‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना हा रविवारी होणार आहे. ९ मार्चला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीत भारत व न्यूझीलंड संघ एकमेकांसमोर असतील. भारत-न्यूझीलंड २५ वर्षांनंतर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने असतील. २००० मध्ये झालेल्या स्पर्धेतील (तेव्हाची ‘आयसीसी’ नॉक-आउट) अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. सध्या सुरू असलेल्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला नमविले होते. मात्र, अंतिम लढत चुरशीची होणे अपेक्षित आहे. भारताला आणखी एक ‘आयसीसी’ जेतेपदाची कितपत संधी आहे, कोणते खेळाडू निर्णायक ठरू शकतात, याचा घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट, गिल, श्रेयसवर फलंदाजीची भिस्त

विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर संघाच्या फलंदाजीची जबाबदारी असेल. विराट या स्पर्धेत चांगल्या लयीत आहे. त्याने आतापर्यंत चार सामन्यांत २१७ धावा केल्या असून नाबाद १०० ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या साखळी सामन्यातही त्याने निर्णायक अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताला सर्वाधिक अपेक्षा या कोहलीकडूनच आहेत. मध्यक्रमात श्रेयस अय्यरने (सर्वोत्तम खेळी ७९) योगदान दिले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांत १९५ धावा केल्या आहेत. सलामीवीर शुभमन गिलच्या (४ सामन्यांत १५७ धावा) पहिल्या सामन्यातील शतकी खेळीनंतर धावा झालेल्या नाहीत. त्यामुळे निर्णायक सामन्यात त्याच्याकडून कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे. कर्णधार रोहित शर्मा (स्पर्धेत १०४ धावा) हा स्फोटक सुरुवातीसाठी ओळखला जातो. मात्र, त्याच्याकडून अंतिम सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारतीय फलंदाज बऱ्याच काळापासून दुबईत असल्याने त्यांना परिस्थितीचा फायदा मिळाला आहे. तसेच, विराट, राहुल व गिल यांच्यावर धिम्या खेळपट्टीचाही चांगला अंदाज आहे.

विल्यम्सन, रचिन, यंगवर न्यूझीलंडची मदार

भारतीय संघ एकीकडे एकाच ठिकाणी सामने खेळत असून न्यूझीलंडचा संघ दुसऱ्यांदा दुबईसाठी प्रवास करीत आहे. न्यूझीलंडने साखळी फेरीतील दोन सामने पाकिस्तानात तर, एक सामना दुबईला खेळला. त्यानंतर उपांत्य लढत पाकिस्तानात झाली आणि आता पुन्हा ते दुबईला खेळणार आहेत. त्यांचा प्रवास जरी थकवणारा असला, तरी त्याचा कामगिरीवर परिणाम झाला नाही. भारताविरुद्धचा साखळीतील पराभव वगळल्यास न्यूझीलंडने चमक दाखवली आहे. त्यांच्याकडून रचिन रवींद्रने (३ सामन्यांत २२६ धावा) सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचे योगदान भारताविरुद्ध महत्त्वाचे असेल. यानंतर टॉम लॅथम (४ सामन्यांत १९१ धावा) व केन विल्यम्सन (४ सामन्यांत १८९ धावा) यांनीही संघासाठी योगदान दिले आहे. तसेच, सलामीवीर विल यंगनेही (१५० धावा) आपले योगदान दिले आहे. मात्र, दुबईच्या मैदानावर भारतीय फिरकीसमोर या सर्व फलंदाजांचा कस लागेल. साखळी सामन्यात केवळ विल्यम्सनला भारतीय फिरकी गोलंदाजीसमोर तग धरता आला होता.

अष्टपैलू ठरणार निर्णायक

भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांमध्ये चांगल्या अष्टपैलूंचा सहभाग आहे. भारताकडे अक्षर पटेल, रवींद्र जडेजा व हार्दिक पंड्यासारखे खेळाडू आहेत. तर, न्यूझीलंडकडे रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स व मायकल ब्रेसवलसारखे अष्टपैलू आहेत. दुबई येथे भारतासाठी नेहमीच अष्टपैलूंनी निर्णायक भूमिका पार पाडली आहे. अक्षर पटेलचा यामध्ये विशेष उल्लेख करावा लागेल. त्याने बळी मिळवण्यासह संघासाठी धावा केल्या आहेत. हार्दिकने दोन्ही विभागांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रचिन स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात खेळला नसला, तरीही त्याचे फलंदाजीतील योगदान निर्णायक ठरत आहे. गोलंदाजीत त्याचा फारसा वापर केला नसला, तरीही त्याची फिरकी गोलंदाजी फायदेशीर आहे. ग्लेन फिलिप्स फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण सर्वच बाबतीत उजवा ठरत आहे. त्याने साखळी सामन्यात विराट कोहलीचा पकडलेला झेल हा सर्वोत्कृष्ट झेलपैकी एक आहे. यासह फिरकी गोलंदाजी व मोठे फटके मारण्याची क्षमता ही त्याला आणखी घातक बनवते.

फिरकीपटूंना मदत?

भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडकाचे आपले सर्व सामने हे दुबईला खेळले. मुळात ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करत असल्याचे दिसून आले. भारताकडून वरुण चक्रवर्तीने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांत सात बळी मिळवले आहेत. यानंतर अक्षर पटेल व कुलदीप यादव (दोघांनीही चार सामन्यांत ५ बळी) आणि रवींद्र जडेजा (चार सामन्यांत ४ बळी) यांनीही गोलंदाजीत चुणूक दाखवली आहे. मात्र, भारताकडून सर्वाधिक गडी हे शमीने मिळवले आहेत. शमीच्या नावे चार सामन्यांत ८ बळी आहे. न्यूझीलंडकडेही कर्णधार मिचेल सँटनर हा चांगला फिरकीपटू आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत सात फलंदाजांना बाद केले आहे. त्याला मायकल ब्रेसवेलनेही (६ बळी) चांगली साथ दिली आहे. सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये मॅट हेन्री (४ सामन्यांत १० बळी) आघाडीवर आहे. मात्र, खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे तो अंतिम सामना खेळणार का याबाबत साशंकता आहे. न्यूझीलंडकडे ग्लेन फिलिप्स व रचिन रवींद्रच्या रूपात फिरकीचे पर्याय आहेत. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ दुबईला खेळल्याने त्यांना खेळपट्टीबाबत कल्पना आहे. दोन्ही संघांकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचे चांगले मिश्रण असल्याने चुरशीचा सामना होणे अपेक्षित आहे.

भारताचे पारडे जड

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत दुबईच्या खेळपट्टीने नेहमीच फलंदाजांना अडचणीत आणले आहे. संपूर्ण स्पर्धेत केवळ भारतीय संघाने येथे सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६५ धावांचा यशस्वी पाठलाग केला. अंतिम सामन्यातही भारताकडून याच खेळीची अपेक्षा भारताकडून असेल. भारताने आतापर्यंत दुबईत दहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला. एकही लढत गमावलेली नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडने खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांत त्यांना पराभूत व्हावे लागले. तर, एका सामन्याचा निकाल लागला नाही. भारताची स्पर्धेतील लय आणि दुबईतील संघाची कामगिरी पाहता भारताचेच पारडे जड दिसत आहे.