तुम्ही जर परदेशातून सोन्याचे दागिने आयात करण्याचा विचार करत असाल तर सरकारच्या या नवीन निर्णयाविषयी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आता सरकारने विशिष्ट प्रकारच्या सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. हे दागिने भारतात आणायचे असल्यास सरकारकडून मान्यता किंवा परवाना घ्यावा लागणार आहे. भारत सरकारकडून हा निर्णय का घेण्यात आला? या नवीन आदेशाबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दागिन्यांच्या आयातीवर बंदी का घालण्यात आली?

न्यूज 18 नुसार, परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, मोती, विशिष्ट प्रकारचे हिरे आणि इतर मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांनी जडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या आयात धोरणात काही बदल करण्यात आले आहेत. आता प्रतिबंधित श्रेणीतील दागिन्यांसाठी सरकारकडून परवाना/परवानगी आवश्यक आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार सोन्याच्या आयातीवर १५ टक्के कर आकारला जातो.

हेही वाचा : विद्यापीठात घेता येणार वर्षातून दोनदा प्रवेश, विद्यार्थ्यांना कसा होणार फायदा? निर्णयामागील कारण काय?

भारताचा इंडोनेशियाशी मुक्त व्यापार करार आहे. भारत-दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना (एएसइएएन) मुक्त व्यापार करारांतर्गत इंडोनेशियातून सोन्याची आयात वाढल्यानंतर ही बंदी घालण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या म्हणण्यानुसार, अधिकृत आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, आता बंदी असलेल्या दागिन्यांच्या आयातीत गेल्या वर्षभरात ३० पट वाढ झाली आहे.

२०२२-२३ मध्ये ५२ दशलक्ष डॉलर्स असलेला हा आकडा २०२३-२४ मध्ये १.५ अब्ज डॉलर्स इतका वाढला. हिरे आणि मोत्यांसारख्या मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान रत्नांनी जडलेल्या दागिन्यांसह इतर प्रतिबंधित श्रेणींमध्ये दागिन्यांची आयात गेल्या आर्थिक वर्षात प्रथमच झाली.

सोन्याचे भाव वाढणार का?

भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीतही वाढ होत आहे. सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे एप्रिलमध्ये व्यापार तूट पाच महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने वृत्त दिले आहे की, काही सोन्याच्या वस्तू भारतात शुल्कमुक्त आणल्या जात आहेत आणि दागिने तयार करण्यासाठी वितळवल्या जात आहेत. सोन्याच्या आयातीत अचानक झालेल्या वाढीमुळे सरकार चिंतेत आहे. परिणामी, या निर्णयामुळे आयात कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे आणि म्हणूनच सोन्याचे भाव वाढणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

“या श्रेणीतील आयात अशा दर्जात कधीच झाली नाही. आम्हाला अचानक सोन्याची आयात वाढल्याचे आढळून आले. या सोन्याच्या आयातीतील एक भाग एफटीए देशांकडून शून्य शुल्कात येत होता आणि शुल्क भरूनही काही भाग येत होता. असामान्य वाढीमुळे, वाणिज्य मंत्रालयाने महसूल विभाग आणि विविध विभागांशी सल्लामसलत केली आणि हा निर्णय घेतला,” अशी माहिती एका अधिकार्‍याने दिली आहे. एका उद्योग सूत्राने ‘हिंदू बिझनेस लाइन’ला सांगितले की, “सोन्याचे दागिने आणि वस्तूंवरील आयात निर्बंध देशांतर्गत दागिने व्यापार्‍यांना अधिक संरक्षण देण्यासाठी आणि दागिन्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आहे.”

जुलैमध्ये डीजीएफटीने सोन्यापासून तयार केलेल्या अनस्टड दागिन्यांवर तसेच सोन्यापासून तयार केल्या जाणार्‍या इतर वस्तूंवर आयात निर्बंध लादले. यात भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील आयातींना सूट देण्यात आली होती. परंतु, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यातील मुक्त व्यापार करारांतर्गत टॅरिफ रेट कोटा (टीआरक्यू) मध्ये आयात अधिकृतता असूनही जडलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या आयातीसाठी मंजुरीची आवश्यकता असणार आहे, असे डीजीएफटीने सांगितले.

हेही वाचा : ३ दिवसांत ३ दहशतवादी हल्ले: जम्मू-काश्मीरमध्ये नक्की काय घडतंय? या हल्ल्यांमागे नक्की कोण?

जागतिक सुवर्ण परिषदेच्या म्हणण्यानुसार, किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाही मजबूत आर्थिक वातावरणामुळे मार्च तिमाहीत भारताची सोन्याची मागणी वार्षिक आठ टक्क्यांनी वाढून १३६. ६ टन झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मोठ्या प्रमाणात केलेल्या सोन्याच्या खरेदीमुळेही मागणी वाढली. व्हॉल्यूम वाढ तसेच तिमाही सरासरी किमतीत ११ टक्क्यांनी वाढ झाल्याने भारतातील सोन्याची मागणी या वर्षीच्या जानेवारी-मार्च या कालावधीत वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढून ७५,४७० कोटी रुपयांवर गेली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India restricted import of gold jewellery rac