संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) भारतीय हवाई दलाच्या सुखोई – ३० एमकेआय विमानातून लांब पल्ल्याच्या ‘गौरव’ या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केली. यानिमित्ताने शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या टप्प्यात न येता सुरक्षित अंतरावरून त्याच्या जमिनीतील खंदकापासून ते फिरत्या ताफ्यापर्यंत बहुविध लक्ष्यभेदाची क्षमता हवाई दलास प्राप्त झाली आहे.
गौरव ग्लाइड बॉम्ब काय आहे?
‘एलआरजीबी गौरव’ हा एक हजार किलोग्रॅम वजनाचा स्वदेशी ग्लाइड बॉम्ब आहे. संरक्षण केंद्र इमारत (आरसीआय), शस्त्रा्स्त्र संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (एआरडीई) तसेच एकात्मिक चाचणी केंद्र यांच्या सहकार्याने रचनाबद्ध करून विकसित करण्यात आला. त्याची पहिली चाचणी ऑगस्ट २०२४ मध्ये घेतली गेली होती. यावेळी सलग तीन दिवस विविध टोपणे (वॉरहेड्स) वापरून गौरवच्या चाचण्या पार पडल्या. हा ग्लाइड बॉम्ब विमानातून टाकल्यानंतर संकरित दिशादर्शन प्रणालीद्वारे लक्ष्याच्या दिशेने प्रवास करू लागतो. चाचणीत जवळपास १०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्य त्याने अचूकतेने भेदले. एलआरजीबी विकसित झाल्यामुळे सशस्त्र दलांच्या शक्तीत लक्षणीय वाढ होईल.
ग्लाइड बॉम्ब म्हणजे काय?
दूरवरून हल्ला करण्यासाठी वापरले जाणारे हे अचूक व मार्गदर्शित शस्त्र आहे. पारंपरिक बॉम्ब लक्ष्याच्या समीप किंवा विशिष्ट उंचीवर जाऊन सोडण्यापेक्षा लांब पल्ल्याचे ग्लाइड बॉम्ब वेगळ्या प्रकारे काम करतात. या बॉम्बमधील पंख त्यांना लक्ष्याकडे नेतात. ते जीपीएस, साध्या पद्धतीने अथवा लेझर मार्गदर्शित असू शकतात. लक्ष्यानुसार त्यामध्ये १०० किलो ते एक टनापेक्षा जास्त स्फोटके असू शकतात. साधारणत: ३० ते ४० हजार फूट उंचीवरून हा बॉम्ब उच्च वेगाने सोडला जातो. खाली उतरताना दिशादर्शन प्रणाली मार्ग सुनिश्चित करून घेते. हे बॉम्ब आक्रमण आणि बचाव यातील संतुलन बदलतात, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
धोरणात्मक फायदे
आधुनिक युद्धात लांब पल्ल्याच्या ग्लाइडिंग बॉम्बमुळे अनेक धोरणात्मक लाभ मिळतात. या बॉम्बमुळे विमान शत्रूच्या हवाई संरक्षणाच्या पलीकडे जाऊन हल्ला करू शकते. त्यामुळे वैमानिक व विमानाचा धोका कमी होतो. अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली बाळगणाऱ्या शत्रूविरोधात हा बॉम्ब महत्त्वाचा ठरू शकतो. क्रुझ क्षेपणास्त्रांच्या तुलनेत त्याचा निर्मिती खर्च बराच कमी आहे. यामुळे अचूक हल्ल्यांसाठी तो किफायतशीर पर्याय मानला जातो. स्वस्त व उत्पादनास सोपे असल्याने मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती व तैनात शक्य असते. महत्त्वाचे म्हणजे, बहुमुखी प्रतिभेमुळे विशिष्ट मोहिमांसाठी असे बॉम्ब वापरता येतात. अचूक मार्गदर्शन प्रणालीमुळे अनपेक्षित विनाश कमी होतो. याच कारणास्तव ते शहरी भाग व नागरी पायाभूत सुविधांजवळ वापरण्यायोग्य मानले जातात.
मर्यादा कोणत्या?
लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बचे अनेक फायदे असले तरी त्याच्या काही मर्यादाही आहेत. ऊर्जात्मक शक्ती नसल्याने प्रक्षेपक वाहनाच्या उंची व गतीवर ते अवलंबून असतात. इंधनाच्या आधारे झेपावणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याच्या तुलनेत त्यांचा पल्ला कमी असतो. बॉम्बच्या जीपीएस मार्गदर्शन प्रणालीत आधुनिक तंत्रज्ञानाने शत्रूकडून व्यत्यय (इलेक्ट्रॉनिक जॅमिंग) आणला जाऊ शकतो. क्षेपणास्त्राचा पाठलाग करून ती हवेत नष्ट करणाऱ्या (इंटरसेप्टर) क्षेपणास्त्र प्रणालीसमोर ते असुरक्षित ठरतात. पॅट्रीयट अथवा एस – ४०० सारख्या प्रणाली विशिष्ट उंची व अंतरावर ग्लाइड बॉम्बचा सामना करू शकतात.
आंतरराष्ट्रीय स्थिती…
रशिया, चीन, युरोपीय राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांनी ग्लाइड बॉम्ब प्रणाली विकसित केली आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षात त्याचे महत्त्व दिसून आले. रशियाने फॅब – ५००-एम ६२ सारखे ग्लाइड बॉम्ब मोठ्या प्रमाणात वापरले, ज्यामुळे सुखोई – ३४ आणि सुखोई – ३५ ही त्यांची विमाने कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या टप्प्याबाहेरून लक्ष्यांवर मारा करू शकतात. तर फ्रान्सच्या एएएसएम हॅमरसारख्या पाश्चात्य देशांनी पुरवलेल्या ग्लाइड बॉम्बमुळे युक्रेनने रशियन स्थांनाना लक्ष्य केले. भारत, तुर्कीये, दक्षिण कोरियासारखे देश स्वदेशी ग्लाइड बॉम्बमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत.
अदानी समूहाचा संबंध कसा?
या चाचण्यांनी गौरवचा भारतीय हवाई दलात समावेश होण्याचा मार्ग सुकर बनला आहे. गौरवच्या विकास व उत्पादनात अदानी डिफेन्स सिस्टिम ॲण्ड टेक्नॉलॉजी, भारत फोर्ज आणि विविध लघु उद्योगांचा समावेश असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे