स्वदेशी हलक्या वजनाच्या ‘तेजस – एमके-१ ए’ लढाऊ विमानाच्या उत्पादनास होणारा विलंब भारतीय हवाई दलाच्या चिंतेत भर घालत आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार तेजसची पूर्तता करावी, याकरिता हवाई दलाने आग्रही भूमिका घेतली आहे.

‘तेजस – एमके- १ ए’ला विलंब का होत आहे ?

हवाई दलाने एचएएलकडे ८३ तेजस – एमके- १ ए विमानांची मागणी नोंदवली आहे. तब्बल ४७ हजार कोटींचा हा करार आहे. हवाई दलाची गरज आणि परदेशातून त्यात रस दाखविला गेल्याने तेजसच्या उत्पादनास गती मिळणे अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. या विमानात सुमारे ७५ टक्के स्वदेशी सामग्री वापरली जाते. इंजिनसाठी अमेरिकेच्या जीई एरोस्पेसशी करार करण्यात आला. तंत्रज्ञान हस्तांतरणाद्वारे एफ ४०४ हे इंजिन स्थानिक पातळीवर तयार केले जाईल. त्याच्या पुरवठ्यास काही महिन्यांचा विलंब झाला. एका अहवालानुसार २०२३-२४ वर्षात कंपनी वार्षिक १६ इंजिन देणार होती. मात्र, ऑक्टोबर २०२४ पर्यंत एकाही इंजिनचा पुरवठा होऊ शकला नाही. या व्यतिरिक्त तेजसच्या एमके- १ या प्रगत आवृ्त्तीत नव्या प्रणालींचे प्रमाणीकरण बाकी आहे. याची झळ उत्पादनास बसली. या स्थितीमुळे एचएएल वर्षाकाठी १६ ऐवजी १० ते १२ विमानांचा पुरवठा करू शकेल, असा अंदाज आहे.

हवाई दलाची सूचना काय?

तेजस एमके-१ ए विमानांच्या पुरवठ्यास विलंब होत असल्याविषयी मध्यंतरी मावळते हवाईदल प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी टिप्पणी केली होती. नवीन हवाईदल प्रमुखांनी उत्पादन वाढविणे व वेळापत्रकानुसार विमाने वितरित करण्यावर एचएएलने उपाय शोधण्याची गरज मांडली होती. पुरवठ्यात तफावत वाढत असल्याने ती भरून काढण्यासाठी वैविध्यपूर्ण उत्पादन साखळी उभारण्याकडे हवाई दलाने लक्ष वेधले. हवाई दल लढाऊ विमानांच्या कमतरतेला तोंड देत आहे. हवाई दलात तेजसच्या १० तुकड्या (स्क्वॉड्रन) स्थापण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अतिरिक्त ९० विमानांची मागणी नोंदविण्याचा विचार होत आहे. या स्थितीत तेजसच्या पुरवठ्यातील विलंब त्वरित दूर करण्याचे आवाहन दलाने केले आहे.

हेही वाचा : विश्लेषण : १०२ टन सोने इंग्लंडकडून भारताकडे… रिझर्व्ह बँकेच्या ‘सोने वापसी’ निर्णयामागे काय कारण?

एचएएल मार्ग कसा काढणार ?

आधीच्या मागणीतील ४० तेजस -एमके विमाने एचएएलने हवाई दलाकडे सोपविली आहेत. तेजस – एमके-१ एच्या पूर्ततेस फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात होणे अपेक्षित होते. इंजिन उपलब्धतेस विलंब झाल्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झाली. तरीही ८३ विमानांच्या पुरवठ्यात लक्षणीय विलंब होणार नसल्याचे सांगितले जाते. एचएएलकडे इंजिन बदलण्याचा पर्याय आहे. परंतु, त्याची गरज भासणार नाही. कारण, नोव्हेंबरपासून इंजिन मिळण्यास सुरुवात होत आहे. त्यामुळे करारानुसार सर्व काही होईल, असे एचएएलकडून सांगितले जाते. तेजसच्या सध्या दोन उत्पादन साखळ्या असून त्या तीनवर नेऊन वर्षाकाठी १६ विमान उत्पादनाची क्षमता २४ पर्यंत नेण्याची तयारी करण्यात आली आहे.

लढाऊ विमानांचा समतोल राखण्याचे आव्हान काय ?

भारतीय हवाई दलास लढाऊ विमानांच्या ४२ तुकड्यांची आवश्यकता आहे. मंजूर क्षमतेच्या तुलनेत सध्या केवळ ३१ तुकड्या अस्तित्वात आहेत. आगामी काळात मिग-२९, जॅग्वार आणि मिराज – २००० ही विमाने निवृत्तीच्या वाटेवर येतील. निरोप घेणाऱ्या बहुतांश विमानांची जागा तेजसला देऊन समतोल साधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी एचएएलकडे ८३ विमानांची मागणी नोंदविण्यात आली.

हेही वाचा : ९५ किलो ड्रग्ज जप्त करीत प्रयोगशाळेचा पर्दाफाश; या प्रकरणात तिहार तुरुंगाची चर्चा का? मेक्सिको कार्टेलशी याचा काय संबंध?

विमाने मिळण्यास विलंब होत असला तरी दलाने आणखी ९० तेजस एमके- १ ए लढाऊ विमाने खरेदीचा विचार केलेला आहे. २०२७-२८ पासून २०३१-३२ पर्यंत ही विमाने ताफ्यात समाविष्ट होऊ शकतील. तोवर तेजसची अधिक सक्षम एलसीए-एमके- २ आवृत्ती दाखल होणे अपेक्षित आहे. निर्धारित वेळेत तेजस विमाने मिळाल्यास २०३० पर्यंत हवाई दलात लढाऊ विमानांच्या ३२ किंवा ३३ तुकड्या असतील. २०४० पर्यंत ही संख्या ३४ किंवा ३५ तुकड्यांपर्यंत नेता येईल. विमाने मिळण्यास विलंब झाल्यास तुकड्यांची संख्या कायम राखण्याचे आव्हान उभे राहील.

aniket.sathe@expressindia.com