आसाममधील चराईदेव मोईदाम या दफनभूमीला संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (यूनेस्को) जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. ही अहोम घराण्याची शाही दफनभूमी आहे. अहोम घराण्याने १२२८ ते १८२६ इ.स.पर्यंत आसाम आणि ईशान्य भागावर राज्य केले. पूर्व आसाममधील शिवसागर शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असणारे चराईदेव मोईदाम आजही अनेक स्थानिकांसाठी एक पवित्र स्थळ आहे. काय आहे या जागेचे महत्त्व? याला आसामचे पिरॅमिड, असे का म्हटले जाते? चराईदेव मोईदामला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचे कारण काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोईदाम म्हणजे नक्की काय?

मोईदाम किंवा मैदाम म्हणजे तुमुलस; ज्याचा अर्थ कबरीवर उभारलेला मातीचा ढिगारा, असा होतो. ही दफनभूमी एक राजेशाही दफनभूमी आहे. चराईदेवमध्ये केवळ अहोम राजघराण्यांचेच मोइदाम आहेत; तर इतर कुलीन आणि प्रमुखांचे मोइदाम पूर्व आसामच्या जोरहाट व दिब्रुगढ या शहरांमधील प्रदेशात विखुरलेले आढळतात. चराईदेव येथील एका ठरावीक मोईदाममध्ये एक किंवा त्यापेक्षा अधिक कक्ष आहेत. त्याच्या वर एका गोल आकारात मातीचा ढिगारा आहे; जो जमिनीपासून उंच असून गवताने झाकलेला आहे. या ढिगाऱ्याच्या वर एक मंडप आहे; ज्याला ‘चौ चाली’ म्हणतात. मोईदामला एक दरवाजा आहे आणि त्याभोवती अष्टकोनी आकाराची भिंत आहे.

हेही वाचा : Cocaine Sharks: शार्कमध्ये आढळले चक्क कोकेन, याचा सागरी जीवनावर कसा परिणाम होणार? यासाठी कारणीभूत कोण?

‘आसामचे पिरॅमिड्स’ हे नाव आले कुठून?

अहोम राजे आणि राण्यांना या मोइदाममध्ये पुरण्यात आले होते. त्यांच्या मृत शरीरांवर हिंदू संस्कृतीनुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. त्यांनी ‘ताई’ समुदायाची पद्धत स्वीकारून मृत शरीरांना दफन केले. मोइदाम उंची सामान्यत: आत पुरलेल्या व्यक्तीची शक्ती आणि उंची दर्शवते. परंतु, गधाधर सिंह आणि रुद्र सिंह यांचे मोइदाम वगळल्यास इतर मोइदाम अज्ञात आहेत. मोइदामची विशेषतः म्हणजे राजे-महाराजांचे मृत शरीर दफन करताना त्यांना परलोकासाठी आवश्यक असलेल्या वस्तू; जसे की, नोकर, घोडे, पशुधन आणि अगदी त्यांच्या पत्नींनाही पुरले जायचे. या प्रथेत आणि प्राचीन इजिप्शियन लोकांच्या अहोम दफनविधीत साम्य होते. त्यामुळेच चराईदेव मोईदामला ‘आसामचे पिरॅमिड्स’, असे नाव देण्यात आले.

चराईदेव या स्थानाचे विशेष महत्त्व

चराईदेव हा शब्द तीन ताई अहोम शब्दांपासून तयार झाला आहे. चे-राय-दोई अर्थात ‘चे’ म्हणजे शहर किंवा गाव, ‘राई’ म्हणजे चमकणे आणि ‘दोई’ म्हणजे टेकडी. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास चराईदेव म्हणजे ‘डोंगरावर वसलेले एक चमकणारे शहर किंवा गाव’ अहोमांनी त्यांच्या ६०० वर्षांच्या इतिहासात अनेक वेळा आपली राजधानी बदलली. मात्र, चराईदेव ही त्यांची पहिली राजधानी मानली जाते. १२५३ मध्ये हे शहर सुकाफा राजाने स्थापन केले होते. संपूर्ण अहोम राजवटीत राजवंशाच्या स्थापनेतील महत्त्वामुळे हे शहर सत्तेचे प्रतीकात्मक आणि विधी केंद्र राहिले.

१८५६ मध्ये सुकाफा यांच्या निधनानंतर चराईदेव येथे त्यांचे शरीर दफन करण्यात आले. त्यानंतरच्या राजघराण्यांनीदेखील दफनभूमी म्हणून याच जागेची निवड केली. आज हे मोईदाम पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या प्रदेशात १५० हून अधिक मोईदाम आहेत. त्यातील केवळ ३० मोईदाम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित आहेत आणि अनेकांची दुरवस्था झाली आहे. चराईदेव मोईदामसारखी दफन स्थळे पूर्व आणि आग्नेय आशियामध्ये पाहिली गेली आहेत. परंतु, चराईदेवमधील मोइदाम ताई-अहोमच्या सर्वांत पवित्र भूमीत स्थित असल्याने इतरांपेक्षा वेगळे आहेत.

अहोम कोण होते आणि त्यांची आजची प्रासंगिकता काय आहे?

अहोम हे भारतातील सर्वांत जास्त काळ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक होते. त्यांचे राज्य आधुनिक काळातील बांगलादेशापासून बर्माच्या आतपर्यंत पसरले होते. सक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहोम राजघराण्याला आसाममध्ये आजही तितकेच महत्त्व आहे. ‘द अहोम्स’चे लेखक, इतिहासकार अरूप कुमार दत्ता यांनी २०२१ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, अहोम्स अशा काळाचे प्रतिनिधित्व करीत होते जेव्हा आसामी वंश एकत्र होते आणि मुघलांसारख्या परकीय, शक्तिशाली शक्तीशी लढण्यास सक्षम होते.

गेल्या वर्षी अहोम सेनापती व लोकनायक लचित बोरफुकन यांची ४०० वी जयंती नवी दिल्लीत २३ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत थाटामाटात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले, “लचित दिवसाच्या शुभेच्छा. हा लचित दिवस खास आहे. कारण- आपण महान लचित बोरफुकन यांची ४०० वी जयंती साजरी करीत आहोत. ते अतुलनीय धैर्याचे प्रतीक आहेत. त्यांनी लोकांच्या कल्याणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा प्राधान्य दिले आणि ते एक दूरदर्शी नेते होते.”

हेही वाचा : INS ब्रह्मपुत्रा पुन्हा वापरात येणार की मोडीत निघणार?

दक्षिण चिनी शासक राजघराण्यांमधून आलेल्या अहोमांना आज स्थानिक भारतीय शासक म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच या जागेला यूनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवितात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आणि या स्थानाला वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यानंतर त्यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला. यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील एकूण ४३ वारसा स्थळांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India unesco world heritage site assam charaideo moidams rac
Show comments