भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध दृढ व्हावेत, व्यापार वृद्धिंगत व्हावा यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केले जात आहे. नुकतेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील जलवाहतुकीचे उद्घाटन करण्यात आले आहे. तमिळनाडूमधील नागापट्टीणम ते उत्तर श्रीलंकेतील जाफना येथील कानकेसंथुराई असा हा जलमार्ग असेल. याच पार्श्वभूमीवर या जलमार्गाचे महत्त्व काय? याआधी भारत आणि श्रीलंका यांच्यात व्यापार, पर्यटन, तसेच अन्य बाबी वृद्धिंगत होण्यासाठी काय प्रयत्न करण्यात आले? हे जाणून घेऊ या…

दोन्ही देशांना वेगवेगळ्या पातळ्यांवर होणार फायदा

भारत आणि श्रीलंका या दोन देशांतील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत व्हावेत, दोन्ही देशांच्या पर्यटनाला चालना मिळावी, या देशांतील लोकांचे एकमेकांशी चांगले संबंध निर्माण व्हावेत यासाठी ही जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जलवाहतुकीमुळे दोन्ही देशांतील स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
migratory birds arrived at mumbai bay
विदेशी पाहुण्यांचा मुंबई खाडीकिनारी विहार
msrdc new Mahabaleshwar project
नवीन महाबळेश्वरला केवळ १०० सूचना-हरकती, आराखड्यावर सूचना-हरकती नोंदविण्यासाठी अखेरचे ४ दिवस
Australian fast bowler Josh Hazlewood statement about the Indian team sport news
दमदार पुनरागमनाची भारतात क्षमता! कमी लेखण्याची चूक करणार नाही; ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेझलवूडचे वक्तव्य
pune baba bhide bridge
पुणे: बाबा भिडे पुलावरील संरक्षक कठडे झाले गायब, नक्की काय आहे प्रकार !

नवा जलमार्ग नेमका कसा आहे?

नव्या जलमार्गाचे उद्घाटन शनिवारी (१४ ऑक्टोबर) करण्यात आले. ‘छेरियापाणी’ या जहाजाच्या माध्यमातून ही जलवाहतूक होणार आहे. या मार्गाने श्रीलंकेत जायचे किंवा भारतात यायचे असेल, तर एका प्रवासी तिकिटाची किंमत साधारण ७,६७० रुपये आहे. प्रवाशाला सोबत ४० किलोपर्यंत सामान घेण्यास परवानगी आहे. श्रीलंकेत जाण्यासाठी नागापट्टीणम येथून सकाळी ७ वाजता हा जलप्रवास सुरू होईल. साधारण चार तासांनंतर म्हणजेच सकाळी ११ वाजता हे प्रवासी जहाज कानकेसंथुराई येथे पोहोचेल. तसेच श्रीलंकेतून परत भारतात येण्यासाठी दुपारी १.३० वाजता जहाज आपला प्रवास सुरू करील आणि हे जहाज सायंकाळी ५.३० वाजता भारतातील नागापट्टीणम येथे परतेल.

श्रीलंकेत जाण्यासाठी याआधी कोणकोणते मार्ग होते?

भारत आणि श्रीलंका या दोन देशांमधील जलमार्गाचा प्रवास नवा नाही. याआधी १९८२ सालापर्यंत चेन्नई ते कोलंबो, असा प्रवास इंडो-सिलोन एक्स्प्रेस किंवा बोट मेलच्या माध्यमातून केला जायचा. श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे नंतर ही वाहतूक सेवा थांबवण्यात आली. श्रीलंकेत गृहयुद्ध सुरू होण्यापूर्वी सर्वाधिक प्रसिद्ध समजला जाणारा  धनुष्कोडी ते तलाईमन्नार हा एक मार्ग होता.

श्रीलंकेतील गृहयुद्धानंतर स्थगित करण्यात आलेले जलमार्ग पुन्हा नव्याने सुरू करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. २००९ साली गृहयुद्ध संपल्यानंतर या प्रयत्नांना वेग आला होता. २०११ साली भारत आणि श्रीलंका यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आणि एक वाहतूक सेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे नंतर ही वाहतूक सेवा बंद करण्यात आली. रामेश्वरम ते तलाईमन्नार आणि कराईकल ते कानकेसंथुराई या मार्गानेदेखील वाहतूक सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वेगवेगळ्या अडचणींमुळे या प्रयत्नांना यश आले नाही.

नव्या जलमार्गामुळे काय होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यात नवी जलवाहतूक सुरू झाल्यामुळे या दोन्ही देशांतील किनारपट्टीवर पर्यटनाला चालना मिळू शकते. भारतातील पर्यटक कोलंबो, दक्षिण श्रीलंकेतील काही धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात; तर श्रीलंकेतील लोकांना नागपट्टीणम, नागोर, वेलंकन्नी, थिरुनाल्लर, तसेच तंजावर, मदुराई, तिरुची आदी धार्मिक स्थळांना भेट देता येईल. या नव्या जलवाहतुकीच्या सेवेमुळे दोन्ही देशांना पर्यटनाच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो.

दोन्ही देशांनी काय तयारी केली?

नव्या जलवाहतुकीच्या उद्घाटनामुळे दोन्ही देशांत पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने दोन्ही देशांनी तयारी केली आहे. पर्यटकांचा ओढा लक्षात घेता, तमिळनाडू सरकारकडून पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातोय. याबाबत तमिळनाडूचे मंत्री ई. व्ही. वेलू यांनी अधिक माहिती दिली. राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागांशी चर्चा करीत आहोत. त्यामध्ये सीमाशुल्क, परराष्ट्र व्यवहार, तसेच अन्य विभागांचा समावेश आहे. तमिळनाडू मेरिटाइम बोर्डअंतर्गत येणाऱ्या नागपट्टीणम बंदराची नुकतीच डागडुजी करण्यात आली आहे. या कामासाठी केंद्राच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आठ कोटी रुपयांचा निधी दिला होता. 

नरेंद्र मोदी, विक्रमसिंघे यांची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी नागापट्टीणम ते उत्तर श्रीलंकेतील जाफना येथील कानकेसंथुराई या जलमार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदी यांनी, या जलमार्गामुळे फक्त दोन शहरं एकमेकांशी जोडले जात नाहीयेत; तर दोन देश एकमेकांच्या अधिक जवळ येत आहेत. दोन्ही देशांतील लोकांचे संबंध यातून अधिक दृढ होतील आणि दोन्ही देशांतील लोक एकमेकांच्या अधिक जवळ येतील, अशी प्रतिक्रिया दिली. तर, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानील विक्रमसिंघे यांनीदेखील व्हिडीओ संदेश पाठवून या जलमार्गामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, अशा भावना व्यक्त केल्या.

जलवाहतुकीला सुरुवात; मात्र आव्हाने कायम? सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात नव्या जलमार्गाची सुरुवात झाली असली तरी हा उपक्रम कशा पद्धतीने राबवला जातो, यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असेल. या जलमार्गाद्वारे दिली जाणारी प्रवास सेवा सलग १० दिवस देण्याचा विचार होता. मात्र, शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाने ही सेवा आठवड्यातून तीन दिवस, अशी केली आहे. या वाहतुकीसाठी आकारले जाणारे भाडे हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातून श्रीलंकेत जाण्यासाठीचे तिकीट आणखी स्वस्त करायला हवे. तसेच वेगवेगळ्या ट्रॅव्हल साईट्सवर तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी, अशी भावना नागापट्टीणम बंदरातील एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.