राजस्थानच्या बंसवारा येथील प्रचारसभेत रविवारी (२१ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात संपत्तीचे फेरवाटप करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची टीका पंतप्रधानांनी केली. मोदी म्हणाले, “काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येकाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल. माता-भगिनींच्या सोन्याचे मोजमाप होईल आणि नंतर ते मुस्लिमांना वाटले जाईल. काँग्रेस तुमचे मंगळसूत्रही सोडणार नाही.” पंतप्रधानांचे भाषण द्वेषपूर्ण असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदींनी केलेल्या या दाव्यांवरून काँग्रेसने भाजपावर हल्ला चढवला.
देशातील विविध धार्मिक संप्रदायांच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही तपशीलवार किंवा विशिष्ट डेटा उपलब्ध नाही. भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेची (ICSSR) मान्यताप्राप्त संशोधन संस्था ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज’ने २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्टडी रिपोर्ट ऑन इंटर ग्रुप इन इक्वालिटी इन वेल्थ ओनरशिप इन इंडिया’ या अहवालात काही संबंधित डेटा उपलब्ध आहे.
नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) आणि भारतीय आर्थिक जनगणनेद्वारे अखिल भारतीय कर्ज व गुंतवणूक सर्वेक्षण (AIDIS) केले गेले. त्यामधील उपलब्ध माहितीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या अहवालात अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मुस्लिमांमध्ये संपत्तीची सर्वांत कमी मालकी असल्याचे आढळून आले.
भारतात कोणत्या सामाजिक प्रवर्गाकडे किती संपत्ती?
अहवालातील आकडेवारीनुसार, देशातील एकूण संपत्तीपैकी ४१ टक्के संपत्ती हिंदू उच्च जातींच्या मालकीची आहे. हिंदू ओबीसी दुसर्या क्रमांकावर आहेत. ३१ टक्के संपत्ती त्यांच्या मालकीची आहे. मुस्लिमांच्या मालकीची संपती ८ टक्के आहे, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकडे अनुक्रमे ७.३ टक्के आणि ३.७ टक्के संपत्ती आहे.
अहवालानुसार, हिंदू उच्च जातींच्या संपत्तीतील वाटा भारतातील एकूण कुटुंबांच्या तुलनेत जास्त आहे. भारतात एकूण हिंदू उच्च जातींतील कुटुंबांची संख्या- २२.२ टक्के, हिंदू ओबीसी- ३५.८ टक्के, मुस्लीम- १२.१ टक्के, अनुसूचित जाती- १७.९ टक्के व अनुसूचित जातींतील कुटुंबे ९.१ टक्के आहेत.
अहवालात हिंदू उच्च जातींच्या मालकीच्या संपत्तीचे एकूण मूल्य १,४६,३९४ अब्ज रुपये आहे. हे मूल्य अनुसूचित जमातींकडे असणार्या मालकी संपत्तीच्या तुलनेत जवळपास ११ पट जास्त आहे. अनुसूचित जमातींकडे १३,२६८ अब्ज रुपये इतकी संपत्ती आहे, तर मुस्लिमांकडे २८,७०७ अब्ज रुपयांची संपत्ती आहे.
सध्याच्या किमतींवर आधारित सामाजिक प्रवर्गाच्या मालकीची एकूण संपत्ती (रु. अब्जांमध्ये)
प्रति कुटुंब संपत्ती मालकीचे चित्र काय?
हिंदू उच्च जातींमध्ये सरासरी कौटुंबिक संपत्ती सर्वाधिक असल्याचे या अहवालात आढळून आले. हिंदू उच्च जातींमध्ये सरासरी कौटुंबिक संपत्ती २७.७३ लाख रुपये, तर हिंदू ओबीसींमध्ये १२.९६ लाख रुपये आहे. मुस्लीम कुटुंबांमधील सरासरी संपत्ती ९.९५ लाख रुपये, तर अनुसूचित जातींमध्ये ती ६.१३ लाख रुपये आणि अनुसूचित जमातींमध्ये ६.१२ लाख रुपये इतकी असल्याचे अहवालात आढळून आले आहे.
सध्याच्या किमतींवर आधारित भारतातील सामाजिक प्रवर्ग-धार्मिक गटांच्या मालकीची सरासरी कौटुंबिक संपत्ती (रु. मध्ये)
कोणत्या सामाजिक प्रवर्गाकडे सर्वाधिक सोने?
अभ्यासानुसार, हिंदू ओबीसींकडे सोन्याचा सर्वाधिक वाटा आहे. हिंदू ओबीसींकडे ३९.१ टक्के, हिंदू उच्च जातींकडे ३१.३ टक्के, मुस्लिमांकडे ९.२ टक्के सोन्याचा वाटा आहे; तर अनुसूचित जमातींकडे केवळ ३.४ टक्के सोन्याचा वाटा असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
हेही वाचा : समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?