भारताची आर्थिक राजधानी मुंबई नवीन विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी सज्ज आहे. एप्रिलमध्ये बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. हे मुंबईतील दुसरे विमानतळ असणार आहे. मात्र, मुंबईत तिसरे विमानतळ उभारण्याचीदेखील योजना आखली जात आहे. प्राप्त अहवालात असे म्हटले आहे की, ‘मॅक्सिमम सिटी’ हे भारतातील पहिले ऑफशोअर विमानतळ असेल. शहराच्या मध्यभागी असलेल्या विद्यमान विमानतळापासून अंदाजे १२० किलोमीटर अंतरावर वाढवण बंदराजवळील एका कृत्रिम बेटावर हे नवीन विमानतळ बांधण्यासाठी योजना आखण्यात आली आहे. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार म्हटले आहे की, ही कल्पना चीनच्या डॅलियन जिंझोउ बे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपानच्या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी असेल, ही विमानतळे मानवनिर्मित बेटांवर बांधली गेली आहे. काय आहे हा प्रकल्प? त्याचे महत्त्व काय? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे तिसरे विमानतळ असणारे कृत्रिम बेट

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, नवीन विमानतळ मुंबईच्या बाहेरील पालघरमधील वाढवण बंदराजवळ एका कृत्रिम बेटावर बांधले जाणार आहे. या प्रकल्पाला पर्यावरण आणि संरक्षण विभाग तसेच महाराष्ट्र सरकारकडून प्राथमिक मंजुरी मिळाल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. वाढवण बंदर हा ७६,००० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे, जो पूर्ण झाल्यावर जगातील टॉप १० बंदरांपैकी एक असेल. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी याची पायाभरणी केली होती. हा प्रकल्प दोन टप्प्यात विकसित केला जाणार आहे. पहिला टप्पा २०३० मध्ये आणि दुसरा २०३९ मध्ये पूर्ण होईल.

मुंबईतील विमानतळाची कल्पना चीनच्या डॅलियन जिंझोउ बे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपानच्या कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळासारखी असेल. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

वाढवण बंदराजवळ विमानतळाची कल्पना देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी मांडली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना ते म्हणाले, “मुंबईला येत्या काही वर्षांत तिसऱ्या विमानतळाची गरज भासणार आहे. माझी विनंती आहे की केंद्राने वाढवण बंदराजवळ असलेल्या जमिनीवर बांधण्यात येणाऱ्या विमानतळाच्या प्रस्तावावर विचार करावा. सध्या मुंबईत दोन विमानतळ आहेत. एक सांताक्रूझच्या उपनगरी भागात कार्यरत आहे आणि दुसरे नवी मुंबईत एप्रिलमध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.” मुख्य म्हणजे, तिसऱ्या विमानतळाची योजना काही दिवसांपासून रखडली आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तिसऱ्या विमानतळाची कल्पना मांडली होती. पालघर जिल्ह्यातील केळवा-माहीम किंवा दापचरी या दोन्ही ठिकाणी देशांतर्गत विमानतळाच्या प्रस्तावावर राज्य प्रशासन त्यावेळी विचार करत होते.

त्यासह २०१३ मध्ये अभियांत्रिकी सेवाप्रमुख नेदरलँड्स एअरपोर्ट कन्सल्टंट्सने मुंबईजवळ एक कृत्रिम बेट बांधण्याची अशीच कल्पना मांडली होती; ज्यावर विमानतळ बांधले जाऊ शकेल. नेदरलँड्स एअरपोर्ट कन्सल्टंट्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक जोएरी ऑलमन यांनी जवाहरलाल नेहरू बंदराच्या (जेएनपीटी) उत्तरेकडील जमिनीवर पुन्हा दावा करून बेट तयार करण्याचा प्रस्ताव दिला होता. तज्ज्ञ म्हणतात की, कृत्रिम बेटावरील विमानतळ पूर्ण होण्यासाठी एक दशकापेक्षा जास्त वेळ लागेल. परंतु, पूर्ण झाल्यावर ते केवळ कनेक्टिव्हिटीला चालना देणार नाही तर भूसंपादन संबंधित विलंबदेखील टाळेल.

मुंबईत तिसऱ्या विमानतळाची गरज आहे?

या विमानतळामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत तीन विमानतळ असतील. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित असताना नवी मुंबई विमानतळ एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. परंतु, अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे की, मुंबईला जास्त लोकसंख्येमुळे आणखी एका विमानतळाची गरज आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) हे नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर देशातील दुसरे सर्वात व्यस्त विमानतळ आहे.

या विमानतळामुळे देशाच्या आर्थिक राजधानीत तीन विमानतळ असतील. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, ऑक्टोबर २०२४ मध्ये मुंबई विमानतळावर ३१.६ लाख देशांतर्गत प्रवाश्यांची नोंद करण्यात आली. या विमानतळावर दिवसाला ९०० उड्डाणे शक्य आहेत. मुंबई विमानतळ आधीच संपृक्ततेच्या टप्प्यावर पोहोचले आहे, त्यामुळे विलंब होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. एअर इंडियानेही उड्डाण विलंबाचे कारण ही समस्या असल्याचे सांगितले. गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांनी एक निवेदन जारी केले होते, “मुंबईमधून निघणाऱ्या आणि येणाऱ्या उड्डाणांवर धावपट्टीच्या क्षमतेमुळे परिणाम झाला आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मुंबईतील एकूण विलंबांपैकी ५८ टक्के विलंब या समस्यांमुळे झाला. अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कनेक्शनसह मुंबई आमचे दुसरे सर्वात मोठे केंद्र असल्याने, इतर देशांतर्गत वाहकांच्या तुलनेत आमच्या उड्डाणांना होणारा विलंब खूपच जास्त आहे.”

वाढवण बंदराजवळील विमानतळाकरिताही अनेक आव्हाने आहेत. प्रथम, शहराला नवीन प्रकल्प आणि शहराच्या हद्दीतील विद्यमान टर्मिनलदरम्यान जलद प्रवासाचे पर्याय काय आहेत हे सुनिश्चित करावे लागेल. तसेच सरकारला एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी गुंतवणुकीचे समर्थनही करावे लागेल.

चीन आणि जपानसारखा प्रकल्प

वाढवण बंदराजवळील प्रस्तावित विमानतळ हा चीनमध्ये ईशान्येत बांधत असलेल्या डेलियन जिंझाऊ बे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखाच आहे. एकदा बांधल्यानंतर हे मानवनिर्मित बेटावरील जगातील सर्वात मोठे विमानतळ असेल. यात चार धावपट्टी आणि ९,००,००० चौरस मीटर प्रवासी टर्मिनल असेल आणि हे विमानतळ २० चौरस किलोमीटर बेटावर पसरले असेल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळ २०३५ पर्यंत पूर्ण होईल आणि एकदा पूर्ण झाल्यानंतर, विमानतळ दरवर्षी ५,४०,००० उड्डाणे आणि ८० दशलक्ष प्रवासी हाताळण्यास सक्षम असेल. कृत्रिम बेटावरील हे एकमेव विमानतळ नाही; हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जपानचे कान्साई विमानतळ हे दोन्ही अनुक्रमे मानवनिर्मित बेटांवर बांधलेले आहेत. हाँगकाँगचा विमानतळ १२.४८ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे, तर जपानचा कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळ १०.५ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे.