-अन्वय सावंत
भारत आणि इंग्लंड या आघाडीच्या संघांतील पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्याला शुक्रवारपासून (१ जुलै) सुरुवात होणार आहे. उभय संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमधील चार सामने गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवण्यात आले होते. मात्र, मँचेस्टर येथील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे हा सामना स्थगित करणे भाग पडले होते. आता हा सामना मँचेस्टरऐवजी बर्मिंगहॅम येथे (एजबॅस्टन) खेळवण्यात येणार आहे. तसेच या मालिकेचे पहिले चार सामने आणि आताच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. हे बदल कोणते आणि या सामन्यात कोणत्या संघाचे पारडे जड आहे, याचा घेतलेला आढावा.
कसोटी मालिकेतील गेल्या सामन्यापासून दोन्ही संघांत कोणते बदल झाले?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना गेल्या वर्षी २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक बदलण्यात आले आहेत. त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्व करत होता, तर रवी शास्त्री प्रशिक्षकपद भूषवत होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यांच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्वाची, तर राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची धुरा सोपवण्यात आली. दुसरीकडे, या मालिकेतील पहिल्या चार कसोटी सामन्यांत जो रूट आणि ख्रिस सिल्व्हरवूड हे अनुक्रमे इंग्लंडचे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपद भूषवत होते. परंतु या जोडीच्या मार्गदर्शनात इंग्लंडने भारताविरुद्ध चार पैकी दोन सामने गमावले. तसेच त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲशेस मालिकेत ०-४ अशी हार पत्करावी लागल्याने सिल्व्हरवूड यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली, तर त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यामुळे रूटने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मग अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅककलमने प्रशिक्षकपद सांभाळले.
स्टोक्स-मॅककलम जोडीच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडने कशी कामगिरी केली आहे?
स्टोक्स आणि मॅककलम यांच्या कार्यकाळाची इंग्लंडने दमदार सुरुवात केली आहे. त्यांनी कसोटीतील विश्वविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. तीनही सामन्यांत त्यांनी चौथ्या डावात २७० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला. रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ नकारात्मक मानसिकतेने खेळताना दिसायचा. मात्र, स्टोक्स-मॅककलम जोडीने इंग्लंडच्या कसोटी संघाची सूत्रे हाती घेताच त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीत कायापालट झाला आहे. स्टोक्स-मॅककलमने खेळाडूंना आक्रमक शैलीत खेळण्याची सूचना केली असून धोका पत्करण्याची मोकळीक दिली आहे. त्यामुळे स्वत: स्टोक्ससह बेअरस्टो, ऑली पोप आणि बेन फोक्स यांचा खेळ अधिक बहरला आहे. तसेच रूटही सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. गोलंदाजीत जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी वेगवान गोलंदाज पुन्हा एकत्रित खेळताना चमकदार कामगिरी करत असून मॅटी पॉट्सच्या रूपात त्यांना युवा प्रतिभावान वेगवान गोलंदाज गवसला आहे. डावखुरा फिरकीपटू जॅक लिचलाही लय सापडली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड मानले जात आहे.
भारतीय संघाने कशी तयारी केली आहे?
भारताने अखेरचा कसोटी सामना मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू ‘आयपीएल’मध्ये सहभागी झाले. केवळ चेतेश्वर पुजारा कौंटी क्रिकेटमध्ये काही प्रथम श्रेणी सामने खेळला. मात्र, त्याला पाचव्या कसोटीसाठी संघात स्थान मिळण्याबाबत साशंकता आहे. भारतीय संघाला पाचव्या कसोटीपूर्वी केवळ एक सराव सामना खेळण्याची संधी मिळाली. त्यांनी हा सामना लिस्टरशायरविरुद्ध खेळला. या चारदिवसीय सामन्यात विराट कोहलीने ३३ आणि ६७ धावांची खेळी केली, ही भारतासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. तो अडीच वर्षांपासूनचा शतकाचा दुष्काळ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत संपवेल अशी भारताला आशा आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहितला करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याच्या कसोटी सामन्यासाठीच्या उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह आहेत. तो या कसोटीत खेळू न शकल्यास जसप्रीत बुमरा कर्णधारपद सांभाळेल.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील चार सामन्यांत काय घडले?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील नॉटिंगहॅम येथे झालेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. परंतु लॉर्डसवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय साकारला. मग तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन केले आणि लीड्सवर झालेला हा सामना एक डाव व ७६ धावांनी जिंकला. त्यानंतर ओव्हलवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी सरशी साधत मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. परंतु पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील काही साहाय्यक मार्गदर्शकांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे खेळाडूंमध्ये चिंतेचे वातावरण होते. याच कारणास्तव निर्णायक सामना त्यावेळी खेळवता आला नाही.