-भक्ती बिसुरे
करोना महासाथीच्या काळात भारतातील आरोग्य सेवेने मोठे चढउतार पाहिले. तरी, त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार औषध निर्यातीच्या क्षेत्रात भारताने मोठा पल्ला गाठल्याचे स्पष्ट होत आहे. २०१३-१४ या वर्षाच्या तुलनेत भारतीय औषध उत्पादक कंपन्यांच्या निर्यातीत थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १०३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. असे असले, तरी नवे संशोधन करून, त्यावर चाचण्या करून औषध निर्मितीबाबत भारत अद्याप खूपच मागे आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. या उद्योगाच्या उलाढालीचा आढावा घेणारे हे विश्लेषण.
औषध निर्यातीतील भारताची कामगिरी काय?
२०१३-१४ या वर्षाच्या तुलनेत २०२१-२२ या वर्षी भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी केलेल्या औषध निर्यातीत तब्बल १०३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी केलेली आतापर्यंतची ही सर्वाधिक औषध निर्यात आहे. आठ वर्षांत भारतीय कंपन्यांच्या औषध निर्यातीत १० अब्ज अमेरिकन डॉलरची (साधारण ७५ हजार कोटी रुपये) वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये भारतीय औषध उत्पादकांनी ९०,४१५ कोटी रुपयांची औषधे निर्यात केली होती. २०२१-२२ मध्ये ही निर्यात १,८३,४२२ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. गुणवत्ता आणि परवडणाऱ्या किमतींची सांगड घालत औषध उत्पादक कंपन्यांकडून आपल्या प्रगतीचा आलेख उंचावण्यात आला असून अमेरिका आणि युरोपच्या बाजारात भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी आपला दबदबा निर्माण केला आहे. भारतीय औषध उत्पादक कंपन्या प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि नायजेरिया या देशांना औषधे निर्यात करतात. त्याखालोखाल केनिया, टांझानिया, ब्राझील, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियालाही भारतातून औषध निर्यात होते.
औषध उत्पादनातील योगदान?
जेनेरिक किंवा प्रजातीय औषधांचा सर्वांत मोठा निर्यातदार म्हणून जगभरामध्ये भारताची ओळख आहे. जेनेरिक औषधांच्या निर्यातीत भारताचा वाटा तब्बल २० ते २२ टक्के एवढा आहे. मात्र, यामध्ये परदेशातील पेटंट्स संपलेल्या औषधांच्या उत्पादनांची परवानगी घेऊन अशी जेनेरिक औषधेच भारतात प्रामुख्याने बनवली जातात. त्यासाठी कोणतेही नव्याने संशोधन करण्याची गरज भासत नाही. औषध उत्पादनाच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या तर किमतींच्या बाबतीत १४ व्या क्रमांकावर आहे. जागतिक दर्जाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा, स्पर्धा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नवउद्यमींचे योगदान यांमुळे औषध उद्योगाने भारताला जागतिक व्यासपीठावर नवी ओळख मिळवून दिली आहे. सद्यःस्थितीत औषध उद्योगाची भारतातील उलाढाल सुमारे ५० अब्ज अमेरिकन डॉलर एवढी आहे. जागतिक स्तरावर औषध निर्यातीत भारतीय औषधांचा वाटा ५.९२ टक्के तर औषधांची फॉर्म्युलेशन्स आणि बायॉलॉजिकल्सच्या निर्यातीत भारताचे योगदान ७३.३१ टक्के एवढे आहे. औषधे आणि ड्रग इंटमिडिएट्सच्या निर्यातीत भारताचे योगदान तब्बल ४४३७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे आहे. भारतातून होणाऱ्या एकूण औषध निर्यातीपैकी सुमारे ५५ टक्के निर्यात अमेरिका आणि युरोपियन देशांसारख्या मोठ्या देशांना केली जाते.
करोना काळातील निर्यात?
करोना काळात जगातील बहुसंख्य उद्योगधंदे ठप्प झाले. मात्र, औषध उद्योग साहजिकच याला अपवाद ठरला. भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी करोना काळातील औषध निर्यातीत आपल्या दर्जा आणि सातत्याच्या जोरावर जगभर ठसा उमटवल्याचे दिसून आले. २०२०-२१ या काळात भारतीय औषध निर्यातीत सुमारे १८ टक्के एवढी वार्षिक वाढ नोंदवण्यात आली. भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी सुमारे २४.४ अब्ज अमेरिकन डॉलरची औषधे आणि उत्पादने निर्यात केली. यामध्ये लस उत्पादक कंपन्यांचा वाटाही मोठा आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) यांच्या सहकार्यातून तयार करण्यात आलेल्या लशी, औषधे आणि वैद्यकीय तंत्रज्ञान उत्पादने यांनी जगभरातील देशांना महामारीच्या व्यवस्थापनामध्ये आपले योगदान दिले आहे. त्याचाच भाग म्हणून जगातील सुमारे ९५ ते १०० देशांना करोना प्रतिबंधात्मक लशींच्या मात्रांची निर्यात भारताकडून करण्यात आली आहे. यूएई, ऑस्ट्रेलिया या देशांशी करण्यात आलेल्या नव्या व्यापारी करारांमुळे नजीकच्या भविष्यात निर्यातीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वांत मोठे निर्यातदार कोण?
औषध निर्यातीच्या क्षेत्रात भारतातील काही कंपन्यांचे योगदान मोठे आहे. यामध्ये प्रामुख्याने सन फार्मास्युटिकल्स, डॉ. रेड्डीज, ल्युपिन, सिप्ला, झायडस या कंपन्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक विकास महामंडळांमध्ये फार्मा कंपन्यांचा पसारा मोठा आहे. पुणे आणि परिसरातील एमक्युअर फार्मास्युटिकल्स, लुपिन, केलिडस रिसर्च लॅब यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर औषध उद्योगातील योगदान देण्यात येत आहे. लस उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात जागतिक स्तरावरील प्रमुख कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, हैदराबादस्थित भारत बायोटेक यांचेही निर्यातीतील योगदान मोठे आहे.
निर्यात कशाची?
भारतातून प्रामुख्याने जेनेरिक औषधांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यापाठोपाठ औषधांची फॉर्म्युलेशन्स आणि बायॉलॉजिकल्स, मुख्य औषधांच्या निर्मितीसाठी कच्च्या मालाच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणावर लागणारी औषधे ही भारतातून निर्तात केली जातात. औषध निर्यातीच्या बरोबरीने भारतातून निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या सामग्रीचा (सर्जिकल्सचा) वाटा मोठा आहे. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा भारत हा मोठा उत्पादक असल्याने भारतातून निर्यात होणाऱ्या फार्मा उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक आणि हर्बल उत्पादनांचा, औषधांचा टक्काही मोठा आहे. विशेष म्हणजे, करोनानंतर त्यात आणखी वाढ होण्याचे संकेत फार्मा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देण्यात येत आहेत.
संशोधनात आघाडी कधी?
भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार सांगतात, की नव्या मोलेक्यूलचा शोध लावणे, त्याच्या चाचण्या करणे आणि त्यापासून औषधनिर्मिती करणे ही अत्यंत खर्चिक प्रक्रिया आहे. त्यामुळे तसे प्रयत्न झाले तरी त्यांना फारसे यश येताना दिसत नाही. त्यामुळे त्याबाबत भारताचे योगदान जवळजवळ नाहीच, त्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करणे आवश्यक आहे. मात्र, औषधांची जागतिक बाजारपेठ, औषधांच्या किमती या गोष्टी पाहता भारतीय उत्पादकांकडून तयार होणारी औषधे दर्जाच्या बाबतीत बिनतोड आणि तरी परवडणारी आहेत. म्हणूनच औषध उत्पादन आणि निर्यातीतील भारताचे योगदान अनन्यसाधारण आहे.