दत्ता जाधव
जागतिक साखर उत्पादनात भारताने आघाडी घेतली आहे. ब्राझीलला मागे टाकून घेतलेली ही आघाडी काठावरील असली, तरीही यंदाच्या गाळप हंगामात ती टिकवून ठेवणे कठीण आहे. तरीही साखर उत्पादनात यंदा आपली कामगिरी मोठीच आहे. त्या विषयी..
जागतिक साखर उत्पादनाची स्थिती काय?
जगातील सुमारे ११०हून जास्त देशात साखर उत्पादन केले जाते. एकूण साखरेपैकी जवळपास ८० टक्के साखर उसापासून तर २० टक्के साखर बीटपासून तयार केली जाते. २०२२-२३ च्या (संपलेल्या) गळीत हंगामात जगभरात सुमारे १८२ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. हे उत्पादन मागील उत्पादनाच्या तुलनेत १.७ दशलक्ष टनाने अधिक आहे. युक्रेन-रशिया युद्धामुळे बीटपासून होणाऱ्या साखर उत्पादनात घट झाली आहे. यंदा ६० दशलक्ष टन साखरेचे उत्पादन देणारा आशिया हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक प्रदेश ठरला आहे. भारत, ब्राझील, युरोपियन युनियन, थायलंड आणि चीन हे प्रमुख साखर उत्पादक देश आहेत.
ब्राझीलमधील साखर उत्पादनात अस्थिरता का?
ब्राझीलमधील साखर उत्पादनात गेल्या पाच वर्षांत मोठा चढ-उतार दिसून येत आहे. २०१५-१६ मध्ये अंदाजे ३४.७ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले. यंदा ब्राझीलमध्ये ३५.३५ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. जागतिक बाजारात पेट्रोलियम पदार्थाचे दर वाढल्यास ब्राझील साखर उत्पादन कमी करून इथेनॉलचे उत्पादन घेतो. इथेनॉलमुळे देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थाची गरज भागवून काही प्रमाणात निर्यातही केली जाते. त्यामुळे ब्राझील साखरेपासून किती इथेनॉल निर्माण करणार, यावर जागतिक साखर बाजाराची दिशा अवलंबून असते. ऊस उत्पादनातही ब्राझील आघाडीवर होता. २०२० मध्ये ७५७.१२ दशलक्ष टन ऊस उत्पादनासह ब्राझील जगातील सर्वात मोठा ऊस उत्पादक देश ठरला होता. याच वर्षी रशिया आणि अमेरिका बीटपासून साखर उत्पादन करण्यात आघाडीवर होते.
ब्राझीलच्या साखर उत्पादनाचा जागतिक परिणाम काय?
जागतिक साखर उत्पादनात आघाडीवर असलेला ब्राझील जागतिक साखरेच्या बाजारातील महत्त्वाचा देश आहे. ब्राझीलची साखर जागतिक साखर बाजारात विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असल्यास साखरेचे दर दबावाखाली येतात. यंदा ब्राझीलने इथेनॉलनिर्मिती केल्यामुळे जागतिक साखर बाजारात काही प्रमाणात साखरेचा तुटवडा होता. त्यामुळे मागणी कायम राहिली. दरवर्षी भारतातून ७० ते ८० लाख टन साखरेची निर्यात होते. यंदा ती ११० लाख टनांवर गेली आहे.
भारत साखर उत्पादनात जगात अग्रेसर?
एकूण जागतिक साखर उत्पादन १८० दशलक्ष टनांच्या घरात असते. २०१९-२० मध्ये १६६.५८, २०२०-२१ मध्ये १८१.१८, २०२१-२२ मध्ये १८१.१८ आणि २०२२-२३ मध्ये १८२.८९ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले आहे. देशनिहाय विचार करता यंदा भारतात ३६.८८, ब्राझीलमध्ये ३५.३५, युरोपियन युनियनमध्ये १६.५१, थायलंडमध्ये १०.२३, चीनमध्ये ९.६, अमेरिकेत ८.३७ आणि पाकिस्तानमध्ये ७.१४ (सर्व आकडे दशलक्ष टनांत) साखर उत्पादन झाले आहे.
ब्राझीलमधील साखर उत्पादनाचे भविष्य काय?
जागतिक साखर उत्पादन आणि उसाच्या लागवडीत ब्राझील जगातील आघाडीचा देश असला, तरीही आगामी काळात ब्राझीलच्या शेतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ब्राझीलमधील शेतजमीन सोयाबीन आणि मका पिकासाठी मोठय़ा प्रमाणावर वापरली जाण्याची शक्यता आहे. परिणामी, उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शिवाय देशांतर्गत पेट्रोलियम पदार्थाची गरज भागविण्यासाठी इथेनॉलनिर्मितीवर अधिक भर देण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात भारत आणि ब्राझीलच्या साखर उत्पादनात फारसा फरक असणार नाही.
इथेनॉल उत्पादन किती महत्त्वाचे?
साखर उत्पादन करणाऱ्या भारत, ब्राझील, थायलंड आदी प्रमुख देशांना पेट्रोलियम पदार्थाची गरज आयात करूनच भागवावी लागते. पेट्रोलियम पदार्थाच्या आयातीवर होणारा प्रचंड खर्च त्या-त्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करीत आहे. त्यामुळे ब्राझील आणि आता भारतही उसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यावर भर देत आहे. भारतातही गरजेइतकी म्हणजे सुमारे २८० लाख टन साखर उत्पादन करून उरलेल्या उसापासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण राबविण्याचा विचार केला जात आहे. असे झाल्यास भारत आणि ब्राझीलच्या साखर उत्पादनात मोठी घट निर्माण होऊ शकते.
भारताचा मागील गळीत हंगाम काय सांगतो?
भारताने साखर उत्पादनात मुसंडी मारताना ३५५ लाख टन साखरेची निर्मिती केली आहे. चांगल्या पावसामुळे मागील हंगामात भारतात उसाचे उत्पादन बहुतांशी राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत दीडपट झाले. भारतीय कारखान्यांनी इथेनॉललाही प्राधान्य दिले असले तरी ब्राझीलच्या तुलनेत ते कमी होते. यामुळे भारतातील साखर उत्पादन वाढतच राहिले. देशात दरवर्षी आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशला मागे टाकत महाराष्ट्राने साखर उत्पादनात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परिणामी, ३६० लाख टनांहून अधिक उत्पन्न भारतात झाले.
साखर निर्यातीची स्थिती काय?
साखर उत्पादन वाढल्याचा चांगला परिणाम निर्यातवाढीवरही झाला. २०१७ -१८ला केवळ ६ लाख टन असणारी निर्यात २०१८-१९ला ३८ लाख टन, २०१९-२०ला ५९ लाख टन, २०२०-२१ला ७० लाख टन होती, ती वाढून २०२१-२२ मध्ये ११० लाख टनांपर्यंत गेली आहे. निर्यातीने आणि कारखानदारांना स्थानिक पातळीवर दर नसतानाही आधार दिला. साखर निर्यातीतून देशाला सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.
dattatray.jadhav@expressindia.com