भारत आणि कॅनडामधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जस्टीन ट्रुडो नेहमीच भारतविरोधी शक्तींना देशात आश्रय देताना दिसतात. मात्र, भारताला हे मान्य नाही. त्यामुळे कॅनडातील आपले उच्चायुक्त आणि अन्य राजनैतिक अधिकार्‍यांना परत बोलावण्याची घोषणा नुकतीच भारताकडून करण्यात आली आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताच्या कथित सहभागाबाबतच्या वादात भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडत आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर व्होट बँकेच्या राजकारणात गुंतल्याचा आरोप करीत हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येबाबत भारतावर करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. दोन्ही देशांनी प्रत्येकी सहा राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या राजनैतिक वादाचे दुष्परिणाम सध्या कॅनडामध्ये शिकत असलेल्या किंवा भविष्यात शिकण्याची इच्छा बाळगणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना जाणवू शकतात. २०१५ पासून एक दशलक्षाहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडासाठी अभ्यास परवाने मिळाले आहेत. या वादाचा कॅनडात शिकणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांवर नक्की काय परिणाम होईल? दोन्ही देशांतील तणाव वाढण्याचे कारण काय? ते जाणून घेऊ.

हेही वाचा : ‘रोमान्स स्कॅम’ नक्की आहे तरी काय? भारत, चीन व सिंगापूरमधील पुरुषांची ४६ दशलक्ष डॉलर्सची फसवणूक कशी झाली?

सध्या किती भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये शिकत आहेत?

इमिग्रेशन, रिफ्युजी व सिटीझनशिप कॅनडा (आयआरसीसी)च्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०२४ पर्यंत एकूण १.३ दशलक्ष भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यास परवाने मिळाले आहेत. २०१५ मध्ये कॅनडामध्ये अभ्यास परवाने असलेले सुमारे ३१,९२० भारतीय विद्यार्थी होते. त्यावेळी कॅनडात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची एकूण संख्या २,१९,०३५ होती; ज्यात १४.५ टक्के भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश होता. परंतु, २०२३ पर्यंत, ६,८२,०६० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी २,७८,२५० भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यास परवाने मिळाले आहेत. आता भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे, जी एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थी लोकसंख्येच्या ४०.७ टक्के इतकी आहे.

इमिग्रेशन, रिफ्युजी व सिटीझनशिप कॅनडा (आयआरसीसी)च्या आकडेवारीनुसार २०१५ ते २०२४ पर्यंत एकूण १.३ दशलक्ष भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यास परवाने मिळाले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

२०२४ च्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ३,७४,०६० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी १,३७,४४५ भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यास परवाने मिळाले आहेत, जे एकूण विद्यार्थ्यांच्या ३६.७ टक्के आहेत. २०२३ च्या तुलनेत यात अंदाजे चार टक्क्यांची घट झाली असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी संख्या कमी होणे साहजिक आहे. कारण- या वर्षी कॅनडाच्या सरकारने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे आणि अभ्यास परवाना प्रक्रियेत नवीन बदल लागू केले आहेत. त्यामुळे व्हिसाच्या प्रक्रियेचा कालावधी कमी झाला आहे आणि काही इच्छुकांचा उत्साह कमी झाला आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे बदल झाले असले तरीही सध्या कॅनडामध्ये सुमारे ६,००,००० भारतीय विद्यार्थी आहेत.

कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांवर भारत-कॅनडा वादाचा कसा परिणाम होतोय?

जालंधर येथील एमबीएची विद्यार्थिनी तन्वी शर्मा टोरंटोमध्ये शिकत आहे. ती म्हणाली की, राजकीय तणावाचा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालेला नाही. परंतु, अजूनही चिंता कायम आहे. नोव्हा स्कॉशियामध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेत असलेल्या कपूरथळा येथील हरमनप्रीत कौरने सांगितले की, विद्यार्थी स्वतः राजकीय घडामोडींऐवजी त्यांच्या शिक्षण आणि नोकरीवर लक्ष केंद्रित करीत असले तरी या राजकीय तणावामुळे पालक चिंतेत आहेत. ती म्हणाली, “ते कधी कधी आम्हाला दुसऱ्या देशात जाण्याविषयीही विचारतात.“ टोरंटोमधील आणखी एका विद्यार्थ्यानेही अशाच भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमध्ये कोणतीही भीती नसली तरी भारतातील त्यांचे कुटुंब काळजीत आहे. विद्यार्थ्यांनी हेदेखील निदर्शनास आणून दिले की, पूर्वीच्या स्टॅण्डऑफच्या काळातही कॅनडाने विद्यार्थी व्हिसा देणे थांबवले नाही. राजकीय उलथापालथ सुरू असूनही शिक्षण हे एक स्थिर क्षेत्र आहे, असे कॅनेडियन सरकारचे मत असल्याचे विद्यार्थ्यांचे सांगणे आहे.

कॅनडाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?

कॅनडात सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जारी भीती नसली तरी भारतातील विद्यार्थ्यांमध्ये खरी चिंता आहे. अभ्यास परवानग्यांवरील नवीन निर्बंधांमुळे शिक्षण सल्लागारांनी आधीच व्याजात लक्षणीय घट नोंदवली आहे. राजनैतिक तणावामुळे ही समस्या वाढेल, असेही त्यांचे मत आहे. होशियारपूर येथील अर्शदीप कौर म्हणाली, “मी कॅनडाला जाण्याचा विचार करीत होते; पण माझ्या वडिलांनी मला पुन्हा विचार करण्यास सांगितले.” नवप्रीत सिंग या आणखी एका इच्छुकाने सांगितले, “कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी भारत आणि कॅनडा यांच्यातील वाद कसा आणि कधी सुटेल याची थांबून वाट पाहीन.”

हेही वाचा : मदरशांना निधी देणे थांबवावे, बाल आयोगाची इच्छा; कारण काय? केरळची व्यवस्था इतर राज्यांपेक्षा वेगळी कशी?

कपूरथळा येथील गुरप्रीत सिंगसारख्या पंजाबमधील सल्लागारांचे असे निरीक्षण आहे की, पुढील वर्षी होणार्‍या कॅनडाच्या निवडणुकांपूर्वी अलीकडील वाद ही राजकीय घडामोड आहे; ज्याचा विद्यार्थ्यांच्या निर्णयांवर परिणाम होत आहे. व्हिसा प्रक्रियेची चिंता आणि संभाव्य भविष्यातील अनिश्चितता यांमुळे काही विद्यार्थी आता कॅनडामध्ये अभ्यास करण्याचा त्यांचा निर्णय बदलण्याच्या तयारीत आहेत. “दोन्ही राष्ट्रांमध्ये तणाव सुरू असताना, हजारो भारतीय इच्छुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या मतभेदांमुळे शिक्षणाच्या प्रवाहात काय बदल होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे,” असे दुसरे सल्लागार तीर्थ सिंग यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India canada rift can impact indians studying aspiring to study in canada rac
Show comments