संदीप कदम
भारत-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांविरुद्ध आल्यास चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. उभय संघांमधील द्विदेशीय मालिका या दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे बऱ्याच काळापासून बंद आहेत. हे दोन्ही देश फक्त ‘आयसीसी’च्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. मात्र, मेलबर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) उभय देशांमधील कसोटी सामन्याच्या आयोजनाबाबत रस दाखवला आहे. ‘एमसीसी’कडून हे पाऊल का उचलले गेले, नक्की यामागचे प्रयोजन काय आहे, याचा घेतलेला आढावा.
भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये द्विदेशीय मालिकेचे आयोजन का केले जात नाही?
मुंबईवर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान देशांमधील संबंध पुन्हा एकदा विकोपाला गेले. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध द्विदेशीय मालिका खेळण्यास नकार दिला. पाकिस्तानकडून वारंवार दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिले जाते, या कारणावरून भारताने क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला. उभय संघांमध्ये अखेरचा कसोटी सामना २००७ मध्ये झाला होता. त्यानंतर दोन्ही संघांत कसोटी मालिका झाली नाही. २०१२-१३ मध्ये पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. तेव्हा दोन्ही संघांत तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये १० वर्षांत कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ‘एमसीसी’ने तयारी का दर्शवली?
भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामन्याच्या आयोजनासाठी मेलबर्न क्रिकेट क्लबने (एमसीसी) तयारी दर्शवण्याचे प्रमुख कारण म्हणजे उभय देशांमध्ये असलेले क्रिकेटचे चाहते. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात भारत-पाकिस्तान सामना असला, तरीही चाहते तेथे सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या सामन्याची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाल्यानंतर तिकीट विक्रीही मोठ्या प्रमाणावर होते. या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) आमनेसामने आले होते. या सामन्यासाठी ९० हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘एमसीजी’वर कसोटी सामना झाल्यास, त्याला चाहत्यांचा मोठा पाठिंबा लाभेल, असा ‘एमसीसी’ला विश्वास आहे.
सामन्याच्या आयोजनाबाबत ‘एमसीसी’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मत काय?
‘एमसीजी’च्या व्यवस्थापनाची आणि देखरेखीची जबाबदारी ‘एमसीसी’वर आहे. ‘एमसीसी’ आणि व्हिक्टोरिया राज्य सरकारने मिळून भारत व पाकिस्तान यांच्यात ‘एमसीजी’वर कसोटी सामन्याचे आयोजन करण्याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे विचारणा केली आहे. ‘‘आम्हाला भारत-पाकिस्तान कसोटी सामन्याचे आयोजन करायला नक्कीच आवडेल. या दोन संघांमध्ये ‘एमसीजी’वर सलग तीन सामने झाले, तर आम्हाला खूपच आनंद होईल. या सर्व सामन्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद लाभेल याची मला खात्री आहे. आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे याबाबत विचारणाही केली आहे,’’ असे ‘एमसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट फॉक्स म्हणाले. ‘‘क्रिकेटचे व्यग्र वेळापत्रक लक्षात घेता भारत-पाकिस्तान सामना खेळवणे हे आव्हानात्मक ठरेल यात शंका नाही. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलिया याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) चर्चा करेल अशी आशा आहे. प्रेक्षक जेव्हा स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने येतात, सामन्याचा आनंद उपभोगतात, तेव्हा फार समाधान मिळते. भरलेल्या स्टेडियममध्ये सामने खेळण्याची मजा वेगळीच आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांदरम्यान चाहत्यांमध्ये तुफान ऊर्जा असते,’’ असेही फॉक्स यांनी नमूद केले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रवक्त्यांचे सामन्याच्या आयोजनाबाबत काय म्हणणे आहे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना किंवा मालिका खेळवण्याचा कोणताही निर्णय हा केवळ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्या हातात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्रयस्थ ठिकाणी सामन्याच्या आयोजनात रस दाखवला तरीही, दोन्ही मंडळांमध्ये तसा करार झाला असणेही महत्त्वाचे आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. ‘‘सामन्याच्या आयोजनासाठी दोन्ही देशांची सहमती असणे गरजेचे आहे. परंतु, भारत आणि पाकिस्तान त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळायचा विचार करत असतील तर, तो सामना ऑस्ट्रेलियात आयोजित करण्याची संधी आम्हाला नक्कीच आवडेल. यावर्षी झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान दोन्ही संघांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि विशेष म्हणजे त्यांचे बहुसंख्य चाहते ऑस्ट्रेलियात राहतात,’’ असे प्रवक्त्याने सांगितले.