IND vs NZ Hardik Pandya Lead T20: टीम इंडिया आज न्यूझीलंडच्या विरुद्ध टी २० सामन्यासाठी मैदानात उतरली आहे. न्यूझीलंड विरुद्ध दौऱ्यात टीम इंडियामध्ये सर्वात महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. संघाच्या कर्णधार पदापासून ते मुख्य प्रशिक्षकाच्या नेतृत्वासाठीही नवे चेहरे समोर आले आहे. तीन सामन्यांच्या टी २० व एकदिवसीय मालिकांमध्ये हार्दिक पांड्याला टी २० संघाचे तर शिखर धवन याला एकदिवसीय सामन्यांच्या संघांचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या ऐवजी माजी खेळाडू व भारतीय क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज व्ही व्ही एस लक्ष्मणवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राहुल द्रविड याला ब्रेक देण्यामागे टी २० विश्वासचषकातील अपयश कारण नसल्याचे बीसीसीआयकडून पूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते. मात्र टीम इंडियाच्या अनेक आजी माजी खेळाडूंकडून या बदलावर प्रश्न करण्यात आले आहेत. माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुद्धा राहुल द्रविडला सतत ब्रेक का हवा असतो असा सवाल करत, या विश्रांतीच्या ब्रेकमुळेच संघात खेळाडू व प्रशिक्षक यांचा ताळमेळ दिसत नाही असा अप्रत्यक्ष दावा केला होता.

दुसरीकडे राहुल द्रविडच्या ऐवजी व्हीव्हीएस लक्ष्मण यांना संधी देण्यावरूनही अनेकांनी प्रश्न केले आहेत. यावर तूर्तास उपलब्ध माहितीनुसार, व्ही व्ही एस लक्ष्मण यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी कायमस्वरूपी नसणार आहे, असे दिसत आहे. टी २० विश्वचषकानंतर राहुल द्रविड, विराट कोहली, के. एल. राहुल, रोहित शर्मा यांना केवळ विश्रांतीसाठी वेळ देण्यात आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात या खेळाडूंच्या ऐवजी तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे, या दौऱ्यातील कामगिरी पाहता काही खेळाडूंना पुढील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांमध्येही संधी दिली जाऊ शकते.

बीसीसीआयच्या माहितीनुसार व्ही व्ही एस लक्ष्मण केवळ ६ सामन्यांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील आणि पुढील महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी मधील आपले काम सुरू ठेवतील. बांगलादेश दौऱ्यासाठी द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून परतणार आहे.

हे ही वाचा >> विश्लेषण : पैसा, संघाचा समोतल की अन्य काही, IPL मध्ये फ्रँचायझी खेळाडूंना संघमुक्त का करतात?

दरम्यान, यापूर्वी लक्ष्मण पहिल्यांदा जूनमध्ये आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी परतण्यापूर्वी त्यांनी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संघाचे प्रशिक्षकपद भूषवले. आशिया चषकासाठी ते संघासह दुबईला सुद्धा गेले होते. सुदैवाने राहुल द्रविड वेळेत कोविडमधून बरा झाल्याने पहिल्या सामन्यापूर्वी लक्ष्मण मायदेशी परतले होते.

पीटीआयच्या माहितीनुसार, लक्ष्मण यांच्यासोबत हृषिकेश कानिटकर आणि साईराज बहुतुले हे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. बाहुतुले यांनी द्रविडसोबतही काम केले आहे. आज भारताचा पहिला टी २० सामना रंगणार आहे तर यापुढील सामने अनुक्रमाने २० व २२ नोव्हेंबरला असणार आहेत. एकदिवसीय सामने २५ , २७ आणि ३० नोव्हेंबरला पार पडतील.

Story img Loader