समुद्राच्या पाण्यावरून अगदी कमी उंचीवरून मार्गक्रमण करत एका लहान जहाजाचा अचूकतेने वेध घेणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्राची (एनएएसएम-एसआर) चाचणी यशस्वी झाली. राष्ट्रीय संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदल यांनी हे नाविन्यपूर्ण क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या चाचणीने हवेतून पुन्हा लक्ष्यावर मारा केंद्रित करण्याची क्षमताही प्राप्त झाली. लक्ष्यभेदात अचूकता कुठल्याही क्षेपणास्त्राची काही वैशिष्ट्ये असतात. ब्राम्होससारखी क्षेपणास्त्रे ‘डागा अन् विसरून जा’ या तत्त्वावर काम करतात. तर काही क्षेपणास्त्रात उड्डाणादरम्यान हस्तक्षेप करून मानवी नियंत्रण राखता येते. म्हणजे शोधलेल्या लक्ष्याचे निरीक्षण करून अचूक माऱ्यासाठी बदल करता येतात. जहाजविरोधी क्षेपणास्त्र (एनएएसएम-एसआर) हे या प्रकारातील आहे. चाचणीतून त्याचे हे वैशिष्ट्य सिद्ध झाले. भारतीय नौदलाच्या सी – किंग हेलिकॉप्टरमधून ते डागण्यात आले होते. लक्ष्य म्हणून निश्चित केलेल्या लहान जहाजाचा त्याने थेट व अचूक वेध घेतला. उड्डाणादरम्यान मानवी नियंत्रणाची ही चाचणी एकमेवद्वितीय ठरली. त्यामुळे हवेतून पुन्हा लक्ष्यावर मारा केंद्रित करण्याची क्षमता प्राप्त झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण प्रणाली

वैमानिकाला लक्ष्यावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी लक्ष्याच्या थेट प्रतिमा पाठविण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली क्षेपणास्त्रात आहे. यामुळे उड्डाणादरम्यानच्या प्राप्त प्रतिमांमधून वैमानिकाला क्षेपणास्त्राच्या मार्गाचे निरीक्षण करणे व तत्क्षणी शोधलेल्या लक्ष्यांचे मूल्यमापन करणे शक्य झाले. या मोहिमेने उच्च बँडविड्थसह दुहेरी डेटा संलग्न प्रणालीच्या कार्याचे दर्शन घडवले. माऱ्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत मार्गदर्शन करता यावे म्हणून क्षेपणास्त्राने स्वदेशी ‘इमेजिंग इन्फ्रारेड सीकर’चा वापर केला. विशिष्ट पद्धतीने हे क्षेपणास्त्र सोडले जाते. जेणेकरून जवळच्या परिसरातील अनेक लक्ष्यांपैकी एका लक्ष्याची निवड करता येते. चाचणीत प्रारंभी शोधाच्या विशिष्ट परिघातील मोठ्या लक्ष्याची निवड करून ते डागण्यात आले. शेवटच्या टप्प्यात वैमानिकाने छुपे लक्ष्य निवडले आणि संपूर्ण अचूकतेसह क्षेपणास्त्राने त्या लक्ष्याचा वेध घेतले.

माग काढणे अवघड का ठरते ?

एनएएसएम-एसआर जहाजविरोधी क्षेपणास्त्राचा ‘सी-स्किमिंग’ पद्धतीचा प्रवास त्याचा थांगपत्ता लागू देत नाही. आधुनिक युद्धात गुप्तता आणि अचूकता सर्वतोपरि आहे. ‘सी-स्किमिंग’ हे तंत्र शत्रूला क्षेपणास्त्राचा ठावठिकाणा लागणार नाही, याची काळजी घेते. त्या अंतर्गत समुद्राच्या पृष्ठभागाच्या शक्य तितक्या जवळून मार्गक्रमण केले जाते. जेणेकरून रडारला चकवा देऊन लक्ष्यापर्यंत पोहोचताना शत्रूकडून निष्प्रभ केले जाण्याची शक्यता कमी होते. या प्रकारे क्षेपणास्त्राने अधिकतम पल्ल्याच्या लक्ष्यावर मारा केला.

स्वदेशी यंत्रणा

क्षेपणास्त्राच्या प्रवासात मार्गदर्शनासाठी स्वदेशी फायबर ऑप्टिक गायरोस्कोप आधारित आयएनएस आणि रेडिओ अल्टीमीटर, एकात्मिक एव्हिओनिक्स मोड्यूल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल ॲक्युरेटर तसेच जेट व्हेन नियंत्रण, औष्णिक बॅटरीज आणि पीसीबी वॉरहेड अशा यंत्रणा वापरलेल्या आहेत. हे क्षेपणास्त्र डीआरडीओच्या इमारत संशोधन केंद्र, संरक्षण संशोधन आणि विकास, उच्च ऊर्जा सामग्री संशोधन, टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन या देशभरातील प्रयोगशाळांच्या प्रयत्नांतून विकसित झाले. सध्या लघु उद्योग व नवउद्यमींच्या सहकार्याने त्याची निर्मिती प्रगतीपथावर आहे.

कुठे तैनात होईल ?

हे भारताचे पहिले हवेतून सोडलेले स्वदेशी जहाजविरोधी क्षेपणास्त्र. त्याची मे २०२२ मध्ये पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. तेव्हा त्याने समुद्रसपाटीपासून केवळ पाच मीटर उंचीवर राहून अचुकतेने लक्ष्य गाठण्याची क्षमता सिद्ध केली होती. सी – किंग हेलिकॉप्टरवर वापरल्या जाणाऱ्या सी इगल क्षेपणास्त्राची जागा या नव्या क्षेपणास्त्राला देण्याचा विचार आहे. त्याचा पल्ला ५५ किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. १९८० पासून वापरात असलेल्या सी – किंग हेलिकॉप्टरचा ताफा निवृत्तीच्या वाटेवर आहे. त्यामुळे एनएएसएम-एसआर जहाजविरोधी क्षेपणास्त्र हे रोमिओ एमएच-६० आर आणि एचएएलनिर्मित ध्रुव हेलिकॉप्टरमध्ये तैनात होईल. या माध्यमातून अशा क्षेपणास्त्रांचे परकीय अवलंबित्व कमी होणार आहे.

विस्तारणारी बाजारपेठ

जगातील वाढत्या सागरी तणावामुळे अनेक देश प्रगत सी – स्किमर क्षेपणास्त्रे विकसित वा खरेदी करण्यास उत्सुक आहेत. यामुळे या क्षेपणास्त्रांची सध्याची २.८७ अब्ज डॉलर एवढ्या व्याप्तीची बाजारपेठ पुढील पाच वर्षात ३.४२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तविला जातो. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनियन आर – ३६० नेपच्युन ‘सी-स्किमिंग क्षेपणास्त्रांनी रशियन क्रुझर मॉस्क्वाला धडक दिली आणि ती बुडाल्याचा दावा झाला होता. समुद्रावर आपला प्रभाव कायम ठेवण्यासाठी या स्वरुपातील क्षेपणास्त्रांवर अमेरिका सर्वाधिक खर्च करत आहे. त्याखालोखाल चीन, रशिया, भारत व सौदी अरेबिया खर्च करत असल्याचे ‘सिप्री’च्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader