अन्वय सावंत
भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने नुकत्याच झालेल्या सुपर ५०० मानांकन मालिकेतील कॅनडा खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. लक्ष्यने गेल्या वर्षी बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली होती. मात्र, त्यानंतर त्याच्या नाकाला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच गुडघा आणि पाठीच्या दुखापतीनेही तो त्रस्त होता. या दुखापतींनंतर पुन्हा पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. या वर्षी बॅडमिंटन कोर्टवर परतल्यानंतर त्याला लवकर सूरही गवसला नाही. मात्र, कॅनडा स्पर्धेत २१ वर्षीय लक्ष्यने आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध करताना जेतेपदावर नाव कोरले. या यशामुळे प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद यांचा वारसदार मानल्या जाणाऱ्या लक्ष्यकडून आगामी काळात, विशेषतः २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
लक्ष्यची कॅनडा स्पर्धेतील कामगिरी खास का ठरली?
दुखापतींना मागे सारून बॅडमिंटन कोर्टवर परतल्यानंतर या वर्षी लक्ष्यला लय मिळवण्यासाठी झगडावे लागत होते. कॅनडा स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना त्याने यंदाच्या हंगामात प्रथमच जेतेपदासाठी लढण्याची संधी मिळवली. अंतिम फेरीत त्याच्यासमोर ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेत्या लि शी फेंगचे आव्हान होते. हा सामना चुरशीचा होईल असे अपेक्षित होते आणि तसेच झाले. परंतु लक्ष्यने निर्णायक क्षणी सर्वोत्तम खेळ करताना फेंगला सरळ दोन गेममध्ये २१-१८, २२-२० असे पराभूत करत कारकीर्दीत दुसऱ्यांदा सुपर ५०० दर्जा प्राप्त असलेली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. अंतिम लढतीत दुसऱ्या गेममध्ये लक्ष्य १६-२० असा पिछाडीवर होता. परंतु त्याने दडपणाखाली आपला खेळ उंचावला आणि चार ‘गेम पॉइंट’ वाचवले. इतकेच नाही, तर त्याने सलग सहा गुण मिळवत गेम आणि सामना आपल्या नावे केला. या सामन्यात लक्ष्यने वेग व ताकदवान फटक्यांचा सुरेख उपयोग केला.
लक्ष्यला भारतीय बॅडमिंटनचे भविष्य म्हणून का पाहिले जाते?
भारताला अनेक महान बॅडमिंटनपटूंचा वारसा लाभला आहे. प्रामुख्याने प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या माजी विजेत्यांमुळे भारतात बॅडमिंटनच्या प्रसाराला वेग आला. त्यानंतर पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणाॅय यांसारख्या पुरुष खेळाडूंनीही जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. मात्र, पदुकोण आणि गोपीचंद या दिग्गज बॅडमिंटनपटूंचा वारसदार म्हणून लक्ष्यकडे पाहिले जाते. अलमोडा, उत्तराखंड येथून पुढे आलेल्या लक्ष्यने पदुकोण यांच्या अकादमीतच वयाच्या १०व्या वर्षापासून बॅडमिंटनचे धडे गिरवले. पुढे त्याला राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांचेही मार्गदर्शन लाभले. लक्ष्यने कनिष्ठ स्तरावर अप्रतिम कामगिरी केली. २०१७मध्ये कनिष्ठ गटाच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थान पटकावल्यावर लक्ष्यला वरिष्ठ गटातही आपली छाप पाडण्यास वेळ लागला नाही. त्याने भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय सीरिज स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. तसेच कनिष्ठ गटातही दमदार कामगिरी सुरू ठेवताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. युवा ऑलिम्पिक आणि युवा जागतिक अजिंक्यपद या स्पर्धांमध्ये त्याने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदके आपल्या नावे केली. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा तारा उदयाला आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर वरिष्ठ गटातही त्याने आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली.
लक्ष्यने आजवर कोणत्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये चमक दाखवली आहे?
लक्ष्यने २०१९मध्ये वरिष्ठ गटात डच खुली स्पर्धा जिंकत आपले पहिले ‘बीडब्ल्यूएफ’ जेतेपद मिळवले. त्याला सारलोरलक्स स्पर्धाही जिंकण्यात यश आले. मात्र, जागतिक स्तरावर आणखी प्रकाशझोतात येण्यासाठी त्याला मोठ्या यशाची आवश्यकता होती. ती संधी त्याला २०२१च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मिळाली. या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात उपांत्य फेरी गाठल्याने त्याचे पदक निश्चित झाले. मात्र, या फेरीत श्रीकांतकडून पराभूत झाल्याने लक्ष्यला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २०२२ वर्षात लक्ष्यने सुरुवातीला इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. मग त्याने बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. तसेच थॉमस चषकाचे ऐतिहासिक जेतेपद मिळवणाऱ्या भारतीय पुरुष संघातही लक्ष्यचा समावेश होता. या कामगिरीमुळे लक्ष्यकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
लक्ष्यसह भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंची अलीकडच्या काळातील कामगिरी उल्लेखनीय का ठरते?
भारतीय बॅडमिंटनसाठी गेला काही काळ बरेच यश देणारा ठरला आहे. विशेषतः भारताच्या पुरुष बॅडमिंटनपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या वर्षी भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने थॉमस चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लक्ष्य (एकेरी), तसेच सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (दुहेरी) जोडीने सुवर्णपदकांची कमाई केली. सात्त्विक-चिरागने दर्जेदार कामगिरी सुरू ठेवताना या वर्षी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ‘सुपर १०००’ दर्जा प्राप्त स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. एचएस प्रणॉयने मलेशिया मास्टर्स (सुपर ३०० दर्जा) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. प्रणाॅयला तब्बल सहा वर्षांच्या कालावधीनंतर एखादी स्पर्धा जिंकण्यात यश आले. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारतासाठी ही नक्कीच सकारात्मक बाब मानता येईल.