दक्षिण आफ्रिकेत प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, पहिल्या कसोटीतील पराभवानंतर निराश न होता भारतीय संघाने केपटाऊन येथे ऐतिहासिक विजयाची नोंद केली. केपटाऊनमधील न्यूलँड्सच्या मैदानावर विजय मिळवणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. परंतु भारताला दोन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. या मालिकेत भारतासाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी घडल्या, तर काही खेळाडूंची कामगिरी चिंता वाढवणारी ठरली. एकंदरीत या मालिकेत काय घडले आणि पुढे जाताना भारतीय संघाला काय सुधारणा करता येऊ शकतील याचा आढावा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघ पूर्ण तयारीनिशी उतरला होता का?

भारतीय संघ १९९२ सालापासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. मात्र, भारताला एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यंदाच्या दौऱ्यात भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिका बरोबरीत सोडवली, तर एकदिवसीय मालिकेत बाजी मारली. या यशानंतर भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी मालिका विजय साजरा करण्यासाठी उत्सुक होता. मात्र, कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाने केवळ एक सराव सामना खेळला होता, तोही आपापसात. भारत-अ संघही याच दरम्यान आफ्रिकेच्या दौऱ्यावर असल्याने या संघातील खेळाडू आणि कसोटी संघातील खेळाडू एकमेकांविरुद्ध सराव सामना खेळले. कसोटी संघातील बहुतांश खेळाडू हे आफ्रिका दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळले नव्हते. त्यामुळे भारतीय संघ अपुऱ्या सरावानिशी कसोटी मालिकेत उतरला असे म्हणणे वावगे ठरू नये.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदित्य’ यान ‘एल-१’ बिंदूपाशी कसे?

पहिल्या कसोटीत काय घडले?

सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या परिस्थितीचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताला अडचणीत टाकले. केवळ केएल राहुलने (१०१ धावा) केलेल्या झुंजार शतकामुळे भारताला २४५ धावांची मजल मारता आली. त्यानंतर आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका खेळणाऱ्या डीन एल्गरने (१८५) आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी केली पाहिजे, हे भारतीय संघाला दाखवून दिले. त्याला पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅम (५६) आणि उंचपुरा अष्टपैलू मार्को यान्सनची (नाबाद ८४) साथ लाभली. त्यामुळे आफ्रिकेने ४०८ धावांची मजल मारत मोठी आघाडी मिळवली. त्यानंतर दडपणाखाली भारतीय फलंदाजी ढेपाळली. भारताचा डाव केवळ १३१ धावांत आटोपला आणि आफ्रिकेने तीन दिवसांतच एक डाव व ३२ धावांनी सामना जिंकला. त्यामुळे भारतीय संघ यंदाही मालिका विजय साजरा करू शकणार नाही हे स्पष्ट झाले.

भारताने कशा प्रकारे पुनरागमन केले?

दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अधिक जिद्दीने आणि अचूक नियोजनासह खेळताना दिसला. केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमच्या अतिरिक्त उसळी असलेल्या खेळपट्टीवर आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय फसला. भारताने आफ्रिकेला केवळ ५५ धावांत गुंडाळले, मग १५३ धावांची मजल मारत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यानंतर आफ्रिकेचा दुसरा डाव १७६ धावांत आटोपला. त्यामुळे भारताला विजयासाठी ७९ धावांचे आव्हान मिळाले. भारताने १२ षटकांतच तीन गड्यांच्या मोबदल्यात या धावा करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

हेही वाचा : निवडणुका बांगलादेशमध्ये तरी, काळजी मात्र भारताला… असे का?

भारतीय संघासाठी काय सकारात्मक गोष्टी घडल्या?

जसप्रीत बुमरा आणि विराट कोहली हे तारांकित खेळाडू पूर्णपणे लयीत असल्याचे या मालिकेने दाखवून दिले. बऱ्याच काळानंतर लाल चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या बुमराने आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध केले. त्याने दोन कसोटीच्या तीन डावांत मिळून १२ गडी बाद केले. विशेषत: दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी करताना सहा गडी बाद केले. त्यामुळेच भारताला विजय साकारता आला. तसेच अन्य फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येत असताना कोहलीने चार डावांत अनुक्रमे ३८, ७६, ४६ आणि १२ धावा केल्या. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या केएल राहुलची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. गोलंदाजीत बुमराला मोहम्मद सिराजने उत्तम साथ दिली. सिराजने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात सहा बळी मिळवताना भारताच्या विजयाचा पाया रचला होता. नवोदित मुकेश कुमारनेही आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली. त्याने दुसऱ्या कसोटीत चार गडी बाद केले. त्यामुळे भविष्यात त्याच्याकडून अधिक अपेक्षा बाळगता येऊ शकतील.

कोणत्या खेळाडूंची कामगिरी चिंताजनक ठरली?

भारतीय संघ चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांना मागे सोडून आता भविष्याकडे निघाला आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांसारख्या फलंदाजांकडे भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात आहे. मात्र, आफ्रिकेतील मालिकेत या युवकांची कामगिरी चिंताजनक ठरली. आताच्या ट्वेन्टी-२०च्या जमान्यात फलंदाजांना आपल्या आक्रमकतेला आळा घालणे अवघड जात आहे. या मालिकेदरम्यान यशस्वी, गिल आणि श्रेयस या तिघांमध्येही संयमाचा अभाव दिसून आला. ते बेजाबदार फटके मारून बाद झाले. खेळपट्टीवर वेळ घालवण्यासाठी आवश्यक मानसिकता त्यांच्यात दिसून आली नाही. यशस्वी आणि गिल यांचे वय लक्षात घेता त्यांना थोडा वेळ देणे गरजेचे आहे. मात्र, श्रेयस आता बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरण्यासाठी त्याला खेळात बरीच सुधारणा करावी लागणार आहे. तो अजूनही उसळी घेणाऱ्या चेंडूंविरुद्ध अडचणीत सापडतो. त्यामुळे त्याने आपल्या तंत्रावर काम करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाला या मालिकेत कसोटी पदार्पणाची संधी मिळाली, पण त्याने निराशा केली. एक टप्पा धरून ठेवून गोलंदाजी करणे त्याला जमले नाही. त्यामुळे त्याने अधिक प्रथमश्रेणी सामने खेळणे गरजेचे आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही हे मान्य केले.

हेही वाचा : बजाज ऑटोच्या ‘बायबॅक’ बक्षिसाच्या निर्णयाकडे कसे पाहावे? भागधारकांना भरभरून देण्याची बजाज समूहाची परंपरा अनुसरली जाईल?

कसोटी क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने ही मालिका निराशाजनक ठरली का?

या मालिकेतील पहिला सामना तीन, तर दुसरा सामना केवळ दीड दिवसात संपला. कसोटी क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने ही नक्कीच चांगली गोष्ट नाही. यजमान संघाला फायदा व्हावा यासाठी केपटाऊन येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत अतिरिक्त उसळी असेल अशी खेळपट्टी तयार करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी या खेळपट्टीला भेगा पडण्यास सुरुवात झाली. ‘गुड लेंथ’ म्हणजेच खेळपट्टीच्या मध्यभागी पडणारा चेंडूही फलंदाजाच्या हेल्मेटपर्यंत उसळी घेत होता. त्यामुळे फलंदाजांसाठी या खेळपट्टीवर धावा करणे हे अशक्यप्राय आव्हान ठरत होते. त्यामुळे आता यात ‘आयसीसी’ने लक्ष घालणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs south africa test series bumrah kohli best but worry about performance of some players print exp css