‘AppDynamics’ चे संस्थापक ज्योती बन्सल यांची कथा अनेक उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. परंतु, मेहनतीने तयार केलेली हीच कंपनी ३.७ बिलियन डॉलर्स म्हणजेच ३१ हजार कोटींमध्ये विकण्याच्या निर्णयाचा आजही त्यांना पश्चाताप होतोय. बन्सल यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कल्याण लक्षात घेऊन त्यांची सॉफ्टवेअर कंपनी विकण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी ‘सीएनबीसी मेक इट’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले. २०१७ साली स्थापन केलेली AppDynamics कंपनी त्यांनी ३.७ बिलियन डॉलर्समध्ये विकली आणि या निर्णयामुळे त्यांचे ४०० कर्मचारी करोडपती झाले.
भारतात जन्मलेले ज्योती बन्सल आता सॅन फ्रान्सिस्को येथे राहतात. त्यांनी या विक्रीला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय म्हटले, परंतु आपण हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. AppDynamics २०१७ मध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी सज्ज असतानाच, टेक जायंट ‘सिस्को’ने कंपनीला तब्बल ३.७ बिलियन डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली. कोण आहेत ज्योती बन्सल? कंपनीच्या विक्रीमुळे त्यांचे कर्मचारी कसे करोडपती झाले? त्याविषयी जाणून घेऊ.
हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवळ आठ वर्षे सत्तेवर का राहू शकतात? काय आहेत नियम?
कोण आहेत ज्योती बन्सल?
बन्सल यांना उद्योजक होण्याची फार पूर्वीपासून इच्छा होती. आयआयटी दिल्ली येथून त्यांनी पदवी प्राप्त केली होती. २० हून अधिक यूएस पेटंट्सचे प्रमुख शोधक म्हणूनही ते ओळखले जातात. सिलिकॉन व्हॅलीमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आठ वर्षे काम केल्यानंतर त्यांना त्यांचे ग्रीन कार्ड मिळाले आणि त्यांनी स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली. अभियंता या नात्याने त्यांना भेडसावलेल्या सर्वात मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी त्यांनी ‘AppDynamics’ ची स्थापना केली. मोठ्या कंपन्यांना सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने महत्त्वाची गरज भागवणारी ही कंपनी लवकरच प्रगतिपथावर पोहोचली आणि कंपनीमुळे ज्योती बन्सलही एक यशस्वी उद्योजक झाले.
AppDynamics सॉफ्टवेअर स्टार्टअप्स कंपन्यांच्या विपरीत आहे. या कंपनीची रचना एंटरप्राइझ मार्केटला लक्ष्य करण्यासाठी केली गेली होती. त्यासाठी मोठ्या कंपन्या दरवर्षी लाखो डॉलर्स खर्च करण्यास तयार असतात. उल्लेखनीय म्हणजे, कंपनीने मोठ्या कॉर्पोरेशनना त्यांच्या ॲप्समधील त्रुटी सोडवण्यात मदत केली; ज्यामुळे फार कमी काळात ही कंपनी प्रसिद्ध झाली.
त्यांनी कंपनी विकण्याचा निर्णय का घेतला?
बन्सल यांनी त्यांच्या उद्योजकीय महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात येण्यापूर्वी त्यांची सॉफ्टवेअर अभियांत्रिकी कौशल्ये विकसित करण्यात बरीच वर्षे घालवली होती. कंपनीतील १,२०० कर्मचार्यांवर संभाव्य आर्थिक आणि सांस्कृतिक प्रभाव बघता, त्यांनी ही कंपनी विकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. संपादनापूर्वी त्यांनी विचारात घेतलेल्या घटकांवर केलेल्या चर्चेविषयी ‘सीएनबीसी मेक इट’ला सांगितले, “आम्ही सिस्कोसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा आणि बाजाराचा भाग असू शकतो, हा एक घटक होता. दुसरा घटक म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांना काय लाभ मिळणार, तसेच तिसरा घटक म्हणजे आर्थिक कारणांमुळे “एकमात्र संस्थापक म्हणून मी पुरेसा भाग्यवान होतो की, आर्थिकदृष्ट्या कोणताही परिणाम माझ्यासाठी चांगला असेल. परंतु, आमच्याकडे सुमारे ३०० किंवा त्याहून अधिक कर्मचारी होते. या विक्रीमुळे प्रत्येक कर्मचार्याला एक मिलियन डॉलर्स (आठ कोटी रुपये) पेक्षा जास्त लाभ मिळाला. काही कर्मचार्यांना पाच मिलियन डॉलर्स (४० कोटी रुपये) इतका लाभ मिळाला,” असे त्यांनी सांगितले.
बन्सल यांना निर्णयाचा खेद का?
बन्सल यांनी विक्रीनंतरच्या अनुभवाविषयी सांगितले. ते म्हणाले, या निर्णयानंतर त्यांना रात्री झोप लागत नव्हती. ते म्हणाले, कंपनी विकणे सोपे होते असे काहींना वाटत असले तरी हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण निर्णय होता. “मी माझ्या आयुष्यातील नऊ वर्षे जे काही केले, ते पूर्णपणे समर्पित केले,” असे त्यांनी ‘आउटलेट’ला सांगितले. “विक्रीनंतर मला जाणवले की मला कंपनी तयार करण्यात, उत्पादने तयार करण्यात, समस्यांचे निराकरण करण्यात, बाजारपेठेत स्पर्धा करण्यात, कंपनीच्या उभारणीतील प्रत्येक घटक ज्यातून मी गेलो होतो; हे तणावपूर्ण होते, परंतु मला खरोखर आनंद झाला. मला एका क्षणी असेही वाटले की, आम्हाला जे करायचे होते, ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही,” असेही ते म्हणाले. बन्सल यांनी हेदेखील कबूल केले की, भावनिक आव्हाने असूनही सिस्कोला ॲपडायनॅमिक्स विकणे हा योग्य निर्णय होता. हा करार त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरला, कारण कंपनीच्या १४ टक्क्यांहून अधिक मालकी त्यांच्याकडे होती.
हेही वाचा : हुकूमशहा किम जोंग उन सक्रिय; उत्तर कोरिया-दक्षिण कोरिया युद्धाच्या उंबरठ्यावर?
आर्थिकदृष्ट्या कोणता पर्याय अधिक चांगला आहे, याचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयपीओ नंतरच्या अंदाजांची तुलना सिस्कोच्या स्टार्टअपच्या मूल्यांकनाशी केली. ३.७ बिलियन डॉलर्सचे बाजार भांडवल प्राप्त करण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागला असता असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, याचा अर्थ असा की, तीन ते चार वर्षांची जोखीम आम्ही तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कमी केली.” १९९८ साली क्लाउड सायबर सिक्युरिटी फर्म ‘SecureIT’ कंपनी ‘VeriSign’ने ७० दशलक्ष डॉलर्समध्ये विकत घेतली होती. स्टार्टअपचे संस्थापक जय चौधरी यांनी ‘सीएनबीसी मेक इट’ला सांगितले होते की, कर्मचार्यांना त्वरित लाभ मिळाला नाही, परंतु दोन वर्षांनंतर ‘VeriSign’च्या स्टॉकची किंमत गगनाला भिडली आणि कंपनीचे ८० पैकी किमान ७० कर्मचारी लक्षाधीश झाले.