भारतातील श्रीमंत आणखी श्रीमंत होत असल्याची बाब समोर आली आहे. जगातील अतिश्रीमंतांपैकी ३.७ टक्के भारतात असून, अतिश्रीमंतांच्या संख्येत भारत चौथ्या स्थानी आहे. दहा लाख डॉलरपेक्षा (सुमारे साडेआठ कोटी रुपये) जास्त संपत्ती असलेल्या व्यक्ती अतिश्रीमंत ठरतात. देशातील अतिश्रीमंतांची संख्या २०२४ मध्ये ८५ हजार ६९८ वर पोहोचली. त्याआधी २०२३ मध्ये ही संख्या ८० हजार ६८६ होती. गेल्या वर्षी त्यात ६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. नाइट फ्रँकने जाहीर केलेल्या संपत्ती अहवालातून ही बाब समोर आली आहे.
सर्वाधिक संख्या कुठे?
जगात सर्वाधिक अतिश्रीमंत अमेरिकेत असून, त्यांची संख्या तब्बल ९ लाख ५ हजार ४१३ आहे. त्यानंतर चीन दुसऱ्या स्थानी असून, तिथे ४ लाख ७१ हजार ६३४ अतिश्रीमंत आहेत. जपान हा १ लाख २२ हजार ११९ अतिश्रीमंतासह तिसऱ्या स्थानी असून भारत चौथ्या स्थानी आहे. चीनच्या दुप्पट अतिश्रीमंत व्यक्ती अमेरिकेत आहेत. याचवेळी याबाबतीत पहिल्या दोन देशांच्या तुलनेत भारतीय अतिशय मागे आहे. अमेरिका आणि चीनमधील अतिश्रीमंतांची संख्या भारताच्या तुलनेत अनुक्रमे दहापट आणि पाचपट अधिक आहे.
भारताचे चित्र आशादायी?
भारतातील अतिश्रीमंतांच्या संख्येत सातत्यपूर्ण वाढ होत आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या अखेरीस ८५ हजार ६९८ असून, ती २०२८ पर्यंत ९३ हजार ७५३ वर जाण्याचा अंदाज आहे. देशाच्या दीर्घकालीन आर्थिक प्रगतीमुळे अतिश्रीमंतांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निरीक्षण अहवालात वर्तविण्यात आले आहे. देशातील नवउद्यमींची संख्या वाढत असताना उदयोन्मुख उद्योगांची प्रगती होत आहे. त्यामुळे जगभरातून भारतात गुंतवणूक वाढत आहे. गुंतवणुकीच्या वाढत्या संधी आणि विस्तारलेली बाजारपेठ हे घटकही भारतात संपत्ती निर्माण करण्यास हातभार लावत आहेत.
अब्जाधीशांमध्ये किती वाढ?
गेल्या वर्षी भारतातील अब्जाधीशांच्या संख्येत १२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात आजच्या घडीला १९१ अब्जाधीश आहेत. त्यातील २६ जण हे गेल्या वर्षी अब्जाधीश बनले आहेत. विशेष म्हणजे, देशातील अब्जाधीशांच्या संख्येत २०१९ मध्ये केवळ ७ जणांची भर पडली होती. देशातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती अंदाजे ९५० अब्ज डॉलर आहे. जगात अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिका हा ५.७ लाख कोटी डॉलरसह पहिल्या स्थानी आणि चीन १.३४ लाख कोटी डॉलरसह दुसऱ्या स्थानी आहे. जगात गेल्या वर्षी बनलेल्या नवीन अब्जाधीशांपैकी ८२ टक्के पुरुष आहेत. हे प्रमाण चार वर्षांपूर्वी ९० टक्के होते. आता त्यात घट होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ३० वर्षांखालील अब्जाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण ४७ टक्के आहे. त्यामुळे आगामी काळात एकूण अब्जाधीशांमध्ये महिलांचे प्रमाण वाढत जाण्याची चिन्हे आहेत.
जगभरात काय स्थिती?
जगाचा विचार करता अतिश्रीमंतांच्या एकूण संख्येत गेल्या वर्षी ४.४ टक्के वाढ झाली. त्यांची संख्या २३ लाख ४१ हजार ३७८ वर पोहोचली आहे. जगातील सर्वच विभागांमध्ये अतिश्रीमंतांची संख्या वाढत आहे. अतिश्रीमंतांची संख्या उत्तर अमेरिका विभागात सर्वाधिक आहे. मात्र, अतिश्रीमंतांच्या संख्येतील वार्षिक वाढीमध्ये आशिया विभाग ५ टक्के वाढीसह पहिल्या स्थानी आहे. आफ्रिका ४.७ टक्के, ऑस्ट्रेलेशिया ३.९ टक्के, मध्य पूर्व २.७ टक्के, दक्षिण अमेरिका १.५ टक्के आणि युरोप १.४ टक्के अशी वाढ आहे.
अतिश्रीमंतांचा खर्च कशावर?
भारतातील अतिश्रीमंतांचा आलिशान मोटारी खरेदी करण्याकडे जास्त कल आहे. देशातील १८ ते ३५ वयोगटातील अतिश्रीमंतांपैकी ४६.५ टक्के व्यक्ती घर घेण्यापेक्षा महागडी मोटार घेण्याला पसंती देत आहेत. याचबरोबर २५.७ टक्के जणांनी घर घेण्याला दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिली आहे. जागतिक पातळीवरील तरुण अतिश्रीमंतांमध्येही आलिशान मोटारी आणि खासगी विमाने घेण्यास जास्त पसंती दिली जाते आहे. याचवेळी अतिश्रीमंत महिलांकडून हँडबँग घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. कलावस्तू, व्हिस्की आणि वाईन यावरही अतिश्रीमंतांकडून मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. जगभरातील लक्झरी ब्रँडच्या वस्तूंचा संग्रह करण्यावरही त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे.
sanjay.jadhav@expressindia.com