचलावे लागेल. अर्थात, यापूर्वी चार वेळा तिने ही मजल मारली आहे. मात्र, २०२३ नंतर ती केवळ तीन स्पर्धांत सहभागी झाली. मनगट, खांदा आणि कंबरेच्या दुखापतीमुळे तिला केवळ सरावावरच भर द्यावा लागला. स्नॅचमध्ये ९० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण २०५ किलो वजनाचे लक्ष्य तिने ठेवले आहे. यात ती यशस्वी झाली तरच सलग दुसऱ्या स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत राहू शकते.

सिंधूकडून पदकाची अपेक्षा?

तारांकित बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची गेल्या काही काळातील कामगिरी बघितल्यास या वेळी तिच्या पदकाची खात्री देता येत नाही. मात्र, दोन ऑलिम्पिक पदकांचा अनुभव आणि मोठ्या स्पर्धेची खेळाडू, तसेच यशाची टक्केवारी बघितली, तर सिंधू नक्कीच पदकापर्यंच पोहचू शकते. अशातच सिंधूला ‘ड्रॉ’देखील अनुकूल मिळाल्यामुळे बाद फेरीपर्यंतचा तिचा मार्ग सुकर आहे. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन पात्र ठरले असले, तरी त्यांच्यासमोर तगड्या खेळाडूंचे आव्हान अधिक आहे. बॅडमिंटनमध्ये पदकाची खात्री सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या दुहेरीच्या जोडीकडून बाळगता येईल.

हे ही वाचा… बांगलादेशच्या मोंगला बंदर टर्मिनलवर आता भारताचा अधिकार, चीनच्या प्रयत्नांना अपयश; हा करार भारतासाठी किती महत्त्वाचा?

कुस्तीमध्ये किती पदके अपेक्षित?

सुशील कुमारने कांस्यपदक मिळवल्यापासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकतरी पदक मिळवले आहे. या वेळी ही मालिका खंडित होण्याची भीती आहे. अंतर्गत संघर्षांमुळे भारतीय मल्ल सराव आणि महत्त्वाच्या स्पर्धांपासून दूर राहिले. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सहा मल्लांमध्ये पाच महिला कुस्तीगीर आहेत. पुरुषांमध्ये अमन सेहरावत हा एकमेव मल्ल असला, तरी त्याला तगडे आव्हान राहणार आहे. महिला विभागात अंतिम पंघालला ५३ किलो वजनी गटात खूप चांगली संधी आहे. तिला चौथे मानांकनही मिळाले आहे. त्यामुळे पदकाच्या लढतीपर्यंत तिच्यासमोर अवघड आव्हान नसेल. अंतिमपाठोपाठ विनेश फोगट ही नावाजलेली कुस्तीगीर संघात आहे. या वेळी ती नेहमीच्या ५३ किलोऐवजी ५० किलो वजनी गटातून खेळणार आहे. तिला मानांकन नसले, तरी अनुभव हीच तिची ताकद राहील.

बॉक्सिंगमध्ये निकहत चमक दाखवणार?

टोक्योत लवलिना बोरगोहेन कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. लवलिनाने ७५ किलो वजनी गटात ही कामगिरी केली होती. मात्र, या वेळी लवलिना ६९ किलो वजनी गटातून खेळणार आहे. तिच्यासमोर तंदुरुस्तीचे खरे आव्हान असेल. बॉक्सिंगमध्ये या वेळी निकहत झरीनकडून सर्वाधिक अपेक्षा बाळगण्यात येत आहेत. दोन वेळची जगज्जेती राहिलेल्या निकहतच्या कामगिरीतील सातत्य वाखणण्याजोगे असून, सर्वोत्तम तंत्र ही तिची खरी ताकद आहे. केवळ अपेक्षांचे ओझे आणि ऑलिम्पिकचे दडपण तिच्या कामगिरीवर परिणाम करू शकते.

हे ही वाचा… विश्लेषण :’इंडेक्सेशन’विना जुन्या, वडिलोपार्जित घराच्या विक्रीवर अधिक कर भरावा लागेल? अर्थसंकल्पातील ही तरतूद वादग्रस्त कशी?

नेमबाज सर्वाधिक पदके मिळवणार?

या वेळी नेमबाजीतील २७ प्रकारांसाठी भारताचे सर्वाधिक २१ नेमबाज पात्र ठरले आहेत. नेमबाजीत चीननंतर भारताचा सर्वांत मोठा संघ आहे. मनू भाकर, स्वप्निल कुसळे, अनिश भानवाला, रिदम सांगवान, ऐश्वर्य प्रतापसिंह तोमर, सिफ्त कौर सामरा असे आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले तगडे नेमबाज भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक संधी सिफ्त कौरला मानली जात आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील जागतिक विक्रम तिच्या नावावर असून, महत्त्वाच्या क्षणी दडपणाचा सामना करण्यात ती सक्षम आहे.

भारतीय हॉकी संघ पदक राखू शकेल?

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने पदकांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सोडल्यास भारताची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल या संघात राखला गेला असून, गोलपोस्टमध्ये पी. आर. श्रीजेश ही भारताची मोठी ताकद असणार आहे. हरमनप्रीत सिंगही पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात सरस ठरत आहे. त्यामुळे कामगिरीत सातत्य राखल्यास भारताला पदकाची निश्चित संधी आहे.

हे ही वाचा… केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कौतुक केलेला ‘बर्तन बँक’ हा उपक्रम नेमका काय आहे?

अन्य किती खेळांत भारतीय खेळाडू?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंतचे भारताचे सर्वांत मोठे पथक असेल. शंभरहून अधिक खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. सेलिंग, अश्वारोहण, टेबल टेनिस, टेनिस, तिरंदाजी, जलतरण, ज्युडो अशा विविध स्पर्धा प्रकारात भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेचे दडपण, अपेक्षांचे ओझे अशा आव्हानांवर मात करून हे खेळाडू आपला मार्ग आखणार आहेत. त्यांची कामगिरी भारताचा ऑलिम्पिक गौरव उंचावणारी ठरेल अशी आशा नक्कीच बाळगली जाऊ शकते.

Story img Loader