२०२३ मध्ये व्हाईट हाऊसच्या गेटमध्ये ट्रक घुसवल्याबद्दल एका भारतीय वंशाच्या माणसाला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना संपवणे आणि व्हाईट हाऊसचे नियंत्रण ताब्यात घेणे हे त्याचे ध्येय होते. २२ मे २०२३ रोजी साई वर्षित कंदुलाने व्हाईट हाऊसच्या लाफायट पार्क प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडील सुरक्षा बॅरिकेड्समध्ये भाड्याने घेतलेला ट्रक घुसवून हल्ला केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तपासादरम्यान त्याने अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याला अमेरिकेतील लोकशाही उलथवून टाकायची होती आणि नाझी विचारसरणीने चालणारी हुकूमशाही स्थापित करायची होती. या घटनेच्या जवळपास दोन वर्षांनंतर त्याला आठ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोण आहे साई वर्षित कंदुला? नेमके प्रकरण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

हेही वाचा : देशातील प्रजनन दर झपाट्याने का घटतोय? हा चिंतेचा विषय आहे का?

कोण आहे साई वर्षित कंदुला?

मिसुरी येथील चेस्टरफिल्डचा रहिवासी असलेला साई वर्षित कंदुला सेंट लुईस येथून ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. व्हाईट हाऊसच्या प्रवेशद्वारावर धडकण्यापूर्वी त्याने काही तास आधी एक ट्रक भाड्याने घेतला होता, अशी माहिती ‘एनबीसी न्यूज’ने दिली. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, त्याने व्हाईट हाऊसच्या बाहेरील पदपथावर आणि व्हाईट हाऊसच्या अगदी उत्तरेस असलेल्या एका धातूच्या गतिरोधकावर वाहन वळवले. सीक्रेट सर्व्हिस एजंटने दाखल केलेल्या निवेदनानुसार, युनायटेड स्टेट्स पार्क पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेण्याआधी कंदुलाने ट्रक उलटवला, अशी माहिती ‘एनबीसी न्यूज’ने नोंदवली.

साई वर्षित कंदुलाने व्हाईट हाऊसच्या लाफायट पार्क प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडील सुरक्षा बॅरिकेड्समध्ये भाड्याने घेतलेला ट्रक घुसवून हल्ला केला होता. (छायाचित्र-लोकसत्ता संग्रहीत)

अपघातानंतर वाहनातून धूर निघू लागला, तेव्हा साई वर्षित कंदुला याने आपल्या बॅगेतून नाझी स्वस्तिक असलेला ध्वज काढला आणि तो ध्वज फिरवू लागला. त्यानंतर यूएस पार्क पोलिसांनी त्याला अटक केली. “त्याला अमेरिकेतील लोकशाही प्रक्रिया संपवायची होती आणि सरकारच्या जागी नाझीप्रेरित हुकूमशाही आणायची होती,” अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली.

त्याने नाझी ध्वज का हाती घेतला?

त्याच्या अटकेनंतर त्याने मान्य केले आणि सांगितले की, तो नाझींना महान नेते मानतो. तो म्हणाला की, नाझींचा इतिहास मोठा आहे म्हणून त्याने नाझी स्वस्तिक ध्वज विकत घेतला. “त्याने विशेषतः ॲडॉल्फ हिटलरचे कौतुक केले आणि हे फक्त शब्द नव्हते – जेव्हा त्याचा ट्रक हल्ल्यात अक्षम झाला होता, तेव्हा त्याने सर्वप्रथम नाझी जर्मनीचा ध्वज फडकवला होता,” असे अभियोजकांनी लिहिले आहे.

साई वर्षित कंदुलाच्या अटकेनंतर दोन मानसशास्त्रज्ञांनी त्याला स्किझोफ्रेनिया हा आजार असल्याचे सांगितले, असे बचाव पक्षाचे वकील स्कॉट रोसेनब्लम यांनी सांगितले. स्किझोफ्रेनिया हा पूर्णपणे एक मानसिक आजार आहे. सरकारी व बचाव अशा दोन्ही पक्षांचा)विश्वास आहे की, त्याच्या आजारामुळे त्याच्याकडून हा गुन्हा घडला,” असे बचाव पक्षाच्या वकिलाने म्हटले आहे. रोझेनब्लम म्हणाले की, साई वर्षित कंदुलाला दोषी ठरवल्यामुळे त्याला भारतात हद्दपार केले जाईल.

कंदुलाची तुरुंगवासाची शिक्षा किती काळ आहे?

कंदुलाला त्याच्या हिंसक कृत्याबद्दल आठ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यूएस जिल्हा न्यायाधीश डॅबनी फ्रेडरिक यांनीही साई वर्षित कंदुला गेल्या तीन वर्षांपासून अटकेत होता, आता त्याने केलेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी करार देत शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या नोंदीनुसार त्याला सुमारे ५७,००० डॉलर्स (४९.३५ लाख) भरपाई देण्याचे आदेश दिले आहे. रोसेनब्लम म्हणाले की, साई वर्षित कंदुला स्किझोफ्रेनियाने ग्रस्त होता आणि त्याचा समज होता की, देश चालविण्यासाठी एक कठपुतळी शासन स्थापित केले गेले आहे. यांसारखे भ्रामक विचार त्याच्या डोक्यात होते.

“तो उपचारांसाठी सक्षम आहे. त्याच्या आजारामुळे सद्य परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे रोझेनब्लम यांनी लिहिले. अधिकाऱ्यांना त्याच्याकडे कोणतीही शस्त्रे, दारूगोळा किंवा स्फोटके सापडली नाहीत. परंतु सरकारी वकिलांनी सांगितले की, पेनसिल्व्हेनियामध्ये १३ जुलै रोजी झालेल्या रॅलीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा केला गेलेला प्रयत्न ही गोष्ट दर्शविते की, अशा विध्वंसक हेतू बाळगणाऱ्या व्यक्ती अमेरिकन राजकीय व्यवस्थेला गंभीर नुकसान पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहेत.

हेही वाचा : Sanchar Saathi : घरबसल्या करता येणार सायबर फसवणुकीची तक्रार; काय आहे सरकारचे नवीन संचार साथी ॲप?

या हल्ल्यानंतर व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली होती. कॅपिटल हिलजवळ बॅरिकेड्सवर वाहने आदळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिंसाचारानंतर सुमारे तीन महिन्यांनंतर, दोन कॅपिटल पोलीस अधिकाऱ्यांना कारने धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा जखमी झाला. ऑगस्ट २०२३ मध्ये कॅपिटल हिलजवळ एका व्यक्तीने आपली कार बॅरिकेडमध्ये घुसवली. त्यानंतर कारने पेट घेतला. आरोपी रिचर्ड यॉर्कने कारमधून बाहेर येऊन हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली. साई वरिष्ठ कंदुला याच्या चौकशीत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली. “आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असल्यास त्याने अमेरिकन अध्यक्ष आणि इतरांच्या हत्याही केल्या असत्या,” असे अमेरिकन पोलिसांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian american gets 8 years in prison for attempted white house attack rac