अनिकेत साठे
स्वदेशी बनावटीच्या तेजस-एम के २ या लढाऊ विमानात जगातील अनेक देशांनी स्वारस्य दाखविल्याने देशाची गरज आणि निर्यातीची संधी लक्षात घेऊन त्यांचे उत्पादन वाढविण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी देशातील सक्षम खासगी उद्योगालाही बांधणीत सहभागी करण्याचे नियोजन आहे. भविष्यात तेजसची निर्यात दृष्टिपथात आल्यास शस्त्रास्त्र निर्यातीत अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला जाऊ शकतो.
तेजसमध्ये कुणाला स्वारस्य?
स्वदेशी बनावटीचे हलके तेजस हे ४.५ पिढीतील विमान मानले जाते. संरक्षण मंत्रालयातर्फे गुजरातमध्ये आयोजित डिफेक्स्पो २०२२ प्रदर्शनात तेजसचे सामर्थ्य अधोरेखित करण्यात आले. या विमानाविषयी मलेशिया, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपाइन्स अशा जवळपास १६ देशांनी आधीच स्वारस्य दाखविले आहे. मलेशियन हवाई दलासाठी १८ लढाऊ व प्रशिक्षणार्थी विमाने खरेदीच्या निविदा प्रक्रियेत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) सहभाग नोंदविला. मलेशियाच्या पसंतीक्रमात तेजस अग्रभागी आहे.
प्रभावित होण्याची कारणे काय?
तेजसच्या एमके -१ आणि एमके-१ ए च्या (अल्फा) निर्मितीनंतर संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) नवीन रचना, अधिक मारक क्षमतेचे तेजस एमके- २ हे लढाऊ विमान विकसित करीत आहे. यातील पहिले विमान वर्षभरात चाचणीसाठी आकाशात झेपावण्याची अपेक्षा आहे. आधुनिक रडार यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रासाठी उपकरणे सामावणाऱ्या तेजसची साडेसहा टन शस्त्रास्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. हवेतून इंधन भरण्याच्या व्यवस्थेमुळे ते तीन हजार किलोमीटरपर्यंतचा पल्ला गाठू शकते. स्वनातीत वेग, अति उंचावरील उड्डाणात वैमानिकाला प्राणवायू देणाऱ्या (ओबीओजीएस) व्यवस्थेची क्षमताही अधिक आहे. स्वदेशी व परदेशी शस्त्रांस्त्रांसाठी एकत्रित व्यवस्था हे त्याचे वेगळेपण राहील. या विमानाचे पंख रुंद असून ते खास प्रकारचे बॉम्ब वाहून नेऊ शकतात. आधीच्या दोन्ही श्रेणींत ती क्षमता नव्हती. दृश्य टप्प्याच्या पलीकडे मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमुळे तेजस – एम के २ भविष्यातील युद्धात सरस कामगिरी करू शकेल. त्याची क्षमता अनेक हवाई दलांना भुरळ पाडत आहे.
उत्पादनाचे नियोजन कसे?
तेजस एम के -२ विमाने भारतीय हवाई दलात मिग २९, जॅग्वार आणि मिराज – २००० यांची जागा घेणार असल्याचे या प्रकल्पाचे संचालक डॉ. व्ही. मधुसूदन राव सांगतात. हवाई दलात तेजसच्या १० तुकड्या (स्क्वाॅड्रन) स्थापण्याचे नियोजन आहे. एचएएलकडे ८३ विमानांची मागणी नोंदविली आहे. हवाई दलाची गरज व परदेशातून होणारी विचारणा या पार्श्वभूमीवर, तेजसच्या उत्पादनाला गती दिली जाईल. तेजसचा प्रकल्प चार दशके रखडला होता. हवाई दलाच्या ताफ्यातून जुनी विमाने २०३५ पर्यंत टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. त्यामुळे केंद्र सरकार उत्पादन वाढविण्यासाठी आग्रही आहे. सध्या तेजस एम के-१ च्या दोन उत्पादन साखळ्या असून एम के-२ च्या उत्पादनासाठी तीन साखळ्या केल्या जातील. जेणेकरून वर्षाकाठी १६ विमान उत्पादनाची क्षमता २४ वर जाईल. खासगी उद्योगाच्या सहकार्याने त्यास अधिक गती देण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने सक्षम खासगी उद्योगाचा शोध प्रगतीपथावर आहे.
स्वदेशी सामग्री किती?
तेजसमध्ये सध्या वापरली जाणारी सुमारे ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्यात येईल. इंजिनसाठी अमेरिकास्थित जीई एव्हिएशनशी करार करण्यात आला आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणान्वये इंजिन स्थानिक पातळीवर तयार केली जातील. स्वदेशी सामग्रीच्या वापराने आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ मिळणार आहे. स्थानिक उद्योगांना त्याचा लाभ होईल.
एचएएल नाशिकलाही काम मिळेल का?
तंत्रज्ञान हस्तांतरण कराराद्वारे एचएएल नाशिक प्रकल्पात दीड दशकात २२० सुखोई विमानांची बांधणी झाली होती. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२० मध्ये हे काम पूर्ण झाले. त्यानंतर नवीन काम न मिळाल्याचा फटका या प्रकल्पासह त्यावर अवलंबून लहान-मोठ्या उद्योगांना बसत आहे. निम्म्या कंत्राटी कामगारांना कमी करावे लागले. सध्या येथे केवळ सुखोईची संपूर्ण देखभाल-दुरुस्ती (ओव्हरहॉल) आणि काही विमानांवर ब्रम्होस तैनात करण्यासाठीचे बदल, अशी कामे होतात. तेजसचे काम एचएएलच्या बंगळुरू प्रकल्पात प्रगतीपथावर आहे. या विमानाला मागणी असल्याने काही काम नाशिक प्रकल्पास मिळेल, अशी व्यवस्थापनाला आशा आहे.
निर्यातीने काय साधले जाईल?
जागतिक बाजाराच्या तुलनेत किफायतशीर दरात लष्करी सामग्री मिळत असल्याने काही राष्ट्रे शस्त्रास्त्रांसाठी भारतावर अवलंबून आहेत. २०१० ते २०१५ या काळात दरवर्षी ४५० ते ६८० कोटींची शस्त्रांची निर्यात झाली होती. मध्यंतरी धोरणात बदल केल्यामुळे २०२०-२१ मध्ये ती ८,४३४ कोटींवर पोहोचली. जवळपास ४० देशांना ही निर्यात झाली. २०२५ पर्यंत भारताची शस्त्रास्त्र निर्यात ३५ हजार कोटींवर नेण्याचे लक्ष्य आहे. तेजसच्या माध्यमातून तिला चालना मिळू शकते. त्याकरिता या विमानाच्या स्पर्धात्मक किंमत निश्चितीचा विचार सुरू आहे. तेजसची निर्यात झाल्यास आर्थिक लाभ होईल. शिवाय सामरिक मित्रांच्या यादीत नवीन देशही जोडता येतील.