India: The Diabetes Capital: भारतात समोसा, केक आणि कुकीज हे आवडते पदार्थ आहेत. परंतु एका नव्या अहवालाने मात्र या पदार्थांच्या चाहत्यांमध्ये बरीच खळबळ निर्माण केली आहे. पहिल्यांदाच झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे दिसून आले आहे की, advanced glycation end products (AGEs) असलेले खाद्यपदार्थ मूलतः भारतात मधुमेहासाठी कारणीभूत आहेत. या पदार्थांमध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड आणि फास्ट फूड्सचा समावेश होतो. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशन (MDRF) च्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल अलीकडेच इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड सायन्सेस अँड न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे.

अभ्यास कसा केला गेला?

या क्लिनिकल ट्रायलसाठी ३८ प्रौढ व्यक्ती निवडण्यात आल्या होत्या. ज्या जाड किंवा लठ्ठ होत्या परंतु त्यांना मधुमेह नव्हता. या व्यक्तींना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. एका गटाला १२ आठवड्यांसाठी कमी AGEs असलेला आहार दिला गेला, तर दुसऱ्या गटाला त्याच कालावधीत जास्त AGEs असलेला आहार देण्यात आला. AGEs म्हणजे प्रोटीन किंवा चरबी शर्करेबरोबर रक्तप्रवाहात एकत्र आले की, तयार होणारी हानिकारक संयुगे होय, या संयुगांना ग्लायकेशन म्हणतात, असे हेल्थलाईनने नमूद केले आहे. जास्त AGEs असलेले खाद्यपदार्थ भाजणे, डीप-फ्राय करणे आणि शॅलो-फ्राय अशा वेगवेगळ्या स्वयंपाक पद्धतींनी तयार केले जातात. तर कमी AGEs असलेले पदार्थ उकडून किंवा वाफवून तयार केले जातात. या अभ्यासाच्या माध्यमातून, आहारातील AGEs चे प्रमाण शरीराच्या आरोग्यावर कसा परिणाम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अधिक वाचा: विश्लेषण: ‘विस्कोस’ कापड खरेच पर्यावरणपूरक असते का? पर्यावरणवाद्यांकडून वेगळेच निष्कर्ष?

अभ्यासात काय आढळले?

अभ्यासात असे दिसून आले की, कमी-AGEs असलेला आहार घेतलेल्या सहभागींची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारली होती आणि त्यांना भविष्यात टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी होता. तर याउलट जास्त-AGEs आहार घेतलेल्या गटामध्ये ही शक्यता जात होती. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजे पेशी इन्सुलिनला किती चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात, इन्सुलिन हे स्वादुपिंडाद्वारे तयार होणारा हार्मोन आहे, जे रक्तातील ग्लुकोजची (साखर) पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

१२ आठवड्यांनंतर, संशोधकांना असे आढळून आले की, कमी-AGE आहार घेतलेल्या गटात इन्सुलिन ऑरल डिस्पोझिशन इंडेक्समध्ये लक्षणीय वाढ झाली होती. इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी AGEs जास्त असलेला आहार घेतलेल्या गटाच्या तुलनेत जास्त होती. अभ्यासात असेही आढळले की, जास्त-AGEs आहाराचे सेवन शरीरात सूज (inflammation) वाढवू शकते, जे मधुमेहाचे एक महत्त्वाचे कारण आहे. शोधनिबंधानुसार, “ग्लायकेशन – एक नॉन-एन्झायमॅटिक रासायनिक प्रक्रिया आहे ज्यात साखरेचे रेणू प्रोटीन किंवा लिपिड रेणूला जोडले जातात, यामुळे शरीरात हानिकारक प्रतिक्रिया होऊ शकतात.”

उच्च-AGEs असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये चिप्स, तळलेले चिकन, समोसे, पकोडे, बेकन, गोमांस, बेक केलेले पदार्थ जसे की कुकीज आणि केक, भाजलेले शेंगदाणे, सूर्यफूल बिया आणि प्रोसेस्ड फूड्स उदाहरणार्थ मेयोनिज यांचा समावेश होतो. संशोधक म्हणतात की, अधिक वजन (ज्यांचा बॉडी मास इंडेक्स, म्हणजे BMI २५ किंवा अधिक आहे) आणि लठ्ठपणा (BMI ३० किंवा अधिक) असलेल्या लोकांनी AGEs कमी असलेले पदार्थ घेतल्यास त्यांच्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करू शकतो. या पदार्थांमध्ये फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी-चरबीयुक्त दूध इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. ऑक्सिडेटिव्ह तणाव म्हणजे फ्री रॅडिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्समधील असंतुलन, यामुळे सूज आणि पेशींची हानी होऊ शकते. अभ्यासकांनी नमूद केले आहे की, “हा आहार लठ्ठपणाशी संबंधित टाइप २ मधुमेहाचे ओझे कमी करण्याची क्षमता राखतो.”

या अभ्यासाचे महत्त्व

हा एक क्रांतिकारी अभ्यास आहे. ज्यात AGEs युक्त आहार भारतातील मधुमेह संकटाला कशा प्रकारे चालना देत आहेत, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या अभ्यासाने भारतात प्रथमच समोर आणले की, कमी AGEs असलेला आहार मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी एक संभाव्य धोरण ठरू शकते,” असे संशोधक सांगतात. यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये उच्च चरबी, साखर, मीठ आणि AGEs ने समृद्ध, अतिशय प्रोसेस्ड फूड्सचे सेवन दीर्घकालीन आजारांच्या वाढलेल्या धोक्याशी जोडलेले होते. ICMR च्या या अभ्यासाने भारतीय आहारातील AGEs बद्दलच्या डेटामधील त्रुटी भरून काढण्याचे काम केले आहे. संशोधकांच्या मते, भारतीयांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध, टाइप २ मधुमेह, आणि हृदयविकारांचा धोका जास्त असतो. डॉ. व्ही. मोहन, MDRF चे चेअरमन आणि या शोधनिबंधकांच्या लेखकांपैकी एक यांनी, द प्रिंटला सांगितले की, AGEs ने समृद्ध खाद्यपदार्थ आणि त्यांना AGEs ने समृद्ध बनवणाऱ्या स्वयंपाकाच्या पद्धती समजून घेणे भारताच्या मधुमेह संकटाचा सामना करण्यात मदत करू शकते. २०२१ च्या अभ्यासानुसार, भारतात तब्बल १०.१ कोटी लोकांना मधुमेह आहे. “*भारतामध्ये मधुमेहाच्या महामारीत वाढ होण्याचे मुख्य कारण लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता, आणि AGEs ने समृद्ध असलेला पोषणमूल्यविरहीत आहार हे आहे,” डॉ. मोहन यांच्या मते, या संशोधनाच्या निष्कर्षांनी भारतीय संदर्भातून दाखवले आहे की, फळे आणि भाज्यांसारखे आरोग्यदायी आणि प्रोसेस्ड न केलेल्या पदार्थांमध्ये AGEs चे प्रमाण कमी असते.

अधिक वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानीभक्ती आणि युद्धतंत्र; बखरकारांनी नेमके काय संदर्भ दिले आहेत?

डॉ. मोहन सांगितात, “जर तुम्ही अन्न उकडले आणि ते तळले नाही, ग्रिल किंवा भाजले नाही, किंवा त्यात जास्त तेल, तूप किंवा इतर चरबीचे पदार्थ घातले नाहीत, तर तुम्ही आहारातील AGEs कमी ठेवू शकता.”द हिंदू” मध्ये त्यांचा हवाला देत असे सांगितले आहे की, “पोषक आहार स्वीकारून, उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या आणि स्टार्च नसलेल्या भाज्या, फळे, त्याचप्रमाणे तळलेले पदार्थ, बेकरीचे आणि साखरयुक्त पदार्थ यांच्या ऐवजी उकडलेले पदार्थ वापरल्यास आहारातील AGEs चे प्रमाण कमी करता येते आणि यामुळे टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.”