बहुविध युद्धक्षेत्रात भारताच्या तीनही सैन्यदलांची ताकद एकत्रितपणे वापरण्याची संकल्पना विशेष प्रशिक्षणातून आकारास येत आहे. तामिळनाडूच्या वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयातून पहिली ४० ‘पर्पल’ अधिकाऱ्यांची तुकडी पदवीधर झाली आहे. सामाईक कारवाई हा एकात्मिक युद्ध विभागाचा गाभा आहे. प्रशिक्षणातून सैन्यदलांच्या एकात्मीकरणास प्रोत्साहन मिळणार आहे.

पर्पल अधिकारी कोण?

संयुक्तपणे विशेष लष्करी शिक्षण घेणारे तीनही दलातील अधिकारी हे ‘पर्पल’ अधिकारी म्हणून ओळखले जातात. हे प्रशिक्षण पहिल्यांदा पूर्ण करणाऱ्या पर्पल अधिकाऱ्यांच्या तुकडीत भारतीय लष्करातील २०, हवाई दल आणि नौदलाच्या प्रत्येकी १० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय, यात अमेरिका, दक्षिण कोरिया, युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलियाचे चार अधिकारीही सहभागी झाले होते. त्यांनी संयुक्त कवायतींमध्ये मांडलेले अनुभव भारतीय अधिकाऱ्यांना फायदेशीर ठरतील. ही संकल्पना सशस्त्र दलांच्या किमान दोन शाखांच्या शक्तीला एकत्रित करते. प्रशिक्षण सहकार्याला चालना देते, ज्यामुळे सैन्य जटील, बहुविध युद्धभूमीत एकसंघपणे कार्यरत राहण्यास सक्षम होते.

प्रशिक्षणाचे स्वरूप

भारताच्या संयुक्त लष्करी चौकटीची ओळख करून देण्यासाठी या तुकडीला सैन्यदलांच्या प्रमुख आस्थापनांची भेट घडविली गेली. तुकडीने अंदमान आणि निकोबार कमांड या भारताच्या एकमेव जॉइंट सर्व्हिसेस कमांड आणि दिल्लीतील एकात्मिक डिफेन्स स्टाफचाही (आयडीएस) दौरा केला. मेरीटाईम नियंत्रण केंद्रात पुरवठा व्यवस्था, गुप्तचर आणि सायबर सुरक्षेसह सामाईक कारवाईच्या महत्त्वाच्या पैलूंविषयी शिक्षण दिले गेले. गुंतागुंतीच्या स्थितीत मार्ग काढण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात आले. एकात्मिक युद्ध विभागाची ही पायाभरणी आहे. विशेष प्रशिक्षण घेणारे हे पर्पल अधिकारी तूर्तास आपापल्या दलात पारंपरिक जबाबदारी सांभाळतील. त्यांची निपूणता भविष्यात संयुक्त कार्यवाहीत महत्त्वाचे स्थान देणारी ठरु शकेल.

आधुनिक युद्धासाठी सज्जता

‘पर्पल’ अधिकाऱ्यांच्या पहिल्या पदवीदान सोहळ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भविष्यातील युद्धासाठी सक्षम व सज्ज राहण्यासाठी सशस्त्र दलाच्या जलद परिवर्तनाची आवश्यकता मांडली. धोके आणि युद्धाचे स्वरुप बदलत असल्याने नवीन दृष्टिकोन, सिद्धांत व कारवाई संकल्पनांच्या आधारे संरचना तयार करणे महत्वपूर्ण ठरते. युक्रेन-रशिया संघर्षात तोफखान्याने जेवढे नुकसान झाले नाही, तेवढे ड्रोनने केले. पृथ्वीलगतच्या अंतराळ क्षमतेच्या लष्करी डावपेचात बदल झाल्याचे दाखले संरक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. पर्पल अधिकारी भारतीय सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणातील एक भाग आहे. आंतर सेवा सहकार्यास प्रोत्साहन देऊन हे अधिकारी भारतीय सैन्याला नाविन्यता, समन्वय व डावपेचात्मक लवचिकतेने युद्ध लढण्याच्या पद्धतीकडे नेण्यास सज्ज झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अभ्यासातून एकात्मीकरण

आधुनिक युद्धात एकात्मिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो. लष्कर, हवाई दल आणि नौदल या तीन दलांच्या क्षमता एकत्रित करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांचा एकात्मिक युद्ध विभाग अर्थात थिएटर कमांड स्थापण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक युद्धपद्धती, युद्धतंत्राशी जुळवून घेण्यासाठी गतवर्षी भारत शक्ती संरक्षण परिषदेत भविष्यातील युद्धतंत्र या तिन्ही दलांसाठी विकसित केलेल्या अभ्यासक्रमाची घोषणा झाली होती. यात जटील परिस्थितीचा सामना, नवतंत्रज्ञानाचा लाभ आणि नाविन्यर्ण डावपेचांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. एकात्मिक युद्ध विभागात वेगवेगळ्या दलातील अधिकारी एका छताखाली काम करतील. वेलिंग्टनमधील प्रशिक्षणातून एकात्मीकरणाचे बंध घट्ट केले जात आहेत.

उत्कृष्ट कार्यपद्धतीचे लक्ष्य

प्रभावी सामाईक कारवाईसाठी केवळ प्रशिक्षण नव्हे तर, परस्परांच्या दलात नियुक्तीतून समन्वय वाढविला जात आहे. साधारणत: दीड वर्षांपूर्वी एका दलातील अधिकाऱ्यांना दुसऱ्या दलात नियुक्त करण्याच्या (क्रॉस पोस्टिंग) प्रक्रियेला सुरुवात झाली होती. तिन्ही दलात मानवरहित विमाने (यूएव्ही), रडार, शस्त्रप्रणाली, वाहने आणि दूरसंचार प्रणाली बहुतांशी एकसमान आहेत. त्यामुळे दलात बदल होऊन अधिकाऱ्यांच्या कामात फारसा फरक पडत नाही, असेही सांगितले जाते. प्रशिक्षण, मनुष्यबळ अदलाबदलीतून उत्कृष्ट कार्यपद्धती विकसित करण्यावर भर दिला जात आहे.