ज्ञानेश भुरे
आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनमध्ये भारताच्या अश्वारोहण क्रीडा प्रकारातील ड्रेसाज स्पर्धा प्रकारात अनुष अग्रवाल, हृदय छेडा, दिव्याक्रिती सिंग, सुदिप्ती हाजेला या संघाने ४१ वर्षापूर्वीच्या सुवर्ण यशाची पुनरावृत्ती केली. तीन तपांहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेला हा स्पर्धा प्रकार नव्याने चर्चेत आला. आशियाई सुवर्णपदकाचा इतिहास नव्याने लिहिणारा ड्रेसाज नेमका काय प्रकार आहे, तो कसा खेळला जातो आणि गुण कसे मोजले जातात याचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.
या स्पर्धेतील भारताची यापूर्वीची कामगिरी कशी?
यापूर्वी १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने तीन सुवर्ण, प्रत्येकी एक रौप्य आणि कांस्यपदके मिळवली होती. अर्थात ही अश्वारोहणातील अन्य स्पर्धा प्रकारातील होती. यामध्ये रघुवीर सिंगने वैयक्तिक प्रकारात, तर रघुवीर सिंग, गुलाम मोहम्मद खान, विशाल सिंग आणि मिल्खा सिंग यांनी सांघिक सुवर्णपदक मिळविले. वैयक्तिक प्रकारात गुलाम मोहम्मद रौप्य, प्रल्हाद सिंग कांस्यपदकाचे मानकरी ठरले होते. त्यानंतर रुपिंदर सिंग ब्रारने वैयक्तिक पेगिंग प्रकारात भारताचे तिसरे सोनेरी यश साकार केले होते. त्यानंतर या स्पर्धाप्रकारात भारताची पाटी कोरीच राहिली होती. ड्रेसाज या स्पर्धा प्रकारात भारताने प्रथमच सुवर्णपदक मिळवले.
आणखी वाचा-विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?
ड्रेसाज स्पर्धा प्रकार नेमका काय आहे ?
हा घोडेस्वारीचा एक प्रकार आहे. याचा सराव मुख्यत्वे हा वैयक्तिक प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी केला जातो. प्रदर्शन आणि स्पर्धा अशा दोन पद्धती प्रचलित आहेत. थोडक्यात याला घोड्यावरील कवायत असे म्हणता येऊ शकेल. समतोल, लवचिकता साधून घोडा चालवणे हे या स्पर्धा प्रकाराचे खरे तंत्र आहे. यामध्ये घोडेस्वाराकडून घोड्याला कसे प्रशिक्षण दिले जाते हे सर्वात महत्त्वाचे ठरते. घोडा आणि घोडेस्वार यांच्या समन्वयातून पूर्वनिर्धारित हालचालींची मालिका करणे या स्पर्धा प्रकारात अपेक्षित असते.
या स्पर्धा कुठे घेतल्या जातात ?
या स्पर्धा प्रामुख्याने मोकळ्या मैदानावर किंवा रिंगणात घेतल्या जातात. यासाठी रिंगणाचे दोन आकार निश्चित केलेले असतात. यातील एक आकार लहान (२० बाय ४० मीटर), तर दुसरा कायमस्वरूपी (२० बाय ६० मीटर) असा असतो. रिंगणात कुठे हालचाली करायच्या हे निश्चित असते. लहान रिंगणाच्या सभोवती ठराविक जागांवर ए-के-ई-एच-सी-एम-बी-एफ, तर कायमस्वरूपी रिंगणाच्या सभोवती ए-के-व्ही-ई-एस-एच-सी-एम-आर-बी-पी-एफ अशी इंग्रजी अद्याक्षरे लिहून या जागा दाखवल्या जातात. तेथे जाऊनच घोडस्वार आपल्या घोड्याचे आणि घोडेस्वारीचे प्रदर्शन करतो. यातील सी या जागेवर पंच बसलेले असतात.
रिंगणाभोवती असलेल्या इंग्रजी आद्याक्षरांचा अर्थ काय?
या आद्याक्षरांना वेगळा अर्थ असतो. त्यानुसार घोड्याच्या हालचाली टिपल्या जातात. यात ए – बाहेर पडा (Ausgang), के – सम्राट, राजा (Kaiser), व्ही – स्क्वायर (Vassal), ई – सन्मानित अतिथी (Ehrengast), एस – चान्सलर (Schzkanzler), एच – लॉर्ड चान्सलर (Hofsmarshall), एम – कारभारी (Meier), आर – नाईट (Ritter), ब – मानक वाहक ( Bannertrager), पी – वर (Pferknecht), एफ – प्रिन्स (Furst)
विजेता कसा ठरवला जातो?
स्पर्धकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी मुख्य पंचाची नियुक्ती केलेली असते. ही नियुक्ती राष्ट्रीय महासंघाच्या वतीने त्या व्यक्तीचा अनुभव आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासून केली जाते. यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव सर्वात महत्त्वाचा ठरतो. स्पर्धकांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना गुणांऐवजी यश टक्केवारीत मोजले जाते. यासाठी स्पर्धाधिकारी काटेकोरपणे रिंगणातील हालचालींवर लक्ष देऊन असतात.
रिंगणातल्या हालचाली कशा पद्धतीच्या असतात?
घोड्यांच्या हालचालींमध्ये प्रामुख्याने घोडेस्वाराला अनेक अडथळ्यांवरून उडी मारावी लागले. यामध्ये खडे, कमी उंचीची भिंत, समांतर पट्ट्या अशा अडथळ्यांचा समावेश असतो. यासाठी उबदार रक्तांचे म्हणजे शांत स्वभावाचे साधारण उंच घोडे निवडले जातात. (६४ इंच, १.६२ मीटर किंवा १६ हात)
गुण कसे मोजले जातात?
या स्पर्धा प्रकारातील गुणपद्धती ही घोड्याचा ताल आणि नियमिततेवर आधारित असते. घोडेस्वार आपल्या घोड्याला कसा हाताळतो, विश्रांतीच्या क्षणी घोड्याच्या शरीराची हालचाल कशी राहते, घोड्याचा पवित्रा कसा असतो, घोडा हालचालीसाठी किती शक्ती वापरतो याला अधिक महत्त्व असते. घोडा सरळ रेषेत चालतो की नाही हेदेखील तपासले जाते. घोडेस्वार आपल्या घोड्याच्या कौशल्याचा खुबीने वापर करून विविध गुण मिळवतो. यासाठी १ते १० गुणांची श्रेणी असते. सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट १०, खूप चांगले ९ आणि सर्वात कमी म्हणजे ०, १ आणि ३ असे गुण दिले जातात. यातही कमी दंड आणि कमी वेळेत सर्व अडथळे पार करण्यावरून गुण दिले जातात. यात दोन प्रकारचे दंड असतात. एक म्हणजे किती अडथळे पडतात आणि दुसरा म्हणजे वेळेचे बंधन. अडथळे पार करण्यासाठी वेळेचे बंधन असते. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ घेतल्यास वेळेच्या बंधनाचा दंड केला जातो.
आणखी वाचा-परकीय देणगी घेणाऱ्या एनजीओंसाठी मोदी सरकारचे नवे नियम
अश्वारोहण ड्रेसाजखेरीज किती स्पर्धा प्रकार असतात?
अश्वारोहण स्पर्धा तीन ते चार दिवस चालते. ड्रेसेजखेरीज क्रॉसकंट्री आणि शो जम्पिंग असे स्पर्धा प्रकार असतात. पहिले दोन दिवस ड्रेसाज स्पर्धा होतात. नंतर क्रॉसकंट्री आणि शेवटी शो-जम्पिंग. या तीनही प्रकारात सर्वात कमी एकत्रित दोषांक असलेला घोडेस्वार विजेता ठरतो.