सॅन जुआन, पोर्तो रिको येथे १७ मार्च रोजी झालेल्या मिस वर्ल्ड २०२१ सौंदर्य स्पर्धेत भारतीय-अमेरिकन श्री सैनीने प्रथम उपविजेतेपद पटकावलं. तिने सौंदर्य स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. श्री सैनी ही मिस वर्ल्ड ब्युटी विथ अ पर्पज (BWAP) अॅम्बेसेडर देखील आहे.
ऑक्टोबर २०२१ मध्ये, श्री सैनी मिस वर्ल्ड अमेरिका जिंकणारी पहिली भारतीय-अमेरिकन बनली. श्री सैनी पंजाबमधील लुधियाना येथील आहे. ती फक्त ५ वर्षांची असताना तिचे कुटुंब वॉशिंग्टन डीसीला गेले. तिला आरोग्याच्या दृष्टीने खूप त्रास झाला होता. ती १२ वर्षांची होती तेव्हापासून तिला कायमस्वरूपी पेसमेकर लावला होता आणि तिला दुर्मिळ हृदयविकाराचे निदान झाले होते. यामुळे तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आणि पेसमेकर टाकण्यात आला, असे बेटर इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तिच्या एक जीवघेणा अपघात देखील झाला ज्यामुळे तिचा चेहरा भाजला. पण तिने काहीही आपल्या यशाच्या वाटेत येऊ दिले नाही आणि ती अधिक मजबूत झाली. अनेक आव्हानांना तोंड देत तिला तिच्या आयुष्याचा उद्देश मिळाला. एका मुलाखतीत तिने एकदा सांगितले होते की मिस वर्ल्ड बनणे हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते आणि तिला इतरांना प्रेरित करायचे आहे.“मला आशा आहे की चेहऱ्यावरील डाग आणि हृदयाच्या दोषांवर मात करण्याची माझी कथा लोकांना त्यांच्या दैनंदिन आव्हानांवर मात करण्यास प्रोत्साहित करेल,” तिने मिस वर्ल्ड इव्हेंटच्या आधी केलेल्या एका Instagram पोस्टमध्ये लिहिले.
श्री सैनीचे इंस्टाग्रामवर एक मिलियनपेक्षाही अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती अनेकदा तिच्या विविध फोटोशूटमधील फोटो शेअर करत असते. युनिसेफ, डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स, ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशन – सुसान जी कोमेन यांनीही तिच्या कार्याला मान्यता दिली आहे.