India Post Scam काही दिवसांपासून पोस्ट खात्याच्या नावे एक मेसेज प्रसारित होत आहे. हा मेसेज बोगस असल्याचे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकच्या तपासात उघड झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मेसेजद्वारे विशिष्ट वर्गाला लक्ष्य केले जात आहे. अनेकांनी बोगस मेसेज मिळाल्याची माहिती ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. काय आहे हा नवीन घोटाळा? या घोटाळ्यापासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवता येईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.
काय आहे हा घोटाळा?
लोकांना अनोळखी फोन नंबर आणि ईमेल पत्त्यांवरून भारतीय पोस्टच्या नावाने एक मेसेज पाठवला जात आहे. “तुमचे पॅकेज गोदामात पोहोचले आहे. आम्ही हे पॅकेज तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी दोनवेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु अपूर्ण पत्ता असल्यामुळे पॅकेज पाठवता आलेले नाही. ४८ तासांच्या आत तुमचा पत्ता अपडेट करा, अन्यथा तुमचे पॅकेज परत जाईल. पत्ता अपडेट करण्यासाठी https://indiapostpu.vip/IN… या लिंकचा वापर करा. आम्ही २४ तासांच्या आत तुमचे पॅकेज पोहोचवू, इंडिया पोस्ट”, अशा आशयाचा हा मेसेज आहे.
हेही वाचा : शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह चर्चेत कशा आल्या? त्यांच्यावरील अश्लील शेरेबाजीचा वाद काय?
या अज्ञात लिंकवर क्लिक केल्यानंतर भारतीय पोस्ट साइटसारखीच एक वेबसाइट दिसते. वेबसाइटवर डिलिव्हरी अयशस्वीची सूचना दिसते आणि ट्रॅकिंग आयडीही दिसतो. तसेच यात तुमचा पत्ता देण्यास सांगितले जाते. या घोटाळ्याचा उद्देश प्राप्तकर्त्यांची वैयक्तिक माहिती चोरणे आणि त्याद्वारे त्यांचे आर्थिक नुकसान करणे हा आहे. गेल्या महिन्यात प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) फॅक्ट चेकने हा मेसेज संदेश बनावट असल्याबद्दल पोस्ट केले होते.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय पोस्ट कधीही पॅकेज वितरीत करण्यासाठी पत्ते अपडेट करण्यास सांगणारे मेसेज पाठवत नाही, अशा फसव्या लिंकवर क्लिक करू नका”. विशेष म्हणजे, ही फसवी लिंक केवळ मोबाइल डिव्हाइसवर कार्य करते. डेस्कटॉपवर ही लिंक उघडणार नाही. मेसेज खरा आहे की खोटा हे तपासायचे असल्यास प्राप्तकर्ता दोन्ही उपकरणांवर लिंक उघडून बघू शकतात.
हेही वाचा : संगीत ऐकणे, हुक्का पिणे आणि महिलांच्या सजण्यावरही बंदी; अफगाणिस्तानमध्ये नक्की घडतंय तरी काय?
फसवणूक कशी टाळता येईल?
या घोटाळ्यात किंवा आजकाल प्रचलित असलेल्या इतर तत्सम घोटाळ्यांना आपण बळी पडू नये याची खात्री करण्यासाठी येथे काही सुरक्षा उपाय दिले आहेत. या उपायांचे पालन केल्यास तुम्ही फसवणूक टाळू शकता.
-तुमची वैयक्तिक माहिती मागणार्या लिंकवर कधीही क्लिक करू नका.
-संदेशामध्ये भाषा आणि व्याकरणाच्या चुका शोधा. त्यातून संदेश फसवे आहेत की नाही हे लगेच कळते.
-संदेशाचा स्त्रोत तपासा
-एखाद्या मेसेजमध्ये मागवलेली माहिती पाठविण्यापूर्वी तुम्ही खरोखरच एखादे पॅकेज मागवले आहेत का हे तपासा. घोटाळेबाज घाबरलेल्या लोकांनाच लक्ष्य करतात.
-मूळ वेबसाइटची लिंक आणि मेसेजमध्ये दिलेली लिंक सारखी आहे का, हे नेहमी तपासा.
-जर तुम्ही अशा घोटाळ्याला बळी पडलात तर ताबडतोब तुमचे डिव्हाइस बंद करा, तुमच्या बँकेला अलर्ट करा आणि पोलिसांत तक्रार नोंदवा.