भारताने १३ एप्रिल रोजी ड्रोन, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी सज्ज अशा लेझर अस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली. ‘स्टार वॉर’ या नावाने सुपरिचित असलेले हे तंत्रज्ञान सध्या जगात मोजक्याच देशांना अवगत आहे. या चाचणीमुळे भारताच्या मारक क्षमतेत, तसेच बचाव सिद्धतेमध्येही आमूलाग्र बदल होणार आहे. त्याविषयी…

यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) हैदराबाद स्थित सेंटर फॉर हाय एनर्जी सिस्टिम्स अँड सायन्सेस (CHESS DRDO) आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे ईप्सित लक्ष्यांवर लेझरचा यशस्वी मारा केला. या हल्ल्यात संबंधित लक्ष्य अर्थात एका फिक्स्ड विंग ड्रोनचे, तसेच इतर प्रकारच्या काही ड्रोन्सचे नुकसान झाले. ड्रोन युद्धाचे महत्त्व युक्रेन युद्धाच्या निमित्ताने अधोरेखित झाले. या ड्रोन हल्ल्यांना रोखण्यासाठी लेझर तंत्रज्ञान हा सक्षम पर्याय ठरू पाहात आहे. ‘चेस डीआरडीओ’ने वाहनावर आरूढ लेझर डायरेक्टेड वेपन (DEW) MKII (A) या यंत्रणेद्वारे लेझरचे झोत फेकले.

देशातच बांधणी

डीईडब्ल्यू एमके टू (ए) ही प्रणाली ‘चेस डीआरडीओ’ इतर काही सरकारी अखत्यारीतील तंत्रज्ञान संस्था, तसेच खासगी कंपन्यांच्या साह्याने तयार केली आहे. शत्रूचे ड्रोन्स, मानवरहित लढाऊ विमाने यांच्यावर विद्युतवेगाने आणि अचूक तसेच दीर्घ पल्ल्याचा मारा करणारी ही प्रणाली देशातच निर्माण करून भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी मजल मारली आहे. सध्या केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडेच हे तंत्रज्ञान असून, इस्रायलही ते विकसित करत आहे असे डीआरडीओचे अध्यक्ष समीर व्ही. कामत यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला सांगितले.

काय आहे ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ तंत्रज्ञान?

रडारने शत्रूच्या ड्रोनची खबर दिल्यानंतर, किंवा प्रणालीमध्ये उपलब्ध संवेदकांनी अशा ड्रोनचा किंवा अनेक ड्रोन्स हल्ल्यांचा इशारा दिल्यानंतर डीईडब्ल्यू एमके टू (ए) प्रकाशाच्या वेगाने लक्ष्य निर्धारित करते आणि शक्तिशाली प्रकाश झोत किंवा लेझर लक्ष्यांवर फेकते. यात ड्रोनच्या संपर्क आणि उड्डाण प्रणालीचे अतोनात नुकसान होईल या प्रकारची रचना असते. अशा रीतीने ड्रोन निकामी किंवा काही वेळ नष्टही केले जातात. याचा एक मोठा फायदा म्हणजे, ड्रोनविरोधी क्षेपणास्त्र किंवा इतर शस्त्रप्रणालींसाठी जो मोठ्या प्रमाणात महागडा दारूगोळा लागतो, त्याची येथे गरजच भासत नाही. ही लेझर प्रणाली अलीकडच्या आधुनिक युद्धशास्त्रामध्ये सातत्याने वापरल्या जाणाऱ्या ‘डायरेक्टेड एनर्जी वेपन’ प्रकारातील आहे. यात शक्तिशाली ऊर्जास्रोत शस्त्र म्हणून वापरले जाते. लेझर, मायक्रोवेव्ज, पार्टिकल बीम्स, साउंड बीम्स ही या प्रकारातील काही उदाहरणे. यात पारंपरिक शस्त्रांप्रमाणे एखाद्या प्रक्षेपास्त्राचा वापर नसतो. शिवाय डीईडब्ल्यू प्रकरातील प्रणाली कमी खर्चिक असतात. पण त्यासाठीचे तंत्रज्ञान अत्युच्च दर्जाचे असते.

‘स्टारवॉर’ युद्धप्रकार

‘स्टारवॉर’ या लोकप्रिय सिनेमा मालिकेत अनेक अत्याधुनिक शस्त्रप्रणालींचा वापर दर्शविण्यात आला आहे. पण यांतील काही भविष्यवेधी किंवा फ्युचरिस्टिक वाटणारी शस्त्रास्त्रे प्रत्यक्षातही विकसित होऊ लागली आहेत. डीआरडीओचे अध्यक्ष कामत यांनी सांगितले, की ते आणखीदेखील अत्याधुनिक शस्त्रप्रणाली विकसित करत आहेत. लेझर प्रणाली हा या उपक्रमाचा एक भाग आहे. आगामी युद्धे सैन्यबळ किंवा शस्त्रबळापेक्षाही तंत्रबळाच्या जोरावर लढली जातील, असे बोलले जाते. हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे, अवकाश अस्त्रे, लेझरसारखी डायरेक्टेड एनर्जी शस्त्रप्रणाली ही यांतील काही उदाहरणे आहेत. भारत एकीकडे पारंपरिक शस्त्रसामग्रीच्या विकसन आणि अधिग्रहणावर लक्ष केंद्रित करत असताना, शस्त्रप्रणालीच्या नव्या क्षितिजांचा धांडोळाही यशस्वीरीत्या घेत आहे, हे या चाचणीने दाखवून दिले.