Indian House Crows vs Kenyan government केनिया सरकारने २०२४ च्या अखेरपर्यंत मूळ भारतीय वंशांचे (कॉर्वस स्प्लेंडेंस) तब्बल एक दशलक्ष कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते, एक म्हणजे स्थानिक परिसंस्थेवर होणारा लक्षणीय नकारात्मक प्रभाव आणि दुसरे कारण म्हणजे जनतेला होणारा उपद्रव. विशेषतः केनियाच्या किनारी भागात या पक्ष्यांचा उपद्रव जास्त असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या भारतीय वंशांच्या कावळ्यांच्या उपद्रवामुळे पर्यटन, शेती, हॉटेल व्यवसाय यावर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले आहे.
अधिक वाचा: प्राचीन इजिप्शियन स्मशानभूमीत भारतीय माकडे; नवीन पुरातत्त्वीय संशोधन काय सूचित करते?
हे कावळे परदेशी (भारतीय); केनियाच्या परिसंस्थेला त्यांची गरज नाही
केनिया सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, हे कावळे परदेशी (भारतीय) आहेत, केनियाच्या परिसंस्थेला त्यांची गरज नाही किंवा ते तिथे असणे आवश्यक नाही. त्यांची वाढती संख्या मात्र स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शेतीचे नुकसान, हॉटेल्समधील खाद्यपदार्थांवर हल्ला यांमुळे स्थानिक शेतकरी आणि व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. हे कावळे भारत तसेच इतर काही आशियायी देशांमधून शिपिंगद्वारे केनियात पोहोचले आहेत.
स्थानिक परिसंस्थेला धोका
सध्या हे कावळे संपूर्ण केनियात आढळतात. स्थानिक परिसंस्थेतील लुप्त होत असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींना आपले भक्ष्य करतात, त्यांना त्रास देतात. हे कावळे लुप्त होत चाललेल्या स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींची शिकार करतात, घरटी नष्ट करतात, त्यांची अंडी आणि पिल्ले खातात, त्यामुळे स्थानिक पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. ही घसरण स्थानिक परिसंस्थेमध्ये (इकोसिस्टम) व्यत्यय आणत असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. पक्षी कमी झाल्याने कीड आणि कीटक वाढतात. त्यामुळे पर्यावरणाला आणखी हानी पोहोचत आहे. या संदर्भात स्थानिक प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने आपली व्यथा व्यक्त केली, तो म्हणाला, “हे कावळे पिकांना आणि नुकत्याच जन्माला आलेल्या कोंबडीच्या पिल्लांना खातात. त्यामुळे काटेकोर लक्ष ठेवावे लागते. नाहीतर हे कावळे दिवसाला २०-२० पिल्ले घेऊन जातात” असे वृत्त डाऊन टू अर्थने दिले आहे.
पर्यटन व्यवसायाला फटका
केनिया हा पूर्व आफ्रिकेतील हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर असलेला देश आहे. वन्यजीवसृष्टीसाठी पर्यटक या देशाला मोठ्या संख्येने भेट देतात. एकूणच या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावर आधारित आहे. भारतीय वंशाच्या वाढत्या कावळ्यांमुळे पर्यटन व्यवसायालाही चांगलाच फटका बसत आहेत. त्यामुळे केनियाच्या सरकारने यावर्षाखेरीस १० लाख कावळे मारण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीचा प्रयत्न
केनियामध्ये २० वर्षांपूर्वीच्या कावळ्यांची संख्या कमी करण्यासाठी असाच एक प्रयत्न करण्यात आला होता. या प्रयत्नामुळे त्यांची संख्या तात्पुरती कमी झाली होती. १९९९ आणि २००५ दरम्यान, ए रोचा केनिया, या संरक्षण आणि संशोधन संस्थेने केनियाच्या किनारपट्टीवरील मालिंदी या शहरातील कावळे नष्ट करण्यासाठी स्टरीलिसाइज्ड नावाचा एव्हीयन विषप्रयोग केला होता. त्यावेळी ५० टक्के कावळे नष्ट झाल्याचे नोंदविण्यात आले होते. पण केनिया सरकारने नंतर स्टरीलाइज्डच्या आयातीवर बंदी घातली आणि आज हजारोंच्या संख्येने कावळे मालिंदीमध्ये परतले आहेत.
हे कावळे नाहीत, तर आक्रमक कीटक
फर्डिनांड ओमोंडी यांनी २०१५ साली बीबीसी न्यूजसाठी केनियातील भारतीय कावळ्यांच्या उपद्रवावर प्रकाश टाकणारा लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी भारतीय वंशांच्या कावळ्यांना शास्त्रज्ञांनी आक्रमक कीटक म्हटल्याचे नमूद केले आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे हे कावळे आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतात. पर्यटकांच्या ताटातील अन्न हिसकावून घेतात आणि इतर पक्ष्यांच्या प्रजातींवर दादागिरी करतात.
वाढलेला कचरा हेच मूळ कारण
संशोधकांचे म्हणणे आहे की, पूर्व आफ्रिकेत कचरा नियंत्रित करण्यासाठी १८९० च्या आसपास जाणूनबुजून या कावळ्यांना भारत आणि इतर आशियायी देशांमधून आफ्रिकेत आणले गेले. तेव्हापासून त्यांची संख्या वाढली आहे. मूलतः वाढती लोकसंख्या आणि त्यातून तयार होणार कचरा हे या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे. दुर्दैवाने, कावळे फक्त कचरा किंवा उरलेले पदार्थ खात नाहीत तर स्वादिष्ट पदार्थांचेही उपभोक्ते आहेत. बीबीसीच्या रिपोर्टनुसार खाण्याच्या ठिकाणी त्यांचा इतका उपद्रव वाढला आहे की, काही हॉटेल्सनी खासकरून कावळ्यांचा पाठलाग करण्यासाठी लोकांना कामावर ठेवले आहे. फर्डिनांड ओमोंडी यांनी स्पष्टपणे कचरा डम्पिंगवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने कावळ्यांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे.
प्रजननाचा वेग
या समस्येवर काम करणाऱ्या अनेकांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे. या कावळ्यांच्या प्रजननाचा वेग जास्त आहे. त्यामुळे जितक्या कावळ्यांना मारण्यात येते, तितकेच नव्याने काही दिवसांनी दिसतात.
हे कावळे हुशार आहेत
याखेरीज कावळ्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीही अनेक अडचणी आहेत. तज्ज्ञ म्हणतात, की हे कावळे हुशार आहेत आणि सापळे कसे दिसतात, ते लावणारे लोक देखील ते लक्षात ठेवू शकतात. पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे की, कावळ्यांची संख्या कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पक्ष्यांचा अन्नस्रोत कमी करणे. त्यासाठी प्रथम कचरा नियंत्रण करणे आवश्यक आहे. तरीही समस्येचे प्रमाण लक्षणीय आहे. हे पक्षी उत्तरेकडे जिबूतीपर्यंत आणि दक्षिण आफ्रिकेतील डर्बनपर्यंत पसरले आहेत.