सांघिक प्रकारात प्रतिष्ठेच्या ऑलिम्पियाडचे जेतेपद, मग वैयक्तिक प्रकारात जगज्जेतेपदावर मोहोर. बुद्धिबळविश्वातील भारताचे वर्चस्व अधोरेखित करण्यासाठी हे यश पुरेसे ठरणारे होते. मात्र, त्याही पुढे जाऊन भारत आता खेळाडूंच्या क्रमवारीतही ‘महासत्ता’ ठरत आहे. सध्या ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये अव्वल १५ बुद्धिबळपटूंत ५ भारतीयांचा समावेश आहे. त्यामुळे भारताने रशिया, चीनच नव्हे तर अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेचे चार बुद्धिबळपटू अव्वल १५ मध्ये आहेत. अन्य कोणत्याही देशाच्या एकापेक्षा अधिक खेळाडूंना यात स्थान मिळवता आलेले नाही.
‘लाइव्ह रेटिंग’ आणि क्रमवारीत काय फरक?
‘लाइव्ह रेटिंग’मध्ये विद्यमान गुणांकन दर्शविले जाते, तर जागतिक क्रमवारी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी नव्याने जाहीर केली जाते. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ अर्थात ‘फिडे’ जागतिक क्रमवारी जाहीर करत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, ‘लाइव्ह रेटिंग’ खासगी कंपन्यांकडून हाताळले जात असल्याने त्याला अधिकृत दर्जा प्राप्त नाही. असे असले तरी खेळाडूंची सध्याची लय आणि अलीकडच्या काळातील कामगिरी याचा आढावा घेण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये दर दिवशी चढ-उतार सुरू असतात.
‘लाइव्ह रेटिंग’मध्ये कोण कितव्या स्थानी?
जगज्जेता दोम्माराजू गुकेश तिसरे स्थान राखून आहे. पाठोपाठ अर्जुन एरिगेसी पाचव्या, तर आर. प्रज्ञानंद आठव्या स्थानावर कायम आहे. नुकतेच प्रज्ञानंदला मागे सोडत प्राग मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या अरविंद चिदम्बरमला ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये आठ स्थानांची बढती मिळाली. तो आता १४व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून ठरावीक स्पर्धांतच सहभाग नोंदवूनही पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद १५व्या स्थानावर आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन अग्रस्थान राखून आहे. कार्लसन (२८३७.१) आणि अमेरिकेचा हिकारू नाकामुरा (२८०२) या दोघांचेच सध्या एलो २८०० हून अधिक गुण आहेत. नाकामुरासह फॅबियानो कारुआना (चौथ्या स्थानी), वेस्ली सो (१२व्या) आणि लेव्हॉन अरोनियन (१३व्या) हे अमेरिकेचे बुद्धिबळपटू अव्वल १५ मध्ये आहेत.
अरविंद चिदम्बरमची मोठी झेप…
गुकेश, एरिगेसी, प्रज्ञानंद या युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंची नावे गेल्या पाच-सहा वर्षांपासूनच चर्चेत आहेत. या तिघांनी विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी करून आपली गुणवत्ता वारंवार सिद्ध केली आहे. तसेच दिग्गज विश्वनाथन आनंदचा लौकिक सर्वांना ठाऊक आहेच. मात्र, युवा अरविंद चिदम्बरमने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. चिदम्बरमने गेल्या वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे त्याला यंदा प्राग मास्टर्स स्पर्धेतून सर्वोच्च स्तराच्या (एलिट) बुद्धिबळात पदार्पणाची संधी मिळाली. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट खेळ करताना थेट जेतेपदापर्यंत मजल मारली. त्याने भारतीय सहकारी प्रज्ञानंदलाही मागे सोडले. या स्पर्धेपूर्वी चिदम्बरम ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये अव्वल २० बुद्धिबळपटूंतही नव्हता. मात्र, दोन आठवड्यांतच त्याने झटपट आगेकूच करताना आता १४वे स्थान मिळवले आहे. प्राग स्पर्धेच्या माध्यमातून चिदम्बरमने १३ गुणांची कमाई केली. त्यामुळे तो एलो २७३० गुणांवरुन २७४३ गुणांवर पोहोचला आहे.
भारताकडून कोणाची सर्वोत्तम कामगिरी?
भारताकडून बुद्धिबळातील अनेक विक्रमांप्रमाणेच ‘लाइव्ह रेटिंग’मधील सर्वोत्तम कामगिरीही विश्वनाथन आनंदच्याच नावे आहे. आनंदने आपल्या प्रथितयश कारकीर्दीत सर्वाधिक २८१७ गुणांपर्यंत मजल मारली होती. काही महिन्यांपूर्वी त्याचा हा विक्रम अर्जुन एरिगेसी मोडणार असे चित्र निर्माण झाले होते. एरिगेसीने २८०० गुणांचा टप्पा ओलांडला होता आणि अशी कामगिरी करणारा तो भारताचा केवळ दुसरा बुद्धिबळपटू होता. मात्र, त्यानंतर त्याला सातत्य राखता आले नाही. त्यामुळे आता त्याचे २७७७ गुण झाले आहेत. ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये जगज्जेता गुकेश भारताकडून सर्वोच्च तिसऱ्या स्थानी असून त्याचे २७८७ गुण आहेत. आगामी काळात तो आनंदचा विक्रम मोडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.