पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘भारताला आम्ही एफ – ३५ लढाऊ विमाने देऊ’ अशी घोषणा परस्पर करून टाकली. या घोषणेचे संमिश्र पडसाद उमटत आहेत. अत्याधुनिक अशा या एफ – ३५ लढाऊ विमानांमुळे भारताची मारक क्षमता आणि जरब नक्कीच वाढेल. पण भारताला ही अत्यंत महागडी विमाने कशी परवडणार, अमेरिकेकडून लढाऊ विमाने मिळू लागल्यास रशिया आणि फ्रान्सकडून मिळणाऱ्या विमानांचे काय, देशी बनावटीच्या लढाऊ विमानांचे काय असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.

एफ – ३५ विमानाची वैशिष्ट्ये कोणती?

एफ – ३५ लायटनिंग टू फायटर असे या लढाऊ विमानाचे खरे नाव. हे पाचव्या पिढीतील म्हणजे सर्वांत आधुनिक प्रजातीचे सुपरसॉनिक लढाऊ विमान मानले जाते. अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीकडून त्याची निर्मिती होते. हे लढाऊ विमान ‘स्टेल्थ’ प्रकारातील आहे. म्हणजे जगातील बहुतेक रडारांना त्याचा माग घेता येत नाही. रडारांची नजर चुकवून हे विमान संचार आणि प्रहार करते म्हणून त्याला स्टेल्थ किंवा छुप्या प्रकारातील विमान संबोधले जाते. अत्याधुनिक संपर्क आणि संचार यंत्रणा, तसेच हवाई युद्ध आणि बॉम्बफेकीसाठी आवश्यक शस्त्रसज्ज असल्यामुळे हे लढाऊ विमान धोकादायक मानले जाते.

आक्षेप कोणते?

एफ – ३५ हे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आहे. त्या तुलनेत फ्रान्सकडून मिळालेले राफेल विमान ४.५व्या पिढीतील मानले जाते. पण हे विमान एफ – ३५ पेक्षा अधिक लवचीक मानले जाते. एफ – ३५ विमानाची किंमत प्रत्येकी ८ ते १५ कोटी डॉलरच्या घरात आहे. शिवाय या विमानाची देखभाल दुरुस्तीदेखील महागडी मानली जाते. प्रत्येक उड्डाणाचा खर्चच ३६ हजार डॉलरपर्यंत जातो. इतका खर्च करण्याची खरोखर गरज आहे का असा प्रश्न माजी हवाईदल अधिकारी आणि विश्लेषक विचारू लागले आहेत. एफ – ३५ ही भारताची गरज नाही पण अमेरिकेची किंवा ट्रम्प यांची मात्र नक्कीच आहे. शिवाय एकीकडे राफेलसाठीही मोठी रक्कम मोजत असताना, नव्याने अमेरिकन विमानांसाठी खर्चभार का उचलावा असा या मंडळींचा सवाल आहे.

राफेल वि. एफ – ३५

अमेरिकेचे एफ – ३५ आणि रशियाचे एसयू – ५७ ही बहुचर्चित अत्याधुनिक लढाऊ विमाने बंगळूरुतील एरो – इंडिया हवाई प्रदर्शनात सहभागी झाली होती. त्यावेळी भविष्यात भारताकडून खरेदी केली जाऊ शकतील अशा या दोन विमानांमध्ये तुलनाही केली जाऊ लागली होती. पण ट्रम्प यांच्या घोषणेमुळे ही चर्चाच संपुष्टात आली. त्यामुळे भारताच्या ताब्यात सध्या असलेल्या राफेल विमानांशी एफ – ३५ बरोबर तुलना केली जात आहे. एफ – ३५ कडे स्टेल्थ क्षमता आहे, पल्ला दीर्घ आहे. तसेच गुंतागुंतीची संदेशवहन आणि संपर्क यंत्रणा आहे. त्यामुळे क्षमतेच्या बाबतीत हे विमान राफेलपेक्षा उजवे ठरते. पण राफेल हे अधिक लवचीक आणि नजीक अंतराच्या हवाई द्वंद्वासाठी अधिक उपयुक्त मानले जाते. एफ – ३५ कडे उच्च तंत्रज्ञान आणि मारक क्षमता आहे. पण अधिक किफायतशीर आणि लवचीक असल्यामुळे भारतासारख्या देशासाठी राफेल हा अधिक व्यवहार्य पर्याय ठरतो.

चीन आणि पाकिस्तान विरुद्ध भारत

‘वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट’च्या आकडेवारीनुसार, चीनकडे सध्या २१८४ लढाऊ विमाने आहेत. भारताकडे ५४२ आणि पाकिस्तानकडे ४९८ लढाऊ विमाने आहेत. चीन सध्या पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने बनवण्याच्या तयारीला लागला आहे. या प्रकारातील ३० जे – ३५ लढाऊ विमाने पाकिस्तानला मिळतील. पाकिस्तानला तुर्कीकडूनही कान ही पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने मिळतील. याउलट तेजस एमके टू हे तत्सम विमान विकसित करण्यासाठी भारताला अजून किमान पाच वर्षे लागतील. त्यावेळीही तेजस एमके टू, राफेल आणि सुधारित सुखोई – ३० ही लढाऊ विमाने पाचव्या पिढीतील ठरणार नाहीत. या परिस्थितीत एफ – ३५ लढाऊ विमान खरीदण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे मानणारा वर्गही आहे. इराणविरुद्ध अलीकडच्या कारवाईमध्ये इस्रायलसाठी एफ – ३५ विमानांनी मोलाची कामगिरी केली होती, याकडे यानिमित्ताने लक्ष वेधले जात आहे.

Story img Loader