खलिस्तानवादी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला. भारताने हे आरोप फेटाळले आहेत. या आरोपानंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांतील राजनैतिक संबंध ताणले गेले आहेत. जस्टिन ट्रुडो यांच्या या आरोपानंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची सेवा तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतरही ट्रुडो यांनी खलिस्तानवादी नेत्याच्या हत्येचा पुनरुच्चार केला. याच पार्श्वभूमीवर भारताने व्हिसासंबंधी कोणता निर्णय घेतला आहे? या निर्णयाचा फटका नेमका कोणाला बसणार ? हे जाणून घेऊ या…
कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे थांबवण्याचा निर्णय
कॅनडातील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासांना ‘सुरक्षाविषयक धोका’ असल्यामुळे कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे परराष्ट्र खात्याने गुरुवारी जाहीर केले. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. या आधी बुधवारी (२० सप्टेंबर) भारताने कॅनडात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. भारतविरोधी वाढत्या कारवाया, तसेच राजनैतिक तणाव लक्षात घेता भरताने हा इशारा दिला आहे.
व्हिसा देणे थांबवल्यामुळे कोणाला फटका बसणार?
भारतात येण्याची इच्छा असणाऱ्या, पण अद्याप व्हिसा नसणाऱ्या कॅनडाच्या नागरिकांना या निर्णयामुळे अडचण येणार आहे. यामध्ये भारतात येण्याची इच्छा असणारे उद्योजक, कॅनडाचे पर्यटक, कॅनडाचे विद्यार्थी, तसेच भारतीय नागरिकांचे कॅनडातील नातेवाईक यांनादेखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
ओसीआय कार्ड असलेल्या भारतीय वंशाच्या कॅनडातील नागरिकांचे काय?
भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकांवर भारताच्या या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकांकडे ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड किंवा दीर्घकालीन व्हिसा असेल त्यांना भारतात येण्यास परवानगी असेल. म्हणजेच ज्यांच्याकडे ओसीआय कार्ड असेल, त्यांच्यावर भारताने घेतलेल्या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. ज्या नागरिकांकडे ओसीआय कार्ड असते, त्यांना भारतात आजीवन प्रवेश असतो. तसेच ते भारतातून कधीही जाऊ शकतात. यासह ओसीआय कार्ड असणाऱ्या व्यक्ती कामानिमित्त भारतात कितीही दिवस राहू शकतात.
अगोदरच व्हिसा असणारे कॅनेडियन नागरिक भारतात येऊ शकतात का?
सध्या भारताने कॅनडाच्या नागरिकांना नव्याने व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. मात्र, कॅनडाच्या ज्या नागरिकांकडे अगोदरपासूनच व्हिसा आहे, त्यांच्यावर या निर्णयाचा काहीही परिणाम होणार नाही. म्हणजेच अगोदरपासूनच वैध व्हिसा (ज्यांचा व्हिसा रद्द केलेला नाही) असणारे कॅनेडियन भारतात येऊ शकतात.
व्हिसा बंदचा निर्णय आणखी किती दिवस?
सध्या तरी भारताने कॅनडा देशातील नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते थांबवले आहे. भविष्यात कॅनडा आणि भारत या दोन देशांतील तणावाच्या स्थितीनुसार भारत आपल्या या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो. या दोन्ही देशांतील राजनैतिक आणि राजकीय स्थिती पाहून भारत याबाबतचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे सध्या तरी भारताने घेतलेला व्हिसा बंदचा निर्णय किती दिवस असेल, याबाबत अस्पष्टता आहे.
कॅनडा-भारत यांच्यातील वादाचे कारण काय?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केलेल्या दाव्यानंतर या दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात आहे, असा दावा ट्रुडो यांनी केला होता. या वर्षाच्या जून महिन्यात कॅनडात निज्जर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ट्रुडो यांच्या या दाव्यावर भारताने तीव्र आक्षेप व्यक्त केला. त्यानंतर कॅनडाने भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला कॅनडा देश सोडण्यास सांगितले; तर भारतानेदेखील भारतातील कॅनडाच्या सहाय्यक उच्चायुक्तांना भारत देश सोडण्यास सांगितले. सध्या या दोन्ही देशांत तणावाची स्थिती आहे.
कॅनडादेखील भारतीयांना व्हिसा देण्यास बंदी घालू शकतो का?
भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातल्यामुळे कॅनडा हा देशदेखील भारतीयांना व्हिसा देणे बंद करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या तरी आमची व्हिसा देण्याची सुविधा सुरूच राहील, असे कॅनडाने सांगितले आहे. मात्र, या दोन्ही देशांतील संबंध आणि तणावाची स्थिती याचा अभ्यास करून कॅनडा व्हिसाबाबत काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.