– राखी चव्हाण
हिंदी महासागर क्षेत्रीय समुद्रांवरील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे अलीकडेच एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. भविष्यातील मोसमी पाऊस आणि चक्रीवादळासह सागरी जीवनावर त्याचा वाईट परिणाम होणार असल्याचा इशारा या अभ्यासात देण्यात आला आहे. एकीकडे ‘आयपीसीसी’च्या (आंतरसरकारी वातावरण बदल मंडळ) अहवालात वातावरण बदलामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा इशारा तर दुसरीकडे पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील हा नवीन अभ्यास. या पार्श्वभूमीवर तापमानवाढीचे संकट भारतावरच नाही तर जगभरावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
भारतातील वातावरणात बदलामागची कारणे?
भारतातील वातावरण सातत्याने बदलत आहे कारण अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत आहे. वातावरणात आर्द्रता वाढत असल्यामुळे पावसाचे ढग जास्त वेळ आर्द्रता रोखू शकत नाही आणि कमी वेळात पाऊस होतो. याचा परिणाम म्हणजे दुष्काळ पडत असून उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्यात देखील पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत असल्याने उन्हाळ्यासोबतच हिवाळ्यातही दिवसाचे तापमान वाढत आहे. मात्र, त्याच वेळी रात्रीचे तापमान कमी होत आहे.
शहरांमधील तापमानवाढीची कारणे कोणती?
भारतातल्या शहरांमध्ये विविध बांधकामांमुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठे बदल झाले आहेत. शहरांभोवतीची आणि शहरांमधली मोठी झाडे या बांधकांमांमुळे नष्ट झाली आहेत. त्याचवेळी डांबरी, सिमेंटचे रस्ते आणि काँक्रीटच्या इमारती, असे शहरांचे नवे रूप तयार झाले. उन्हाळ्यात एसीचा वापर सुरू झाल्यामुळे पुन्हा इमारतीतील उष्ण हवेला आधीच तापलेल्या बाहेरच्या हवेत सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्याद्वारे निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडमुळे तापमानात वाढ होत आहे. तसेच ओझोन पडद्याला जागोजागी छिद्रे पडत चालल्यामुळे त्यातून येणाऱ्या अतिनील किंवा अल्ट्राव्हायलेट किरणांमुळे तापमानात वाढ होत आहे.
तापमानवाढीचे परिणाम कोणते?
तापमानवाढीचा परिणाम मान्सूनवर देखील होत आहे. २००२ पर्यंत माेसमी पाऊस कमी होत गेला. २००२ नंतर पावसाच्या प्रमाणात घट झाली नसली तरीही पावसाचे दिवस कमी होत आहेत. जमीन आणि शेतीसाठी सात सेंटीमीटरपेक्षा कमी पावसाचे दिवस फायदेशीर असतात. आता सात सेंटीमीटरपेक्षा जास्त दैनंदिन प्रमाण असलेल्या पावसाच्या दिवसांत वाढ होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होत आहे. शेती करणे कठीण होणार असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे लोकांचे पलायन वाढेल आणि पूर वादळामुळे मृत्युमुखी पडणार लोकांची संख्याही वाढेल.
तापमानवाढ कशी रोखता येईल?
वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय योजावे लागतील. यातील एक उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याचे कार्बन डाय-ऑक्साइडचे वातावरणातील प्रमाण थोपवायचे तर त्याची निर्मिती कमी करणे आवश्यक आहे. जंगलाखालील भूमी सध्याच्या तीन ते पाच पट वाढवायला हवी. त्यासाठी झाडांची संख्या वाढवणे गरजेचे असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून वृक्षतोडीला आळा घालावा लागेल. याशिवाय खासगी वाहनांचा वापर कमी करावा लागेल. सौर ऊर्जेवर अधिकाधिक जोर द्यावा लागणार आहे. तसेच वाढते सिमेंटीकरण कमी करून त्यावर पर्याय शोधावा लागेल. हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर कर लावणे हा देखील उपाय आहे.
rakhi.chavhan@expressindia.com