India women Shahzadi Khan Death Punishment : अबुधाबीमध्ये ३३ वर्षीय भारतीय महिलेला शनिवारी (तारीख १५ फेब्रुवारी) फासावर लटकवण्यात आलं. शहजादी खान असं या महिलेचं नाव असून ती उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील रहिवासी होती. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाला याबाबत माहिती दिली. “हा विषय संपला आहे. संबंधित महिलेला १५ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यात आली. तिच्यावर ५ मार्च रोजी अंत्यसंस्कार केले जातील”, असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितलं. दरम्यान, शहजादी खान कोण होती, तिला फाशीची शिक्षा नेमकी कशामुळे देण्यात आली, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहजादी खान कोण होती?

शहजादी खान ही मूळ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातल्या गोयरा या गावातील रहिवासी होती. करोना महामारीच्या काळात ‘रोटी बँक ऑफ बांदा’ या संस्थेसाठी तिने काम सुरू केलं. याच काळात तिची फेसबुकद्वारे आग्रा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी उझैरशी यांच्याबरोबर ओळख झाली. शहजादी खानचे वडील शब्बीर खान हे शेतकरी आहेत. काबाडकष्ट करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खान कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, शहजादी लहान असताना नकळत तिच्या अंगावर उकळलेले गरम पाणी सांडले होते, ज्यामुळे तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती.

आणखी वाचा : What is Nato : अमेरिका, नाटो आणि संयुक्त राष्ट्रांमधून बाहेर पडल्यास काय परिणाम होणार? याने चीनची ताकद वाढणार?

शहजादी खान यूएईला कशासाठी गेली?

शब्बीर खान म्हणाले, “उझैरशी ओळख झाल्यानंतर त्याने शहजादीला चांगले भविष्य आणि वैद्यकीय उपचाराचे आश्वासन दिले होते. उझैरने तिला सांगितले की, त्याचे काका-काकू यूएईला राहतात. त्यांच्या ओळखीमुळे तुला यूएईचा ९० दिवसांचा व्हिसा मिळू शकतो. तिथे गेल्यानंतर तुला चांगली नोकरी मिळेल आणि वैद्यकीय उपचारही घेता येईल.” शब्बीर यांनी असाही आरोप केला की, “शहजादी द्विधा मनस्थितीत होती, तेव्हा उझैरने तिला धीर देऊन ९० दिवसांच्या व्हिसावर यूएईला पाठवलं. मात्र, तिथे गेल्यानंतर शहजादीला कळालं की, तिला बंधपत्रित मजूर म्हणून फैज आणि नादिया दाम्पत्याला विकण्यात आलं आहे.” दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुबईत राहणाऱ्या या जोडप्याविरुद्ध अधिकाऱ्यांनी मानवी तस्करीचा गुन्हाही दाखल केला आहे.

शहजादीवर बाळाची हत्या केल्याचा आरोप

शब्बीर खान यांनी सांगितलं की, फैज आणि नादिया दाम्पत्याने त्यांच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी शहजादीकडे दिली. तिने बाळाचा चांगला सांभाळ केला, परंतु, २०२२ मध्ये अचानक लसीकरणानंतर बाळाचा मृत्यू झाला. तेव्हा शहजादी खाननेच बाळाची हत्या केली, असा आरोप चिमुकल्याच्या पालकांनी केला. याप्रकरणात अबुधाबी पोलिसांनी शहजादीला अटक केली आणि तिच्यावर गुन्हा दाखल केला. शब्बीर खान यांच्या म्हणण्यानुसार बाळाच्या पालकांनी पोस्टमार्टम करण्यास नकार दिला होता.

न्यायालयीन सुनावणीत काय काय घडलं?

न्यायालयाच्या दस्तऐवजानुसार, शहजादीवर बाळाला गुदमरून मारल्याचा आरोप होता. खटल्यादरम्यान बाळाच्या आई-वडिलांनी असा आरोप केला की, शहजादी चुकीचे वर्तन करीत होती आणि पगार न दिल्यामुळे ती नाराज होती. याच रागातून तिने बाळाची हत्या केली. दरम्यान, शहजादी आणि तिच्या वडिलांनी या आरोपांचं खंडण केलं होतं. बाळाचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला असा दावा त्यांनी केला होता. ज्या दिवशी बाळाला लस दिली होती, त्या दिवशी त्याला ताप आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, असं शहजादीने सांगितलं होतं. तर शब्बीरने ब्रिटीश प्रकाशनाला सांगितले की, त्याच्या मुलीला बाळाच्या आईने फसवले आणि खोट्या कबुलीजबाबावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले, ज्यामुळे तिला चुकीची शिक्षा झाली. “तिने ते केले नाही. माझी मुलगी निर्दोष आहे,” असे ते म्हणाले.

शहजादीला वाचवण्यासाठी वडिलांचा लढा

शहजादीची या प्रकरणातून सुटका होईल, अशी आशा तिचे वडील शब्बीर यांना होती. ती लवकर भारतात परतली पाहिजे, अशी प्रार्थना ते करीत होते. गेल्यावर्षी शब्बीर यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून दयेची मागणीही केली होती. तसेच या प्रकरणाचा सखोलपणे तपास व्हावा, असं त्यांनी म्हटलं होतं. मुलीला जाणीवपूर्वक बाळाच्या मृत्यूप्रकरणी फसवण्यात आले आहे, असा आरोप शब्बीर यांनी केला होता. इतकंच नाही तर त्यांनी उझैरच्या अटकेचीदेखील मागणी केली. “माझ्या मुलीची फाशीची शिक्षा सुरुवातीला २ मे २०२३ रोजी नियोजित होती,” असे त्यांनी ‘द इंडिपेंडंट’शी बोलताना म्हटलं होतं.

हेही वाचा : Gold Price Prediction 2025 : सोन्याचा प्रति तोळा भाव लाखात जाणार? दरवाढीची कारणं कोणती?

शब्बीर खान म्हणाले, “शाही कुटुंबातील एका सदस्याच्या निधनामुळे आणि यूएईतील पूर आल्यामुळे शहजादी खानची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, २० सप्टेंबरनंतर तिला कधीही फाशी दिली जाऊ शकते. या महिन्याच्या सुरुवातीला मला यूएईच्या तुरुंगातून फोन आला होता, शहजादीला २४ तासांच्या आत फाशी दिली जाऊ शकते, असं त्यांनी मला सांगितलं होतं. परंतु, भारतीय दूतावासाने याची माहिती घेतली असता, शहजादीला त्वरित फाशी देण्याची आमची योजना नाही, असं यूएईतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.”

शहजादी खानवर कुठे अंत्यसंकार होणार?

“शहजादीला २४ तासांत फाशी दिली जाईल ही माहिती चुकीची आहे. यूएई अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाला यासंदर्भातील माहिती दिली आहे. तिने दया याचिका दाखल केली असून या प्रकरणावर चौकशी सुरू आहे, असं इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी सांगितलं होतं. त्यानंतर जसजसे दिवस जात होते, तसतसे शहजादी खान कुटुंब न्यायाची वाट पाहत होते, त्यांची मुलगी यूएईतून भारतात परत येणार, अशी आशा शब्बीर खान यांना होती. परंतु, १५ फेब्रुवारी रोजी शहजादीला अबुधाबीमध्ये फाशी देण्यात आली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला या संदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, “शहजादी खानवर ५ मार्च रोजी अबुधाबी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यासाठी परराष्ट्र मंत्रालय खान कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करेल.”