उद्या गुरुवारी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आहे. त्याबरोबरच आज १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. ब्रिटिशांच्या कचाट्यातून सुटल्यावर स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले. एकाच वेळी स्वतंत्र होऊनही या दोन्ही देशांचे स्वातंत्र्य दिन मात्र वेगवेगळे आहेत. भारताच्या एक दिवस आधी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन येतो. मात्र, असे का ते पाहूयात.
हेही वाचा : पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी ISI प्रमुखाचे कोर्ट मार्शल; कोण आहेत फैज हमीद? नेमके प्रकरण काय?
इतिहास काय सांगतो?
ब्रिटिशांनी १८ जुलै १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, १९४७ संमत केला. या कायद्यान्वये भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांचा उदय झाला. या कायद्यान्वये, “पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून भारतीय भूमीवर दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यांची नावे भारत आणि पाकिस्तान अशी असतील,” असे स्पष्ट करण्यात आले. १५ ऑगस्ट हाच पाकिस्तानचाही स्वातंत्र्य दिन होता. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी रेडिओवरून पाकिस्तानला उद्देशून केलेल्या ऐतिहासिक भाषणामध्येही याचा उल्लेख आहे. त्यांनी म्हटले होते, “१५ ऑगस्ट हा स्वतंत्र आणि सार्वभौम अशा पाकिस्तान या नव्या राष्ट्राचा जन्मदिन आहे. या माध्यमातून स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचे स्वप्न साकार झाले आहे. स्वत:च्या मातृभूमीसाठी काही वर्षांपासून सुरू असलेल्या त्यागाची ही परिपूर्ती आहे.” २०१८ साली ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’शी बोलताना वरिष्ठ पाकिस्तानी पत्रकार शहिदा काझी यांनी म्हटले होते, “जर आपण कोणत्याही प्रकारचा तर्क वापरून थोडा विचार केला, तर असे जाणवेल की, १५ ऑगस्ट हाच तो दिवस आहे, ज्या दिवशी आम्ही (पाकिस्तान) आमचा स्वातंत्र्य दिन साजरा करायला हवा.”
‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या माहितीनुसार, जिना आणि पाकिस्तानच्या मंत्रिमंडळानेही १५ ऑगस्ट १९४७ च्या सकाळीच आपल्या पदाची शपथ घेतली होती. पाकिस्तानचे पहिले स्मारक टपाल तिकीट जुलै १९४८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावरही १५ ऑगस्ट १९४७ अशीच पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची तारीख नोंदवलेली आहे. विशेष म्हणजे मुस्लिमांसाठीही १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस फारच पवित्र होता. कारण- तो पवित्र रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार होता. ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांनी आपल्या १९६७ च्या ‘द इमर्जन्स ऑफ पाकिस्तान’ या पुस्तकामध्ये लिहिले आहे, “१५ ऑगस्ट १९४७ हा रमजान-उल-मुबारकचा शेवटचा शुक्रवार होता. हा इस्लाममधील एक पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी कायदे-ए-आझम (जिना) पाकिस्तानचे गव्हर्नर-जनरल झाले आणि मंत्रिमंडळाने शपथ घेतली. पाकिस्तानचा नवा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. जगाच्या नकाशावर पाकिस्तान हा देश उदयास आला.”
१४ ऑगस्ट १९४७ रोजी काय घडले?
१४ ऑगस्ट १९४७ रोजी व्हॉईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी पाकिस्तानच्या संविधान सभेमध्ये भाषण केले. ते १५ ऑगस्टच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तानकडे सत्तेचे हस्तांतर करणार होते. मात्र, माउंटबॅटन यांना एकाच वेळी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहता येणे शक्य नव्हते. माऊंटबॅटन यांनी १४ ऑगस्ट रोजी सर्वांत आधी कराची येथे जाऊन पाकिस्तानकडे सत्तेचे हस्तांतर केले आणि त्यानंतर मग ते दिल्लीच्या दिशेने निघाले. प्रसिद्ध पाकिस्तानी इतिहासकार खुर्शीद कमाल अझीझ यांनी त्यांच्या ‘मर्डर ऑफ हिस्ट्री’ या पुस्तकात लिहिले आहे, “ब्रिटिश राजाचे भारतातील एकमेव प्रतिनिधी असलेल्या व्हाईसरॉय माउंटबॅटन यांना वैयक्तिकरीत्या जाऊन दोन नव्या देशांमध्ये सत्तेचे हस्तांतर करावे लागले. ते एकाच क्षणी कराची आणि नवी दिल्लीमध्ये उपस्थित असू शकणार नव्हते. तसेच १५ ऑगस्टच्या सकाळी भारताकडे सत्ता हस्तांतरित करून ते कराचीलाही जाऊ शकणार नव्हते. कारण- भारताला सत्ता दिल्यानंतर ते नव्या भारतीय अधिराज्याचे गव्हर्नर जनरल झालेले असणार होते. त्यामुळे सत्तेच्या हस्तांतरासाठी एकच व्यवहार्य गोष्ट उरली होती आणि ती म्हणजे १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानला सत्तेचे हस्तांतर करणे. या प्रक्रियेच्या वेळीही ते भारताचे व्हॉईसरॉय असणारच होते. मात्र, त्याचा अर्थ पाकिस्तानला १४ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले, असे होत नाही. कारण- भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने अशी तरतूद केलेली नव्हती.”
हेही वाचा : 1971: बांगलादेश मुक्तीसंग्रामातील पाकिस्तानच्या आत्मसमर्पण पुतळ्याची तोडफोड? काय आहे या पुतळ्याचे महत्त्व?
तारीख का बदलली?
भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही आपला स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्टलाच साजरा करायला हवा. मात्र, १९४८ साली पाकिस्तानने आपला स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट रोजी साजरा केला. हे असे का करण्यात आले, यामागेही अनेक प्रवाद सांगितले जातात. ‘इंडिया टुडे’च्या माहितीनुसार, पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या आधी स्वातंत्र्य दिन साजरा करायचा होता. जून १९४८ च्या अखेरीस पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या गटाने एक बैठक बोलावली. या बैठकीमध्ये पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन एक दिवस आधी निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट करण्याच्या प्रस्तावाला जिना यांनी मंजुरी दिल्याचे ऐतिहासिक नोंदींमध्ये म्हटले आहे. मात्र, सर्व जण हे मान्य करीत नाहीत. ‘जिना : मिथ अॅण्ड रिॲलिटी’चे लेखक यासर लतीफ हमदानी यांनी २०१३ मध्ये पीटीआयला सांगितले की, जिना स्वातंत्र्य दिनाची तारीख बदलू शकत नव्हते. कारण- ते ऑगस्ट १९४८ च्या आधीपासूनच मृत्युशय्येवर होते. मात्र, हमदानी यांनी तारीख बदलण्याचे समर्थन केले आणि म्हटले की, पाकिस्तान हे एक नवीन राष्ट्र असल्याने त्याला आपली ओळख तयार करण्याची गरज होती. पत्रकार काझी यांनी एक्स्प्रेस ट्रिब्यूनला सांगितले, “आमच्या (पाकिस्तान) नेत्यांनी १४ तारखेला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय का घेतला. यामागे अर्थातच पूर्णपणे वेगळी कहाणी आहे. भारतापेक्षा वेगळ्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन असावा, अशी कदाचित त्यांची इच्छा असावी.”
१९४८ पासूनच पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करीत आला आहे.