-ज्ञानेश भुरे
भारताने रंगतदार लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गडी आणि दोन चेंडू राखून पराभव करत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची विजयी सुरुवात केली. गोलंदाजी आणि फलंदाजीच्या आघाडीवर जबरदस्त चुरस दिसून आली. भुवनेश्वर कुमारसह भारताच्या वेगवान गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र, यावर अडचणीच्या क्षणी रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी बढती देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरला. हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू यशासह अन्य काही क्षणही भारतासाठी उपयुक्त ठरले.
जडेजाला चौथ्या क्रमांकावर बढती…
१४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर भारताची अडखळती सुरुवात झाली होती. ‘पॉवर-प्ले’च्या षटकांत भारताच्या खात्यावर ३८ धावाच होत्या. मग रोहित शर्मा बाद झाला, तेव्हा फलंदाजीला सुर्यकुमार यादव येणे अपेक्षित होते. मात्र, पाकिस्तानकडून लेग-स्पिनर शादाब खान व डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाज चांगला मारा करत असल्याने भारताने डावखुऱ्या रवींद्र जडेजाला फलंदाजीला पाठविण्याचा धोका पत्करला आणि तो यशस्वी झाला. डाव्या आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज आल्यावर गोलंदाजांची लय जाणार ही शक्यता गृहित धरण्यात आली आणि ती खरी ठरली. त्याचबरोबर धावफलक हलता ठेवण्याची जडेजाकडे क्षमता होती. ती त्याने सिद्ध करून दाखवली. त्याने २९ चेंडूत ३५ धावांची खेळी केली.
जडेजा-हार्दिकची निर्णायक भागीदारी…
सहा चेंडूंच्या अंतराने रोहित शर्मा, विराट कोहली बाद झाले. त्यानंतर सुर्यकुमार यादवचीही एकाग्रता ढळली. भारताला ३४ चेंडूंत ५९ धावांची आवश्यकता असताना हार्दिक पंड्या खेळपट्टीवर उतरला. मोठ्या फटक्यांची घाई न करता जडेजा-हार्दिक जोडीने कमालीची संयमी भागीदारी केली. या जोडीने ५२ धावा केल्या. ही भागीदारी निश्चितच भारताचा विजय सुकर करणारी ठरली. हार्दिकने अष्टपैलू खेळ करताना तीन बळी घेतले आणि १७ चेंडूत नाबाद ३३ धावांची खेळी केली.
भारतीय वेगवान गोलंदाजांची अचूकता…
भारतीय संघात प्रमुख वेगवान गोलंदाज नसतानाही पाकिस्तानचे दहाही फलंदाज भारताच्या वेगवान गोलंदाजांनी बाद केले. प्रथमच प्रतिस्पर्धी संघाचे सर्व गडी बाद करण्याची कामगिरी भारतीय वेगवान गोलंदाजांनी केली. यातही भुवनेश्वर कुमारची अचूकता महत्त्वाची ठरली. हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, आवेश खान यांनी त्याला उत्तम साथ दिली. विशेष म्हणजे खेळपट्टीवर असणाऱ्या उसळीचा भुवनेश्वर आणि हार्दिकने चांगला उपयोग करून घेतला. रिझवान आणि फखर झमान यांची जमत आलेली जोडी आवेश खानने फोडली.
बाबर आझम झटपट माघारी…
भारताविरुद्ध बाबर आझम नेहमीच चांगला खेळला आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताला त्याला बाद करता आले नव्हते. तो जबरदस्त लयीत होता. अशा वेळी त्याला झटपट टिपणे भारताच्या पथ्यावर पडले. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण आले. त्याला १० धावांवर भुवनेश्वरने बाद केले.
अखेरच्या तीन षटकांमधील चुरस…
संपूर्ण सामन्यात अखेरची तीन षटके महत्त्वाची ठरली. पाकिस्तान अडचणीत असताना शादाब खान-शहनवाझ डहानी यांनी अखेरच्या तीन षटकांत ३३ धावा केल्या. याच धावा निर्णायक ठरणार असे वाटत असतानाच जडेजा, हार्दिक आणि दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या तीन षटकांत आवश्यक ३२ धावांचे आव्हान पार केले. भारताला अखेरच्या दोन षटकात २१ धावा हव्या होत्या. पण १९व्या षटकात हार्दिकने तीन चौकार मारून सामान्यवरील पकड घट्ट केली. मग अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना हार्दिकनेच विजयी षटकार खेचला.