Acute Shortage of Nurses in India भारताने वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सुविधा आणि डॉक्टरांसाठीच्या सुविधा दिवसेंदिवस सुधारत आहेत. परंतु, अशात नर्सेसची संख्या कमी होत आहे; जी एक गंभीर समस्या ठरत आहे. रुग्णाचा डॉक्टरपेक्षाही जास्त संबंध येतो तो नर्सशी. डॉक्टर रुग्णांवर उपचार करतात; तर नर्सेस रुग्णांची सेवा करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत नर्सेसची संख्या कमी झाली आहे. हे एक गंभीर संकट असून, याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
नर्सेस मोठ्या संख्येने भारत सोडून जात असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टर देत आहेत. असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (इंडिया)चे महासंचालक डॉ. गिरधर ग्यानी म्हणाले की, भारतात ३.३ दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत नर्सेस आहेत. परंतु, भारताच्या १.३ अब्ज लोकसंख्येसाठी ही संख्या अपुरी आहे. पण नर्सेस देश सोडण्याचा निर्णय का घेत आहेत? हे संकट भारतासाठी किती मोठे आहे? त्याबद्दल जाणून घेऊ या.
हेही वाचा : बांगलादेशी खासदाराची भारतात हत्या कशी झाली?
भारताबाहेर नर्सेसचे उत्पन्न दुप्पट
तज्ज्ञ म्हणतात की, जास्त पगार मिळत असल्यामुळे नर्सेस परदेशात जाणे पसंत करतात. इंदूर मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार पॅथॉलॉजिस्ट डॉ. सतीश जोशी म्हणाले, “अनेक नर्सेस आपल्या भविष्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेत आहेत. कारण- भारतापेक्षा त्या परदेशांत जास्त कमावू शकतात. काहींना तर भारतातील त्यांच्या उत्पन्नापेक्षा चार पट जास्त उत्पन्न परदेशांत मिळते.”
डॉ. सतीश जोशी यांनी स्पष्ट केले की, ज्या नर्सेसनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्यांना खासगी मालकीच्या रुग्णालयांमध्ये १५ ते २५ हजार प्रतिमहिना वेतन मिळते. लहान संस्थांमध्ये वेतन खूपच कमी आहे. एक दिवसाच्या सुटीसह दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या नर्सेसना तीन ते चार वर्षांच्या अनुभवानंतर सुमारे ३० ते ४० हजार रुपये पगार मिळण्याची अपेक्षा आहे. डॉ. जोशी पुढे म्हणाले की, रुग्णालयात येण्यासाठी नर्सेसच्या ठरावीक वेळा असतात; पण कधी कधी कामाचा ताण जास्त असतो तेव्हा त्या वेळेपेक्षा जास्त काम करतात. त्यासाठी आम्ही त्यांना ओव्हरटाइम पैसेही देतो; पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही.
आरोग्य सेवेवर खर्च वाढविण्याची गरज
”आरोग्य सेवेवर खर्च वाढविण्याची गरज आहे. ही एक सामाजिक-राजकीय समस्या ठरत आहे,” असे केरळस्थित केआयएमएस रुग्णालयाचे संस्थापक सहदुल्ला यांनी ‘लाइव्हमिंट’ला सांगितले. २६ वर्षीय नर्स हर्षा एलिझाबेथ मायकल दोन वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “जर मी भारतात पाच वर्षे काम केले, तर माझा पगार ४० हजार रुपयांपर्यंत पोहोचेल. परंतु, ब्रिटनमध्ये मी पाच वर्षांच्या अनुभवानंतर महिन्याला सुमारे चार लाख रुपये कमवू शकते.”
परदेशात नर्सेसना असंख्य सुविधा
डॉ. जोशी यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, परदेशात जाणाऱ्या नर्सेसना उत्तम प्रशिक्षण घेण्याची आणि डॉक्टरांच्या मोठ्या गटाकडून शिकण्याची संधी असते. परंतु, अशी संधी त्यांना भारतात मिळत नाही.
नर्स हर्षाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, असंख्य फायद्यांमुळे ब्रिटनमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. “पाच वर्षांनी मी त्या देशाची नागरिक होईन आणि मुलांसाठी मोफत शिक्षण, मोफत वैद्यकीय उपचार इत्यादी सर्व लाभांसाठी मी पात्र असेन. मी पैशांची बचत करू शकते आणि पालकांनाही पैसे पाठवू शकते,” असे ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली, “भारतात आठवड्यातून पाच दिवस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करावे लागते; मात्र ब्रिटनमध्ये ३७.५ तासांचा कामाचा आठवडा असतो. त्याशिवाय जर एखाद्याने प्रगत अभ्यासक्रम घेणे निवडले, तर हॉस्पिटल खर्च भागवते आणि डबल शिफ्टमध्ये काम केल्यास अतिरिक्त उत्पन्नही मिळवता येते.”
“अधिक कुशल नर्सेसची गरज”
डॉ. जोशी म्हणाले की, नर्सेसच्या कमतरतेमुळे लहान रुग्णालये बी.एस्सी. पदवी (साडेचार वर्षे)पेक्षा लहान नर्सिंग कोर्सेस (तीन वर्षे आणि सहा महिन्यांचे) करणार्या नर्सेसची भरती करीत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सेवेच्या गुणवत्तेसह सध्याच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवरही मोठा भार पडत आहे. डॉ. ग्यानी म्हणाले, “नर्सेसच्या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज आहे.” उजाला सिग्नसचे संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी ‘पीटीआय’ला सांगितले, “नर्सेसची कमतरता आणि त्यांचे परदेशांत मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर हे चिंतेचे कारण आहे.”
हेही वाचा : अरविंद केजरीवालांना जामीन, मग हेमंत सोरेन यांना का नाही? सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
नर्सेसना करावा लागतो रोषाचा सामना
डॉ. जोशी म्हणाले की, डॉक्टर आणि नर्सेसबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. हीदेखील एक चिंतेची बाब आहे. त्यामुळेही बरेच लोक परदेशांत जात आहेत. ते म्हणाले, “वैद्यकीय कर्मचारी आणि नर्सेसना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाचा सामना करावा लागतो, त्यांना कधी कधी मारहाणही होते.” नर्स हर्षाने सांगितले की, ब्रिटनमध्ये आरोग्य कर्मचार्यांचा आदर केला जातो; जे भारतात होत नाही. डॉ. ग्यानी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले की, नर्सेसना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. “मोठमोठ्या शहरांमध्ये आव्हानेही मोठी आहेत. या शहरांमध्ये अत्याधुनिक रुग्णालये किंवा आरोग्य सुविधा असूनही प्रशिक्षित आरोग्य कर्मचार्यांची कमतरता आहे. त्याशिवाय नर्सिंग समुदायदेखील सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा करीत आहे,” असे डॉ. ग्यानी यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.