बदलती जीवनशैली, आनुवंशिकता इत्यादी कारणांमुळे भारतात मधुमेहाच्या (डायबेटिस) रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आता चेन्नईमध्ये देशातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची (डायबेटिस बायो बँक) स्थापना करण्यात आली आहे. भारत लढत असलेल्या मधुमेहविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (आयसीएमआर) आणि ‘मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन’ (एमडीआरफे) यांच्यातील सहकार्याने या बँकेची स्थापना करण्यात आली आहे. मधुमेहावरील वैज्ञानिक संशोधनात याचा खूप मोठा फायदा होणार आहे. काय आहे ही जैविक बँक? याचे फायदे काय? भारतातील मधुमेहाचे संकट किती मोठे? त्याविषयी जाणून घेऊ.
काय आहे जैविक बँक?
संपूर्ण भारतातील जैविक नमुन्यांच्या साठवणुकीसह बायो बँक भारतातील सर्वांत महत्त्वाच्या आरोग्य आव्हानांपैकी एकाची उत्तरे उघड करण्यास सज्ज आहे आणि त्यामुळे मधुमेहाच्या दीर्घकालीन स्थितीमुळे प्रभावित झालेल्यांना मदत होण्याचीदेखील आशा आहे. भारतातील पहिली मधुमेह बायो बँक स्थापन करण्याची प्रक्रिया दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती. या बायो बँकेचे उद्दिष्ट वैज्ञानिक संशोधनासाठी जैव नमुने गोळा करणे, प्रक्रिया करणे, साठवणे व ते वितरित करण्यासाठी एक सुविधा निर्माण करणे हे आहे. बायो बँकेमुळे मधुमेहाची कारणे, भारतीय प्रकारातील मधुमेह आणि संबंधित विकारांवरील प्रगत संशोधनदेखील शक्य होईल, असे एमडीआरएफ व डॉ. मोहन डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
हेही वाचा : ‘डिंगा डिंगा’ आजारामुळे नाचू लागतात लोक; काय आहे युगांडात थैमान घालणारा हा आजार?
या बायो बँकेमध्ये टाईप-१, टाईप-२ आणि गर्भावस्थेतील मधुमेहासह तरुण व्यक्तींमधील विविध प्रकारच्या मधुमेहातील रक्ताचे नमुने भविष्यातील संशोधनासाठी जतन केलेले आहेत. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमधील एका लेखात म्हटले आहे की, ही मधुमेह बायो बँक लवकर निदान होण्यासाठी नवीन बायोमार्कर ओळखण्यात आणि वैयक्तिक उपचार धोरणे विकसित करण्यात मदत करू शकेल. २००८ ते २०२० दरम्यान ‘आयसीएमआर’च्या निधीतून सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोन सर्वेक्षणे करण्यात आली होती. त्यावेळी गोळा केलेले मधुमेही रुग्णांचे नमुने या जैविक बँकेत ठेवण्यात आले आहेत; ज्यांची वैज्ञानिक अभ्यासात मदत होणार आहे.
भारत ही ‘जगाची मधुमेहाची राजधानी’
‘जगाची मधुमेहाची राजधानी’ म्हणून ओळखला जाणारा भारत गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटाशी झुंजत आहे. आयसीएमआर-आयएनडीआयएबीच्या अभ्यासानुसार, देशात १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आणि १३.६ कोटी प्री-डायबेटिस रुग्ण आहेत. त्यामुळे मधुमेही लोकसंख्येच्या बाबतीत भारत जागतिक स्तरावर अव्वल स्थानी आहे. चिंताजनक संख्या असूनही, मधुमेहाबद्दल जागरूकता खूपच कमी आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, केवळ ४३.२ टक्के भारतीयांनी मधुमेहाबद्दल ऐकले आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर जागरूकता आणि शिक्षण कार्यक्रमांची गरज असल्याचे स्पष्ट होते.
वाढत्या प्रकरणांमध्ये जीवनशैलीचे घटकदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की, बदलती जीवनशैली वाढत्या प्रकरणांसाठी कारणीभूत आहे. त्यामुळे समस्या अधिक बिघडत आहेत. भारतातील मधुमेहाचे प्रमाणही गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. महिलांमधील मधुमेहाचा प्रादुर्भाव १९९० मध्ये ११.९ टक्क्यांवरून २०२२ मध्ये २३.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याच कालावधीत पुरुषांमधील प्रादुर्भाव ११.३ टक्क्यांवरून २१.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. टाईप १ आणि टाईप २ मधुमेह हे रोगाचे सर्वांत सामान्य प्रकार आहेत. उपचार न केलेल्या मधुमेहामुळे परिस्थिती आणखीनच चिघळते. २०२२ च्या लॅन्सेटच्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतातील ६२ टक्के मधुमेही कोणत्याही प्रकारचे उपचार किंवा औषधोपचार घेत नाहीत.
“एन्डोक्रिनोलॉजिस्ट म्हणून माझ्या अनुभवावरून, लवकर ओळख आणि सतत काळजी घेतल्यास मधुमेहाचे परिणाम मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. भारतातील उपचार न घेतल्या जाणाऱ्या मधुमेहाचे ओझे कमी करण्यासाठी, आरोग्य साक्षरता सुधारण्यासाठी आणि न्याय्य काळजी देण्यासाठी सर्व सरकारी संस्था, आरोग्य सेवा व्यावसायिक व सामुदायिक संस्था यांच्यातील सहयोगी प्रयत्न अत्यावश्यक आहेत,” असे फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटलचे एंडोक्रायनोलॉजीचे विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. सचिन कुमार जैन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भारतानंतर चीन १४.८ कोटी मधुमेही रुग्णांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका (४.२ कोटी), पाकिस्तान (३.६ कोटी), इंडोनेशिया (२.५ कोटी) व ब्राझील (२.२ कोटी), अशी क्रमवारी आहे.
हेही वाचा : ‘हा’ देश भारतीयांना देणार व्हिसाशिवाय प्रवेश; विनाव्हिसा प्रवेशाचा फायदा काय? कोणते देश ही सुविधा देतात?
भारतात जनुकीय घटक आणि अनुवांशिकतेमुळे मधुमेहाची अधिक शक्यता असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. तसेच भारतीयांची जीवनशैलीही अधिक बैठी झाली आहे. परिणामस्वरूप वजनवाढ होऊन ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ वाढतो आणि ‘प्री-डायबेटिक’ परिस्थिती उद्भवते. भारतातील सर्व राज्यांच्या आहारामध्ये कर्बोदके, साखर व तेलाचा अतिरिक्त वापर होतो. त्यातून वजनवाढ होते आणि सुरुवातीला ‘प्री-डायबेटिस’ परिस्थिती व काही काळानंतर मधुमेह उद्भवतो. ही भारतातील मधुमेहींची संख्या वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत.