पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (१७ डिसेंबर) वाराणसीच्या नमो घाट येथे काशी तमिळ संगमचे उद्घाटन केले. गेल्या वर्षी तमिळ संगमचे प्रथम आयोजन करण्यात आले होते, या माध्यमातून उत्तर आणि दक्षिण भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध साजरे करण्याचा प्रयत्न केला जातो. “तमिळनाडूहून काशीला येणे म्हणजे महादेवाच्या एका घरातून दुसऱ्या घरी येणे होय. तमिळनाडूहून काशीला येणे म्हणजे मदुराई मीनाक्षीकडून काशी विशालाक्षीच्या ठिकाणी येणे होय, असे पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणात सांगितले. याच निमित्ताने काशी आणि तमिळकम यांच्यातील प्राचीन संबंध समजून घेणे क्रमप्राप्त ठरते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 पौराणिक संबंध 

१५ व्या शतकात मदुराईच्या आसपासच्या प्रदेशाचा राजा पराक्रम पांड्या याला भगवान शिवाला समर्पित भव्य मंदिर बांधायचे होते. या संदर्भातील आख्यायिकेनुसार मंदिरासाठी आवश्यक शिवलिंग आणण्यासाठी त्याने काशीपर्यंत प्रवास केला होता. शिवलिंग घेवून परतत असताना तो एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. त्याने आपला प्रवास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवलिंग घेऊन जाणाऱ्या गायीने जागेवरून हलण्यास नकार दिला. पराक्रम पांड्याला ही परमेश्वराची इच्छा वाटली आणि त्यांनी तिथेच शिवकाशी म्हणून ओळखले जाणारे शिवलिंग स्थापित केले. जे भक्त काशीला भेट देऊ शकत नव्हते त्यांच्यासाठी पांड्यांनी काशी विश्वनाथर मंदिर देखील बांधले, जे आज तामिळनाडूमध्ये तेनकासी येथे आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील (BHU) प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे डॉ. विनय कुमार सांगतात, काशी आणि तमिळ प्रदेश यांच्यातील संबंध खोल आणि जुने आहेत. पराक्रम पांड्या नंतर कालांतराने, दुसरा राजा, अधिवीर राम पांड्या याने काशीला तीर्थयात्रा करून परतल्यानंतर, १९ व्या शतकात तेनकासी येथे दुसरे शिव मंदिर बांधले, याशिवाय, थुथुकुडी जिल्ह्यातील संत कुमार गुरुपारा यांनी वाराणसीतील केदारघाट आणि विश्वेश्वरलिंगमच्या अभिषेकासाठी जागा मिळवण्यासाठी काशी संस्थानाशी बोलणी केली होती. त्यांनी काशी कलंबगम हा काशीवरील व्याकरण कवितांचा संग्रह देखील रचला.

अधिक वाचा: Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

काशी- तमिळ संगम

या वर्षी, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील सुमारे १,४०० मान्यवर कार्यक्रमासाठी वाराणसीला भेट देतील, अनेक सांस्कृतिक देवाणघेवाण आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेतील, तमिळनाडू आणि वाराणसीमधील कला, संगीत, हातमाग, हस्तकला, ​​पाककृती आणि इतर विशिष्ट उत्पादनांचे प्रदर्शन करतील. तमिळ शिष्टमंडळाची पहिली तुकडी, ज्यामध्ये तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ती १५ दिवसांच्या संगममध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी वाराणसीला पोहोचली. शिक्षक, व्यावसायिक, अध्यात्मिक नेते, शेतकरी आणि कारागीर, लेखक, व्यापारी यांचा समावेश असलेले आणखी सहा गटही शहरात येणार आहेत. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमात, तमिळनाडूतील सुमारे २,४०० लोकांना आठ दिवसांच्या भेटींसाठी वेगवेगळया गटांमध्ये वाराणसीला नेण्यात आले होते. यामागे दोन प्रमुख उद्दिष्ट आहेत “सांस्कृतिक परंपरांचा (उत्तर आणि दक्षिणेकडील) संवाद, समान वारशाची समज निर्माण करणे आणि या दोन प्रदेशांमधील लोकांचे बंध अधिक दृढ करणे,” असे शिक्षण मंत्रालयाकडून नोंदविण्यात आले होते. 

काशी विश्वनाथ आणि तमिळ प्रदेश

संगमचा प्रस्ताव मांडणाऱ्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ ‘चमु कृष्ण शास्त्री’ यांनी २०२२ मध्ये सांगितले होते की, प्राचीन काळापासून दक्षिण भारतातील उच्च शिक्षण विद्वानांच्या काशी भेटीशिवाय पूर्ण मानले जात नव्हते. “ज्ञानाची दोन केंद्रे (काशी आणि कांची) यांच्यातील संबंध साहित्यातील समान विषय  आणि तामिळनाडूतील प्रत्येक गावात काशी नावाच्या उपस्थितीत दिसून येतो”. “काशिनाथ हे तमिळनाडूतील लोकप्रिय नाव आहे.”तेनकासी येथील काशी विश्वनाथर मंदिराव्यतिरिक्त, काशी नावाची शेकडो शिव मंदिरे तमिळनाडूमध्ये आहेत. त्यापैकी सुमारे १८ एकट्या चेन्नईच्या आसपासच्या परिसरात आहेत,असे शास्त्री म्हणाले. “रामेश्वरमचे लोक दर्शनासाठी काशीला जाण्यापूर्वी कोटीतीर्थात (मंदिरात) स्नान करायचे; आणि ते रामेश्वरमच्या मंदिरात अभिषेकासाठी काशीहून (गंगा) पाणी परत आणायचे. काशी आणि रामेश्वरम दरम्यान प्रवास करण्यासाठी सहा महिने लागत असत,” असेही त्यांनी नमूद केले. शास्त्री यांनी केळी, कांचीपुरममधील रेशीम साड्या, कापड, वास्तू, पाककला आणि इतर प्रकारच्या संबंधांचा देखील उल्लेख केला होता. “आम्ही नुकताच शोध आणि संबंध पुन्हा जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे,”असेही त्यांनी नमूद केले होते. 

अधिक वाचा: Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

याशिवाय आध्यात्म रामायणात उत्तर आणि दक्षिण यांच्यात दुवा साधणारा संदर्भ आढळतो, रामाने धनुष्यकोटीला शिवलिंग तयार केले आणि वर दिला, या वरानुसार येथील  समुद्राचे जल नेऊन त्याचा अभिषेक काशी विश्वेश्वराला केला, आणि  कावडीने गंगेचे पाणी आणून त्याचा अभिषेक इथे केला तर याच जन्मात मुक्ती मिळते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of kashi tamil sangamam by pm modi what is the ancient connection between kashi and tamil land svs
Show comments