-संपदा सोवनी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुलगाच हवा’ या धारणेतून स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे प्रमाण भारतात गेल्या काही वर्षांत काहीसे कमी झाले आहे, अशी माहिती एका नवीन अभ्यासात समोर आली आहे. या सकारात्मक परिणामास एक धार्मिक आयामदेखील असून ज्या काही धर्मांमध्ये स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर लक्षणीयरित्या व्यस्त होते, ते सुधारल्यामुळे त्यांच्यात लिंगनिवडीची चाल कमी झाल्याचे यावरून सूचित होत आहे. यात प्रामुख्याने शीख धर्माचा समावेश आहे. प्यू रिसर्च सेंटर या संस्थेने हा अभ्यास केला आहे.

आकडेवारी काय सांगते?

नैसर्गिकरित्याही मुलगा आणि मुलगी यांचे लिंग गुणोत्तर अगदी समसमान नसते. साधारणत: दर १०५ मुलग्यांमागे १०० मुली हे नैसर्गिक प्रमाण असून ते योग्य मानले जाते आणि भारतात १९५० व १९६० च्या दशकात हे प्रमाण असेच होते. परंतु भारतात गर्भपातास १९७१ मध्ये कायद्याची मान्यता मिळाली होती. शिवाय सोनोग्राफी (अल्ट्रासाउंड) चाचण्या १९८०मध्ये सगळीकडे उपलब्ध झाल्या आणि सोनोग्राफीमुळे गर्भ मुलाचा की मुलीचा याचा पत्ता लावणे सोपे झाले, त्यातून लिंगनिवड करून मुलीचा गर्भ जन्मापूर्वीच पाडून टाकण्याचा प्रकार वाढला. तत्पूर्वीही लिंग परीक्षण करता येत असे, मात्र ती गर्भजल चाचणी होती आणि ती तुलनेने महाग असल्यामुळे सगळ्यांच्या आवाक्यात आली नव्हती. १९७०पूर्वी दर १०५ मुलांमागे १०० मुली असे असलेले लिंग गुणोत्तर १९९० पर्यंत प्रति ११० मुलांमागे १०० मुली असे झाले. त्यानंतर जवळपास २० वर्षे ते तसेच राहिले. २०११च्या जनगणनेत प्रति १११ मुलांमागे १०० मुली देशात जन्मतात अशी संख्या नोंदवली गेली. आता ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणा’च्या आकडेवारीनुसार (२०१९-२०२१) प्रति १०८ मुलांमागे १०० मुलींचा जन्म असे लिंग गुणोत्तर आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या अभ्यासात हे प्रमाण कसे सुधारले ते सांगतानाच देशात दरवर्षी किती मुली जन्मल्या आणि किती मुली जन्माला येऊच शकल्या नाहीत, याकडेही लक्ष वेधले आहे. २०१०मध्ये ४ लाख ८० हजार मुली जन्मालाच येऊ शकल्या नव्हत्या. ही संख्या गेल्या दशकात काहीशी कमी झाली. २०१९च्या आकडेवारीनुसार देशात ४ लाख १० हजार मुली जन्माला येऊ शकल्या नाहीत.  

गुणोत्तर सुधारण्याची कारणे कोणती?

लिंग गुणोत्तर सुधारण्यामागे अनेक वर्षांचे सरकारचे प्रयत्न- उदा. गर्भजल परीक्षणावर आणलेली बंदी, ‘मुलगी वाचवा अभियान’, हे तर आहेच, पण साक्षरतावृद्धी आणि समाजात सुबत्ता वाढणे, अशा इतर बदलांचाही हा परिणाम असल्याचे मानले जाते.  

धर्मनिहाय फरक काय?

हिंदू, मुस्लीम, ख्रिस्ती व शीख धर्मांमध्ये मुले व मुलींच्या संख्येचे गुणोत्तर वेगळे आहे. २००१पासून २०१९-२१ पर्यंतची आकडेवारी पाहता हिंदूंमध्ये प्रति १०० मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण २००१ मध्ये १११ होते, ते २०१९-२०२१ मध्ये १०९ झाले. मुस्लिमांमध्ये हे प्रमाण १०७ वरून १०६ वर आले. ख्रिस्तींमध्ये ते १०४ वरून १०३वर आले. म्हणजेच ख्रिश्चनांमध्ये लिंग गुणोत्तर नैसर्गिकरित्या योग्य आहे असे म्हणता येते. मुस्लिमांमध्येही ते आता नैसर्गिक लिंग गुणोत्तराकडे वळले आहे. शीख समाजात २००१मध्ये प्रति १०० मुलींमागे १३० मुले जन्मास येत होती. हे प्रमाण २०१९-२१ मध्ये १०० मुलींमागे ११० मुले असे कमी झाले. याचाच अर्थ निरोगी लिंग गुणोत्तराकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

स्त्रीभ्रूणहत्यांचा धार्मिक-सामाजिक परिणाम काय दिसला?

स्त्रीभ्रूणहत्या मोठ्या प्रमाणावर घडू लागल्यानंतर काही वर्षांनी लग्नासाठी मुलांना मुली न मिळणे, हा एक मोठा अपेक्षित परिणाम भारतातही दिसून येतो आणि विशेष म्हणजे या समस्येचेही स्वरूप धर्मा-धर्मानुसार वेगळे आहे. याचे प्रमुख कारण असे, की फारच कमी भारतीय आपल्या मूळच्या धर्माबाहेर विवाह करतात. शिखांमध्ये लग्नायोग्य मुलांना वधू न मिळण्याच्या प्रश्नाने बिकट रूप धारण केले, असे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India sex ratio at birth begins to normalize print exp scsg
Show comments