– अन्वय सावंत
भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने बुद्धिबळाच्या ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये २७०० एलो गुणांचा टप्पा पार केला आहे. प्रज्ञानंदने नुकतेच हंगेरी येथे झालेल्या सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. १० खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत १७ वर्षीय प्रज्ञानंदने ६.५ गुणांसह अव्वल स्थान मिळवले. या कामगिरीच्या आधारे त्याने क्रमवारीत तब्बल १६ स्थानांची बढती मिळवली, शिवाय कारकीर्दीत प्रथमच २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला. त्याची ही कामगिरी का खास ठरते आणि यापूर्वी भारताच्या कोणत्या बुद्धिबळपटूंनी अशी कामगिरी केली आहे, याचा आढावा.
प्रज्ञानंदची कामगिरी का खास ठरते?
सध्याच्या घडीला भारताच्या केवळ सहा बुद्धिबळपटूंच्या खात्यावर एलो २७०० पेक्षा अधिक गुण आहेत. यामध्ये पाच वेळा जगज्जेता विश्वनाथन आनंद (नवव्या स्थानी, २७५४ गुण), डी. गुकेश (११व्या स्थानी, २७५० गुण), विदित गुजराथी (२५व्या स्थानी, २७२३ गुण), पी. हरिकृष्णा (२८व्या स्थानी, २७११ गुण), अर्जुन एरिगेसी (२९व्या स्थानी, २७१० गुण) आणि प्रज्ञानंद (३१व्या स्थानी, २७०७ गुण) यांचा समावेश आहे. आनंद वगळता भारताच्या या बुद्धिबळपटूंनी क्रमवारीत आगेकूच केली आहे. आजवर भारताच्या केवळ आठ बुद्धिबळपटूंना २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडता आला आहे. त्यामुळे प्रज्ञानंदची कामगिरी खास ठरते आहे.
प्रज्ञानंदने हंगेरीतील स्पर्धेत कशी कामगिरी केली?
हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या सुपर ग्रँडमास्टर स्पर्धेत जागतिक स्तराच्या १० ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंचा समावेश होता. या स्पर्धेपूर्वी प्रज्ञानंदच्या खात्यावर २६९० गुण होते, पण स्पर्धेअंती त्याने २७०९ एलो गुण आणि पाच हजार युरोंचे बक्षीस आपल्या नावे केले. नवव्या आणि अखेरच्या फेरीअंती प्रज्ञानंदच्या खात्यावर एम. अमीन तबातबाई (इराण) आणि सनान स्युगिरॉव्ह (रशिया) यांच्यापेक्षा एक गुण अधिक होता. प्रज्ञानंदने या स्पर्धेत अप्रतिम खेळ करताना पाच सामने जिंकले आणि तीन सामने बरोबरीत सोडवले. त्याला केवळ एक पराभव पत्करावा लागला. पाचव्या फेरीत तबातबाईने त्याला नमवले होते. अखेरच्या फेरीत त्याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना पोलंडच्या राडोस्लाव वोयतासेकविरुद्धचा डाव बरोबरीत राखला आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सुपर ग्रँडमास्टर स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत प्रज्ञानंदने इराणच्या परहाम मघसूद्लूला नमवताना सलग दुसरा विजय मिळवला. या विजयानंतर त्याने ‘लाइव्ह रेटिंग’मध्ये कारकीर्दीत प्रथमच २७०० एलो गुणांचा टप्पा ओलांडला.
प्रज्ञानंदची आजवरची वाटचाल कशी राहिली आहे?
प्रज्ञानंदने वयाच्या १०व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय मास्टर, तर १२व्या वर्षीच ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. त्याने २०२२मध्ये एअरथिंग्ज मास्टर्स ऑनलाइन स्पर्धेत तत्कालीन जगज्जेता आणि बुद्धिबळातील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला होता. त्यावेळी कार्लसनला पराभूत करणारा तो सर्वांत युवा आणि एकूण तिसरा भारतीय ठरला होता. त्यानंतर त्याने चेसेबल मास्टर्स स्पर्धा आणि ‘एफटीएक्स’ क्रिप्टो चषक स्पर्धेतही कार्लसनला नमवण्याचा पराक्रम केला होता. चेसेबल मास्टर्स स्पर्धेदरम्यान त्याची अकरावीची परीक्षाही सुरू होती. सकाळी पेपर लिहिणे आणि मध्यरात्री उशिरापर्यंत बुद्धिबळ खेळणे अशी त्याची दुहेरी कसरत सुरू होती. मात्र, यानंतरही त्याला स्पर्धेत उपविजेतेपद मिळवण्यात यश आले होते. २०२३च्या सुरुवातीला प्रज्ञानंदने चीनच्या डिंग लिरेनला पारंपरिक प्रकारात पराभवाचा धक्का दिला होता. पुढे जाऊन डिंगने जगज्जेतेपद मिळवले. त्यामुळे प्रज्ञानंदच्या कामगिरीला अधिकच महत्त्व प्राप्त होते. तसेच प्रज्ञानंदने सांघिक स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली आहे. २०२२मध्ये ऑलिम्पियाड स्पर्धेत तिसरे स्थान मिळवणाऱ्या भारत-२ संघात प्रज्ञानंदचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या ग्लोबल चेस लीगमध्ये अल्पाइन वाॅरियर्सकडून खेळताना तो अपराजित राहिला आणि त्याने एकवेळ सलग सहा सामनेही जिंकले होते.
प्रज्ञानंदची खेळण्याची शैली कशी आहे?
युवा प्रज्ञानंद निडरपणे, आक्रमक खेळ करण्यासाठी ओळखला जातो. ‘‘आक्रमक खेळ करण्यात प्रज्ञानंदचा हातखंडा आहे. धोका पत्करून प्रतिस्पर्ध्यावर दडपण टाकणे ही प्रज्ञानंदची सर्वांत जमेची बाजू आहे. काही वेळा फारसा धोका न पत्करता, साध्या-सोप्या चाली रचण्याची आम्ही त्याला सूचना केली आहे,’’ असे प्रज्ञानंदच्या खेळण्याच्या शैलीचे प्रशिक्षक आर. बी. रमेश यांनी वर्णन केले आहे. ‘‘तो हळूहळू परिपूर्ण खेळाडू बनत चालला आहे. त्याच्यात आघाडीच्या खेळाडूंना सातत्याने पराभूत करण्याची क्षमता आहे,’’ असेही रमेश म्हणाले. प्रज्ञानंदच्या खेळात स्पर्धेगणिक सुधारणा दिसते आहे. त्यामुळेच त्याचे भारताच्या सर्वोत्तम बुद्धिबळपटूंमध्ये नाव घेतले जाते.
हेही वाचा : विश्लेषण : व्हिक्टोरियाच्या माघारीनंतर राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन भारत करू शकतो का?
प्रज्ञानंदसह गुकेशची कामगिरी उल्लेखनीय का ठरते आहे?
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेशचे एलो २७५० गुण झाले असून त्याने क्रमवारीत (लाइव्ह रेटिंग) ११व्या स्थानी झेप घेतली आहे. त्याच्यात आणि पाच वेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद (२७५४) यांच्यात केवळ दोन स्थानांचे अंतर आहे. आनंद नवव्या स्थानी कायम आहे. सध्या क्रमवारीत अव्वल २० बुद्धिबळपटूंमध्ये केवळ या दोन भारतीयांचा समावेश आहे. आनंदला मागे टाकण्याची आता गुकेशकडे संधी आहे. तसेच कारकीर्दीत एलो २७५० गुणांचा टप्पा ओलांडणारा तो आनंद (सर्वोत्तम २८१७) आणि पी. हरिकृष्णा (सर्वोत्तम २७७०) यांच्यानंतरचा केवळ दुसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे.