जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची अंतिम लढत आणि इंग्लंड हे आता एक समीकरणच झाले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामना साउदॅम्प्टन येथील रोझ बोल, तर दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळविण्यात आला. या दोन्ही सामन्यांमध्ये भारत हा एक समान धागा होता. दोन्ही अंतिम लढती भारत हरला, पण आयोजक मैदानांना भरपूर फायदा झाला. आता तिसऱ्या पर्वात जेतेपदाची लढत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर जूनमध्ये रंगणार आहे. मात्र, या सामन्यातून लॉर्ड्स मैदानाला फायदा नव्हे, तर तोटा होणार आहे. तो नेमका किती आणि कशामुळे याचा आढावा.
‘डब्ल्यूटीसी’चे पहिले दोन अंतिम सामने
‘डब्ल्यूटीसी’ स्पर्धेच्या पहिल्या पर्वाची अंतिम लढत ‘रोझ बोल’ येथे झाली. यात भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते. दुसऱ्या अंतिम लढतीचे यजमानपद लंडनमधील ‘ओव्हल’ला देण्यात आले होते. यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे तुल्यबळ संघ आमनेसामने आले. दोनही वेळा भारताला पराभव पत्करावा लागला होता. आता तिसरा सामना लंडनमध्येच क्रिकेट पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर ११ ते १५ जून दरम्यान होणार आहे.
या सामन्याबाबत नकारात्मक चर्चा का?
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच वेळ असेल. लढत जगज्जेतेपदाची असली, तरी ती यशस्वी होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे म्हटले जात आहे. आयोजकांना तब्बल ४० लाख ब्रिटिश पौंड म्हणजेच साधारण ४५ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नुकसान होण्याची शक्यता का?
याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे भारत. अंतिम सामन्यात भारत खेळू शकणार नसल्यामुळे मेरिलीबोन क्रिकेट क्लबला (एमसीसी) मोठा आर्थिक फटका बसला आहे. भारतीय संघ खेळणार नसल्याने अंतिम सामन्याकडे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर पाठ फिरविण्याची भीती आयोजकांना वाटत आहे. त्यामुळे तिकीट विक्रीवर परिणाम होणार आहे. मेरिलीबोन क्रिकेट क्लब लॉर्ड्स मैदानाचे व्यवस्थापन बघतो. ‘आयसीसी’च्या स्थापनेपूर्वी क्रिकेटचे प्रशासन या क्लबकडेच होते.
भारत नसल्याचा नेमका तोटा काय झाला?
‘डब्ल्यूटीसी’च्या गुणतालिकेत भारतीय संघ भक्कम स्थितीत होता. त्यामुळे भारत अंतिम फेरी गाठणारच असा समज ठेवून आयोजकांनी सामन्याच्या तिकिटांचे दर ठरवले होते. प्रत्यक्षात भारतीय संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही. न्यूझीलंड (०-३) आणि ऑस्ट्रेलिया (१-३) यांच्याविरुद्ध मालिका गमावल्याचा मोठा फटका भारताला बसला. त्यामुळे मेरिलीबोन क्रिकेट क्लबला मैदानातील खुर्च्या रिकाम्या दिसू नयेत यासाठी तिकिटांच्या किमती कमी कराव्या लागल्या आहेत. सध्या तिकिटाचा दर ४० ते ९० पौंड असा असून, तो मूळ तिकिट दरांपेक्षा ५० पौंडने कमी आहे.
नुकसान होण्यामागचे हे एकमेव कारण?
भारत अंतिम सामना खेळणार नाही हे या आर्थिक नुकसानीचे मुख्य कारण आहेच, पण दुसरे कारण म्हणजे हा सामना उन्हाळ्यात होणार आहे. उन्हाचा कडाका लक्षात घेऊन तिकिटाची रक्कम कमी केली तरी प्रेक्षक मोठ्या संख्येने येण्याची खात्री आयोजकांना नाही. त्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे.
भारत अंतिम फेरीत का नाही?
अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचे महत्त्व आणि वर्चस्व वाढले आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि कर्णधार रोहित शर्मा यांसारख्या ताऱ्यांमुळे चाहत्यांचे भारताच्या कामगिरीवर विशेष लक्ष असते. ‘डब्ल्यूटीसी’मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा १-० असा पराभव केला. पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. त्यानंतर घरच्या मैदानावर इंग्लंडला ४-१ असे पराभूत करुन भारताने अंतिम फेरी गाठण्याच्या शर्यतीत अग्रस्थान मिळवले होते. मात्र, त्यानंतर भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून अगदीच एकतर्फी ०-३ असा पराभव पत्करावा लागला. यामुळे अंतिम फेरीचे सगळे समीकरण चुकले. त्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका किमान ४-१ अशा फरकाने जिंकावी लागणार होती. मात्र, प्रत्यक्षात निकाल १-३ असा भारताच्या विरोधात लागला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम लढत खेळण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.