– सिद्धार्थ खांडेकर
दक्षिण आफ्रिकेने पिछाडीवरून येऊन भारताविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्या-वहिल्या मालिकाविजयाचे विराट कोहलीचे स्वप्न साकारत असतानाच भंगले. कधी नव्हे, ती यंदा आपल्याला दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याची संधी असल्याचे बोलले जात होते. मग असे काय घडले की भारताने मालिका गमावली?
विराट कोहलीची आक्रमकता हे दुधारी शस्त्र…
कसोटी क्रिकेटवर नितांत प्रेम करणाऱ्या विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व हे भारताच्या परदेशी मैदानांवरील यशाचे एक कारण आहे हे मान्य करावेच लागेल. परंतु विजयासाठीही कोणतीही किंमत मोजू इच्छिणाऱ्या विराटचे काही आक्रमक पैलू मात्र संघासाठी प्रतिकूल ठरलेले आहेत. डीआरएस प्रणालीबाबत तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने केलेला निष्कारण खळखळाट संघाचे चित्त विचलित करणारा ठरला. अशा प्रकारे प्रणालीविषयी जाहीर मतप्रदर्शन करणे आणि अप्रत्यक्षरीत्या यजमान क्रिकेट मंडळ व अधिकृत प्रसारक कंपनीला जबाबदार धरणे एक कर्णधार म्हणून अशोभनीयच ठरते. शिवाय ६१ धावांवर डीन एल्गर बाद होता, तर जणू सामनाच जिंकला असता असा अविर्भाव क्रिकेटविषयक शहाणपणाशी प्रतारणा करणारा ठरला.
मधल्या फळीतली भली मोठी पोकळी!
विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या मधल्या फळीकडून याही मालिकेत निराशाच झाली. शेवटच्या कसोटीत दर वेळी दोनशे धावा जमवतानाही भारताची दमछाक झाली याचे प्रमुख कारण म्हणजे पुजारा आणि रहाणे यांचे अपयश. परंतु ही समस्या केवळ या मालिकेपुरती सीमित नव्हती. कधी सलामीवीरांमुळे चांगली सुरुवात, तर कधी खालच्या फळीतील प्राधान्याने गोलंदाजी करणाऱ्या पण प्रसंगी फलंदाजीतही चमक दाखवणाऱ्या भिडूंमुळे भारताचे फलंदाजीतील अपयश झाकोळले जायचे. अनेकदा प्रतिस्पर्धी संघाच्या २० विकेट घेण्याची क्षमता भारतीय गोलंदाजांनी दाखवल्यामुळे या महत्त्वाच्या त्रुटीकडे आणखी दुर्लक्ष झाले. पण आकडेवारी खोटे बोलत नाही. विराट कोहलीसारख्या प्रतिभावान फलंदाजाला गेल्या ३० डावांमध्ये शतक झळकावता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य रहाणेने तीन सामन्यांमध्ये १३६ आणि पुजाराने तीन सामन्यांमध्ये १२४ धावा जमवल्या. सन २०२० च्या सुरुवातीपासून पाहिल्यास, रहाणेची सरासरी १९ सामन्यांमध्ये २४.०८ तर पुजाराची सरासरी २० सामन्यांमध्ये २६.२९ अशी राहिली. तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावरील फलंदाजांची सरासरी अशी राहिल्यास, फार काळ सामने जिंकता येत नाहीत. दक्षिण आफ्रिकेत हे दिसून आले.
रवींद्र जडेजाची अनुपस्थिती…
पाच गोलंदाज घेऊन खेळण्याचा निर्णय भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. प्रतिस्पर्धी संघ दोनदा गारद करण्याचा हेतू या निर्णयामागे आहे. त्यामुळे सहाव्या क्रमांकावर यष्टिरक्षक फलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडूला खेळवावे लागते. ही जबाबदारी गेले काही हंगाम रवींद्र जडेजा उत्कृष्टपणे पार पाडत होता. परंतु दुखापतीमुळे त्याला या मालिकेत खेळता आले नाही. त्याचा फटका भारतीय संघाला नक्कीच बसला. ऋषभ पंतने शेवटच्या कसोटीतील शेवटच्या डावात शतक झळकवले, तरी ते पुरेसे नव्हते. रविचंद्रन अश्विन आणि शार्दूल ठाकूर फार तर आठव्या क्रमांकावरील बऱ्यापैकी फलंदाज म्हणून शोभले. दोघांनाही खेळपट्टीवर तळ ठोकून उभे राहता आले नाही. ते भान जडेजा योग्य प्रकारे राखतो.
दक्षिण आफ्रिकेची चिवट झुंज…
भारताच्या त्रुटींचा आढावा घेताना यजमानांच्या झुंजार वृत्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डीन एल्गरने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व धीरोदात्तपणे केले. पहिली कसोटी गमावल्यानंतरही त्याने आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास दाखवलाच, शिवाय दुसऱ्या कसोटीत तो स्वतः निश्चल उभा राहिला आणि एक अविस्मरणीय विजय त्याने मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेचे तेज गोलंदाज नंतरच्या दोन्ही सामन्यांत भारतीय गोलंदाजांपेक्षा किंचित सरस ठरले. कागिसो रबाडा हा जागतिक दर्जाचा गोलंदाज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. त्याला लुंगी एन्गिडी आणि नवोदित मार्को जॅन्सेन यांनी उत्तम साथ दिली. जोहान्सबर्ग आणि विशेषतः केपटाऊनमधील उसळत्या खेळपट्टीचा योग्य फायदा या तिघांनी उठवला. पण त्यांच्यापेक्षाही उठून दिसले, दक्षिण आफ्रिकेच्या माफक अनुभवी मधल्या फळीचे यश. कीगन पीटरसन, रासी व्हॅन डर डुसेन आणि तेम्बा बेवुमा हे तिघेही मोक्याच्या क्षणी धावा जोडण्यात पुजारा-कोहली-रहाणेपेक्षा सरस ठरले. खरे तर मालिका या एका घटकामुळे यजमानांच्या दिशेने फिरली असे म्हणता येऊ शकेल. भारतासारख्या बलाढ्य संघाविरोधात दक्षिण आफ्रिकेचा संघ खऱ्या अर्थाने एक संघ म्हणून खेळला.
व्यवस्थापकीय खांदेपालट आणि मैदानाबाहेरील घडामोडी…
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या काही विधानांमुळे वादळ उठले होते. शिवाय प्रशिक्षक-व्यवस्थापकपदावर राहुल द्रविडने या दौऱ्यापासूनच सूत्रे हाती घेतली. या बदलाशी जुळवून घेण्यास कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांना काही अवधी द्यावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचा दौरा भारतासाठी पूर्वी कधीही सोपा नव्हता. यावेळी आपण यजमानांना कमी लेखले हे खरेच, पण स्थिरावलेल्या राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कदाचित चित्र वेगळेही दिसले असते.