१९७०च्या दशकात रामजन्मभूमीच्या जागी उत्खननात अग्रणी असलेले व गेल्याच वर्षी ज्यांना पद्म विभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आले असे पुरातत्त्ववेत्ते ब्रज बासी लाल यांचे आज शनिवारी सकाळी निधन झाले. १९६८ ते १९७२ या काळात लाल भारतीय पुरातत्त्व खात्याचे महासंचालक होते. हडप्पाची नागरी संस्कृती व महाभारताशी संबंधित प्राचीन स्थळांविषयी लाल यांचा दांडगा अभ्यास होता. युनेस्कोच्या विविध समित्यांमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या लाल यांना २००० मध्ये पद्म भूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. बाबरी मशिदीखाली मंदिरासारखी वास्तू होती, या त्यांच्या सिद्धांतासाठी ते ओळखले जातात.
कोण होते ब्रज बासी किंवा बी. बी. लाल?
उत्तर प्रदेशातील झाशी येथे १९२१ मध्ये लाल यांचा जन्म झाला. पण नंतरचे त्यांचे वास्तव्य नवी दिल्लीत होते. अलाहाबाद विद्यापीठातून संस्कृतमध्ये मास्टर्स डिग्री घेतल्यानंतर पुरातत्त्व क्षेत्रामध्ये त्यांना विशेष गोडी लागली. १९४३मध्ये प्रख्यात ब्रिटिश पुरातत्त्ववेत्ते मॉर्टिमर व्हीलर यांच्या हाताखाली लाल यांनी शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण घेतले. तक्षशीलेपासून त्यांची या क्षेत्रातली कारकिर्द सुरू झाली. नंतरच्या ५० वर्षांमध्ये लाल यांचा ५० पेक्षा जास्त ग्रंथनिर्मितीमध्ये आणि देश विदेशात प्रकाशित झालेल्या १५० पेक्षा जास्त संशोधन अहवालांच्या निर्मितीमध्ये सहभाग होता. ‘The Saraswati flows on: The continuity of Indian culture’ हा त्यांचा ग्रंथ २००२ मध्ये प्रकाशित झाला आणि ‘Rama, his historicity, mandir and setu: Evidence of Literature, Archaeology and other Sciences’ हा ग्रंथ २००८मध्ये प्रकाशित झाला.
विश्लेषण : मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा पालघर टप्पा मृत्यूचा सापळा?
इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या आर्यांचे आक्रमण वा स्थलांतर या सिद्धांतास छेद देणारा स्वतंत्र सिद्धांत लाल यांनी ‘सरस्वती फ्लोज ऑन’ या ग्रंथात मांडला आहे. ऋग्वेद काळातील समाज व हडप्पा संस्कृतीच्या काळातील समाज एकच होता हा लाल यांचा निष्कर्ष निर्विवाद नसून त्याबाबत मतांतरे आहेत. या वरून त्यांच्यावर अनेक इतिहासाकारांनी टीकाही केली आहे.
१९५० – ५२ च्या काळात लाल यांनी महाभारताशी संबंधित स्थळांवर उत्खनन केले होते. यमुना व गंगा नदीच्या खोऱ्यांलगतच्या प्रदेशातील उत्खननात लाल यांना रंगीत मातीची भांडी आढळली होती. त्यानंतर जवळपास २० वर्षांनी १९७५मध्ये लाल यांनी संशोधन अहवाल लिहिला, ‘In search of India’s traditional past: Light from the excavations at Hastinapura and Ayodhya.’ महाभारत हे काल्पनिक नसून ते वास्तवात घडल्याचे पुरावे या संशोधनातून मिळाल्याचे सूचित होत असल्याचे व नंतरच्या काळात त्या कथेचा विस्तार झाल्याचे लाल यांनी नमूद केले आहे.
बी. बी. लाल यांना अयोध्येतील रामजन्मभूमीमध्ये काय आढळलं?
महाभारताच्या घटनास्थळी उत्खनन करतानाच लाल यांनी १९७५ मध्ये दुसरा प्रकल्प हाती घेतला ज्याचे नाव होते ‘Archaeology of the Ramayana sites’. भारतीय पुरातत्त्व खाते, ग्वाल्हेरमधले जिवाजी विद्यापीठ व उत्तर प्रदेशच्या पुरातत्त्व खात्यांनी या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य केले. ३१ मार्च १९७५ या दिवशी अयोध्येमध्ये ‘रामजन्मभूमीच्या जागी पुरातत्त्वशास्त्र’ या मोहिमेची सुरुवात झाली. अयोध्या, भारद्वाज आश्रम, नंदिग्राम, चित्रकूट व श्रींगावेरापुरा अशा पाच ठिकाणी उत्खनन करण्यात आले.
१९७५ मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात लाल लिहितात, “अयोध्येत झालेल्या उत्खननात ख्रिस्तपूर्व आठव्या शतकाआधीचे काही पुरावे आढळत नाहीत.” या अहवालात नाणी व भांड्यांचे उल्लेख असले तरी मंदिराच्या अवशेषांचा उल्लेख नव्हता.
परंतु, १९९० मध्ये लिहिलेल्या अहवालात लाल यांनी या उत्खननाआधारे ‘pillar-base theory’ किंवा ‘स्थंभाधारित सिद्धांत’ मांडला. मंदिरामध्ये असतात त्याप्रमाणे स्तंभ किंवा खांब आढळल्याचे व हेच खांब बाबरी मशिदीच्या पायासाठी वापरण्यात आल्याचे त्यांनी सूचित केले. भाजपाप्रणीत ‘मंथन’ या नियतकालिकामध्ये लाल यांचे संशोधन छापून आले.
‘Rāma, His Historicity, Mandir and Setu: Evidence of Literature, Archaeology and Other Sciences,’ या २००८ मध्ये लिहिलेल्या ग्रंथात लाल लिहितात, “बाबरी मशिदीच्या बांधकामात १२ दगडी खांब वापरण्यात आले होते, ज्यावर केवळ हिंदूंची प्रतीकेच नव्हती तर देवदेवतांची चित्रेही होती. हे दगडी खांब मशिदीचा मूळ भाग असू शकत नाहीत हे स्वयंप्रकाशित आहे.”
२००२ मध्ये न्यायालयाने नेमलेल्या समितीनेही लाल यांचा हा मंदिरसदृष्य स्तंभांचा सिद्धांत स्वीकारला.