-ज्ञानेश भुरे
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. फलंदाजी, गोलंदाजीच्या आघाडीवर भारतीय खेळाडूंनी कामगिरी उंचावली असून, पुन्हा एकदा भारताकडे संभाव्य विजेते म्हणून बघितले जात आहे. उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. भारताच्या एकूणच कामगिरीचा हा ताळेबंद…
या वर्षी भारताची ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कामगिरी कशी राहिली?
क्रिकेटच्या या लघुतम प्रारूपात या वर्षी भारतीय संघ सर्वांत यशस्वी ठरला आहे. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय मिळविताना त्यांनी पाकिस्तानला (२० विजय) मागे टाकले. या वर्षी भारताने १० विविध संघांविरुद्ध ३२ ट्वेन्टी-२० सामने खेळले. यातील ते २३ सामने जिंकले आणि केवळ ८ पराभव पत्करले. एका सामन्याचा निकाल लागला नाही.
भारताच्या या यशाची सुरुवात कुठून झाली?
भारताने या वर्षी सर्वांत प्रथम फेब्रुवारीत वेस्ट इंडिजला ३-० असे हरवले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धही ३-० अशीच मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका २-२ अशी बरोबरीत राहिली. या तीनही मालिका मायदेशात झाल्या होत्या. त्यानंतर परदेशात भारताने आयर्लंडला २-०, इंग्लंडला २-१, वेस्ट इंडीजला ४-१ असे हरवले. विश्वचषकापूर्वी मायदेशातील मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१, दक्षिण आफ्रिकेला २-१ असे हरवले.
विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत भारताची कामगिरी कशी होती?
विश्वचषक स्पर्धा सुरू होताना भारताला जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे माघारीचा धक्का बसला होता. मात्र, दुसरी फळी मजबूत असल्याने विश्वचषक स्पर्धेत बुमरा, जडेजाच्या माघारीचा धक्का पचवणे भारताला सहज शक्य झाले. फलंदाजीच्या आघाडीवर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची कामगिरी खूपच प्रभावी ठरली आहे. गोलंदाजीत विशेष करून नवोदित अर्शदीप सिंगने निश्चितच अपेक्षा उंचावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर भुवनेश्वर, शमी यांच्या बरोबरीने हार्दिक पंड्यानेही आपला वाटा उचलला. पूर्ण चार षटके टाकू शकतो हे हार्दिक पंड्याने दाखवून देत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.
विराट कोहली, सूर्यकुमारचे योगदान किती महत्त्वाचे?
भारताच्या आतापर्यंतच्या विजयात गोलंदाजांपेक्षा विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीतील सातत्याचा खूप मोठा वाटा आहे. विराट कोहलीने आतापर्यंत ५ सामन्यांत ३ अर्धशतकांसह सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमारनेही तीन अर्धशतकांच्या जोरावर २२५ धावा केल्या आहेत. कोहलीचा संयम आणि सूर्यकुमारची आक्रमकता हे भारताच्या विजयाचे जणू समीकरण बनले आहे. विशेषकरून सूर्यकुमारने आपल्या ३६० अंशांतल्या फटकेबाजीने डिव्हिल्यर्सची आठवण करून दिली आहे. कोहलीचा स्ट्राइक रेट १३८.९८,तर सूर्यकुमारचा १९३.९६ इतका राहिला आहे.
गोलंदाजांची कामगिरी कशी राहिली आहे?
आव्हानाचा बचाव करताना निश्चितच भारताची गोलंदाजी उजवी राहिली. यात प्रामुख्याने अर्शदीपची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. पॉवर प्ले आणि उत्तरार्धातील अशा दोन्ही टप्प्यात अर्शदीप एक प्रमुख गोलंदाज म्हणून समोर येत आहे. कर्णधार रोहित शर्मानेही हे बोलून दाखवले आहे. अर्शदीपने आतापर्यंत १० गडी बाद केले आहेत. बुमराच्या जागी पसंती मिळालेला शमीनेही छाप पाडली. अश्विनचीही फिरकी कामी आली आहे. दोघांनी प्रत्येकी सहा गडी बाद केले आहेत.
भारताचे नियोजन कसे राहिले?
विश्वचषकासाठी भारताने निवडलेले चार वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज निवडल्यावर क्रिकेट पंडितांनी भुवया उंचावल्या होत्या. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांचे स्वरूप बघता हे साहजिक होते. पण, या मर्यादित गोलंदाजांसह भारताने स्पर्धेत आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. पहिल्या सामन्यापासून संघ व्यवस्थापनाने संघ बदल केला नाही. खेळाडूंवर दाखवलेला विश्वास खूप महत्त्वाचा ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अक्षर पटेलला वगळून दीपक हूडाला दिलेली संधी हा एकच बदल भारताने केला. तो फसला. पण वेळीच चूक सुधारून पुन्हा गाडी रुळावर येईल याची काळजी घेतली गेली.
उपांत्य फेरीचे स्वरूप कसे राहील?
भारतीय संघ गटात अव्वल राहिल्याने आता उपांत्य फेरीत भारताची गाठ इंग्लंडशी पडणार आहे. दुसरी उपांत्य लढत न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांदरम्यान होईल. उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान संघ आशियाची ताकद दाखविण्यासाठी तयार असतील यात शंका नाही. जर-तरचे समीकरण सोडवून पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना भारत-पाकिस्तान अंतिम लढतीची प्रतीक्षा राहिल्यास नवल वाटणार नाही.
उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे आव्हान कसे असेल?
स्पर्धेत आतापर्यंत इंग्लंडची कामगिरी खूप काही चांगली झाली असे मानता येणार नाही. इंग्लंडने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असली, तरी त्यांच्या खेळाडूंच्या कामगिरीत फारसे सातत्य दिसलेले नाही. जॉस बटलर, ॲलेक्स हेल्स ही सलामीची जोडीदेखील म्हणावा तेवढा प्रभाव पाडू शकलेली नाही. वेगवान गोलंदाजीतही कधी सॅम करन, तर कधी मार्क वूड यांनाच चमक दाखवता आली आहे. विशेष म्हणजे फिरकी गोलंदाजी खेळण्यात त्यांचे फलंदाज अपयशी ठरले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात ते प्रकर्षाने दिसून आले. या सगळ्याचा विचार केला तर भारतीय संघ निश्चित उजवा आहे. फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण अशा सगळ्याच आघाडीवर भारतीय संघ इंग्लंडच्या एक पाऊल पुढे आहे. इंग्लंडची फिरकी गोलंदाजी खेळण्याची उणीव लक्षात घेता अगदीच बदल करायचा झाला, तर भारतीय संघ यजुवेंद्र चहलचा विचार करू शकेल. अन्यथा भारतीय संघात बदल करण्यास वाव नाही. सलामीच्या रोहित शर्मा, के. एल. राहुल जोडीला अपयश येत असले, तरी चिंता करण्यासारखे काही नाही. रोहित अपयशी ठरल्यास राहुलने दुसऱ्या बाजूने कमान सांभाळली, तर राहुल अपयशी ठरल्यास रोहितने बाजू लावून धरली आहे. दोघेही फारसे यशस्वी झाले नाहीत तेव्हा पाठीमागे कोहली, सूर्यकुमार, पंड्या यांनी हात दिला आहे.