कामिकाझे ड्रोन आधुनिक युद्धाला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन गेले आहे. रशिया-युक्रेन युद्ध, तसेच इस्रायल-हमास युद्धात या ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. आता भारताने देशातच ही प्रगत शस्त्र प्रणाली विकसित केली आहे. ही शस्त्रे केवळ पूर्व-निर्धारित मार्गाचे अनुसरण करत नाहीत, तर ते योग्य वेळी उड्डाण घेत, ट्रॅकिंग आणि हल्ला करू शकतात. काय आहे ही प्रगत शस्त्र प्रणाली? यामुळे भारतीय सैन्याची ताकद कशी वाढणार? हे ड्रोन्स कसे बदलणार युद्धाचे स्वरूप? जाणून घेऊ.
सुसाइड ड्रोन म्हणजे काय?
लोइटरिंग म्युनिशन्स याला सुसाइड ड्रोन, कामिकाझे ड्रोन किंवा एक्सप्लोडिंग ड्रोन असेही म्हणतात. हे एक प्रकारचे हवाई शस्त्र आहे. यामध्ये मोनिशन्स (वॉरहेड) म्हणजेच शस्त्रसामग्री असते, जे लक्ष्य शोधेपर्यंत थांबून नंतर लक्ष्यावर हल्ला करू शकते. लोइटरिंग म्युनिशन्स लक्ष्य क्षेत्राजवळ कमी कालावधीसाठी बाहेर पडणाऱ्या किंवा लपलेल्या लक्ष्यांविरुद्ध जलद प्रतिक्रिया देत, त्यांच्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे. १९८० च्या दशकात सर्वात जुनी मोनिशन्स प्रणाली वापरली गेली. कालांतराने या एलएमला आता कमी पल्ल्याच्या (२-१५ किलोमीटर), मध्यम पल्ल्याच्या (१५-५० किलोमीटर) आणि लांब पल्ल्याच्या (५०-१०० किलोमीटर) विविध मोहिमांसाठी जसे की बंकर विरोधी, चिलखत विरोधी, हवाई तळ, क्षेपणास्त्र तळ आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसारख्या महत्त्वाच्या शत्रू मालमत्तेचा नाश करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
युद्धांमध्ये वापरलेली शस्त्रास्त्रे
२०२० नागोर्नो-काराबाख संघर्ष : अझरबैजान आणि आर्मेनिया या दोन्ही देशांनी गुप्तचर यंत्रणा, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि लक्ष्यित हल्ल्यांसाठी ड्रोनचा वापर केला. ड्रोनचा वापर, ज्यामध्ये यूएव्ही आणि शस्त्रास्त्रे यांचा समावेश होता. शत्रूच्या स्थानांवर अचूक हल्ले करून या सुसाइड ड्रोन्सने संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेषतः अझरबैजानने विविध प्रकारचे ड्रोन वापरले, ज्यात इस्रायली ड्रोन हारोप, तसेच बायरक्तार टीबी२ सारखे तुर्की ड्रोन यांचा समावेश होता.

२०२२ रशिया-युक्रेन युद्ध : “त्यांचा आकार लहान असूनही, या सुसाइड ड्रोनने युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आणि या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली,” असे एका संरक्षण विश्लेषकाने सांगितले. रशियन सैन्याने युद्धात या ड्रोनचा वापर मोठ्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी केला, तर युक्रेनने या ड्रोनचा वापर मानवी लक्ष्यांचा शोध घेण्यासाठी केला.
मध्य पूर्वेत इस्रायलने अचूक हल्ला करण्यासाठी २३ किलो पेलोड वाहून नेण्यास सक्षम असलेल्या हारोप युद्धसामग्रीचा वापर केला. तसेच, रशियाने मोठ्या प्रमाणात इराणच्या शाहेद-१३६ ड्रोनचा वापर केला. हे ड्रोन अतिशय स्वस्त असूनदेखील मोठ्या प्रमाणात उत्पादित केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणालींनादेखील मागे टाकू शकतात.
कामिकाझे ड्रोन आणि टँकमधील फरक
तज्ज्ञांचे असे सांगणे आहे की, कमी किमतीचे ड्रोन आणि युद्धसामग्री आधुनिक युद्धाच्या काळात अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे. हे युक्रेन-रशिया युद्धात दिसून आले आहे. ‘द इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी रशियाने इराणी बनावटीच्या शाहेद ड्रोनचा वापर आणि युक्रेनने तुर्की बायरक्तार टीबी२ ड्रोनचा वापर केला आणि या तंत्रज्ञानाची प्रभावीता दर्शविली आहे.
तज्ज्ञांनी हेदेखील निदर्शनास आणून दिले की, ५०० डॉलर्स किमतीचा एकच ड्रोन १० दशलक्ष डॉलर्सचे टँक नष्ट करू शकतात, यामुळे इलेक्ट्रॉनिक युद्ध साधने, कायनेटिक इंटरसेप्टर्स आणि ऊर्जा शस्त्रे यांसह मजबूत काउंटर ड्रोन प्रणालींची तातडीची गरज असल्याचे स्पष्ट होते. सध्या सेवेत असलेल्या स्कायस्ट्रायकर ड्रोनची रेंज ५०० किलोमीटर आहे. मार्च २०२२ मध्ये, ‘ZMotion Autonomous Systems’ ने लडाखमध्ये तीन लोटेरिंग युद्धसामग्रीची यशस्वी चाचणी केली. आयात केलेल्या पर्यायांपेक्षा हे ड्रोन ४० टक्के कमी किमतीत तयार झाले आहेत. टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या एएलएस-५० ड्रोनच्यादेखील पोखरण येथे यशस्वी चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
२०२१ मध्ये, भारतीय सैन्याच्या ७५ ड्रोनने ५० किलोमीटर पल्ल्यापर्यंत हल्ले करून आपली क्षमता दाखवली, असे ‘द इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. २०२३ पर्यंत, न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजने आणखी प्रगत प्रणाली प्रदान केली. त्यांनी युद्धभूमीसाठी तब्बल १०० डिझाइन ड्रोनची तयारी केली. आता ध्वनिक सेन्सरच्या मदतीने शत्रूच्या ठावठिकणाचा शोध घेण्यास सक्षम असलेल्या एआय ड्रोनवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. राष्ट्रीय एरोस्पेस लॅबोरेटरीज १५० किलोग्राम वजनाच्या एका गुप्त, लांब पल्ल्याच्या युद्धसामग्रीवर काम करत आहे, जी सहा ते नऊ तासांच्या सहनशक्तीसह ९०० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
भारताचे संरक्षण क्षेत्र
संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच म्हटले आहे की, भारतातील ६५ टक्के संरक्षण उपकरणे आता देशांतर्गत उत्पादित केली जात आहेत. पूर्वी ७० टक्के संरक्षण उपकरणे आयात केली जात होती आणि त्यावर अवलंबून राहावे लागत होते, त्यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण बदल आहे. २०२३-२४ मध्ये संरक्षण उत्पादन १.२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. संरक्षण निर्यातीतही २१,०८३ कोटी रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे आता भारताने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांची निर्यात करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
अलीकडेच सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने भारत फोर्ज आणि टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सच्या सहकार्याने डीआरडीओने विकसित केलेल्या ३०७ अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम्स (एटीएजीएस) खरेदीला मान्यता दिली आहे. ४० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज आणि अॅडव्हान्स्ड ऑटोमेशन असलेल्या या पुढच्या पिढीतील तोफखाना प्रणाली भारतीय सैन्याची शक्ती अधिक वाढवतील.