Golden Road by William Dalrymple: भारतीय इतिहास आणि संस्कृती सध्या अनेकार्थाने कधी चर्चेत तर कधी वादग्रस्त ठरते आहे. राजकारणाच्या दृष्टिकोनातून या विषयाचा होणारा वापर हा अभ्यासकांचे गट ठरवण्यास कारणीभूत ठरत आहे. एखाद्या अभ्यासकाने जर मुघलांचा इतिहास लिहिला तर त्याच्यावर मार्क्सवादी असल्याचा ठपका ठेवला जातो तर प्राचीन भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकाच्या मागे रा. स्व. संघाचे (RSS) लेबल लावले जाते. हीच खंत प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डालरिंपल यांनी इंडियन एक्स्प्रेस आयोजित आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, या देशात एक विचित्र पूर्वग्रह आहे, जो कोणी मुघल इतिहासाबद्दल लिहितो तो मार्क्सवादी असतो आणि जो कोणी प्राचीन भारताबद्दल लिहितो तो RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघा) चा स्वयंसेवक ठरतो. मी या दोन्हीपैकी कुठलाच नाही. मुघलांमध्ये रस असणं म्हणजे मार्क्सवादी असणं नाही, आणि प्राचीन भारतीय इतिहासात रस असणं म्हणजे RSS चा स्वयंसेवक असणंही नाही. या दोन्ही गोष्टींचा तुलनात्मक दृष्टिकोनातून आणि तथ्यांवर आधारित अभ्यास करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी लिहिलेल्या गोल्डन रोड या पुस्तकाचा संदर्भ दिला. या पुस्तकामुळे त्यांच्यावर उजव्या विचारसरणीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो. परंतु ते म्हणाले हे पुस्तक भारतीय इतिहासावर नाही तर भारताबाहेर पसरलेल्या भारतीय विचारांवर आधारित आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भारताला आपल्या समृद्ध भूतकाळात गुंतवणूक करण्याचा सल्लाही दिला. ते नेमकं काय म्हणाले याचा घेतलेला हा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
इतिहासकार विल्यम डॅलरिम्पल (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)

अधिक वाचा: प्राचीन इजिप्तमध्ये गौतम बुद्ध आणि हिंदू देवतांची पूजा; सांस्कृतिक देवाणघेवाणीचा पुरातन वारसा नेमकं काय सांगतो?

भारताकडून या विषयाचा पाठपुरावा केला जात नाही

डालरिंपल सांगतात, समस्या अशी आहे की, उजव्या विचारधारेतील लोक बौद्ध आणि हिंदू इतिहासाला एकसारखा मानतात. परंतु बौद्ध धर्म ही भारताच्या प्राचीन इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या महिन्यात लंडनमध्ये सिल्क रोडवर दोन मोठी प्रदर्शनं झाली. एका ब्रिटिश लायब्ररीत दुनहुआंग या विषयावर ‘A Silk Road Oasis’ नावाचं, आणि दुसरं ब्रिटिश म्युझियममध्ये ‘Silk Roads’ नावाचं होतं. दोन्ही उत्कृष्ट प्रदर्शनं होती, पण दोन्हीत भारताला जवळपास पूर्णतः वगळण्यात आलं होतं. मला नेहमीच वाटत होतं की, हे पाश्चिमात्य अभ्यासकांचं अपयश आहे, पण कदाचित ही समृद्ध कथा इथूनच (भारतातूनच) प्रभावीपणे पुढे नेली जात नसल्यामुळेही हे घडतंय असं असू शकतं. आज बोधगयेला गेल्यावर आपण पाहतो की, तिथे केवळ चिनी भिक्षू शुआनझांगचा सुंदर पुतळाच नाही, तर चीन-भारत शांतता आणि सांस्कृतिक एकात्मतेचं प्रतीक म्हणून एक संपूर्ण संकल्पना राबवली जात आहे. हा एक असा विषय आहे ज्यावर या दोन देशांमध्ये सजग चर्चा होऊ शकते, कारण त्या काळात मैत्रीपूर्ण विचार-विनिमय आणि आदानप्रदान मोठ्या प्रमाणावर झालं होतं. त्यामुळे या विषयावर सखोल संशोधन आणि प्रसार होणे आवश्यक आहे.

सिल्क रोड (विकिपीडिया)

प्राचीन भारताची कथा सांगणाऱ्या ऐतिहासिक साधनांचा तुडवडा?

१९ व्या शतकाच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या इतिहासकारांसाठी उपलब्ध स्रोतांची संपत्ती अगदीच विपुल आहे. त्याच्याशी तुलना करता, त्यांच्या पुस्तकासाठी जैविक तपशीलांच्या बाबतीत खूपच कमी माहिती उपलब्ध होती. येथे पुरातत्त्वीय पुरावे, शिलालेख, आणि समृद्ध कला इतिहासासारख्या स्रोतांवर अवलंबून राहावं लागतं आणि हाच माझ्यासाठी या अभ्यासाचा मुख्य आनंद आहे. तरीसुद्धा, या वाळवंटात काही विशिष्ट पात्रं अशी आहेत, ज्यांची माहिती चांगली नोंदवलेली आहे आणि ज्यांचे जीवनचरित्र उपलब्ध आहे. शेवटी, मला पुरेसे जैविक साहित्य एकत्र आणता आले, ज्यामुळे हे पुस्तक वाचण्यायोग्य झालं आहे असे डालरिंपल सांगतात.

अधिक वाचा: China Silk Road weapon: चीनकडून ‘सिल्क रोड’ या ऐतिहासिक संकल्पनेचा शस्त्रासारखा वापर; भारतीय इतिहासकार कुठे चुकले?

क्रिसेंट लेक, दुनहुआंग (विकिपीडिया)

ही गुंतवणूक अत्यंत लाभदायक ठरेल…

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) हे सरकार-पुरस्कृत आहे, ते उत्तम काम करते, परंतु कधीकधी त्यांना वरून राजकीय निर्देश देण्यात आलेले असू शकतात. आपल्या विद्यापीठांना त्या प्रकारचे पुरेसे वित्तीय साधन किंवा पुरातत्त्व संशोधनासाठी प्रोत्साहन नाही या प्रश्नासंदर्भात बोलताना विल्यम डालरिंपल म्हणाले, माझ्या मते ASI ला अत्यंत कमी निधी दिला जातो, ही एक गंभीर समस्या आहे. या उन्हाळ्यात मी पूर्व तुर्कस्तानमध्ये एक मोठा दौरा केला, जिथे हॉटेल्स भारतापेक्षा २०-३० वर्षे मागे आहेत, परंतु त्यांची संग्रहालये मात्र २०-३० वर्षे पुढे आहेत. मला वाटतं की, भारताने आपल्या इतिहासात अधिक गुंतवणूक केली पाहिजे, कारण केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक अत्यंत लाभदायक ठरेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India should invest in its history golden road william dalrymple svs