Varuna in mythology: भारतीय नौदलाच्या बोधचिन्हावरील ब्रीदवाक्य “शं नो वरुणः” हे ऋग्वेदातील श्लोकांवर आधारित आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की, वरुण देव आमच्यासाठी शांतता आणि कल्याण निर्माण करो. नौदलाने या वाक्याच्या माध्यमातून जलाचा नियंत्रक आणि सागरी मार्गदर्शक असलेल्या वरुण देवतेचा सन्मान केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौदल प्रमुखांचे बोधचिन्ह ठरवताना सी. गोपालचारी यांनी हे ब्रीदवाक्य सुचवले होते. (चक्रीवर्ती राजगोपालाचारी हे राजाजी किंवा सी. आर. म्हणून ओळखले जात. तसेच मुथारिग्नार राजाजी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. हे एक भारतीय राजकारणी, लेखक, वकील आणि स्वातंत्र्यसैनिक होते. राजगोपालाचारी हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. १९५० साली भारत प्रजासत्ताक झाल्यावर हे पद रद्द करण्यात आले.)

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: Indian Navy Day 2024: १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारणारे ऑपरेशन ट्रायडंट काय होते? त्याचा नौदल दिनाशी काय संबंध?

वेदांमध्ये वरुणाला जलाचा देव, नैतिक नियमांचा रक्षक आणि समुद्राच्या संरक्षणाचा प्रतीक मानले गेले आहे, ज्याचा उल्लेख विविध वैदिक आणि पौराणिक ग्रंथांमध्ये आढळतो. आज साजरा होत असलेल्या भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने नौदलासाठी वरुणालाच का साकडे घालण्यात आले, याचाच घेतलेला हा शोध.

वरुण आणि वरुणी (विकिपीडिया)

वेदांतील वरुणाचे महत्त्व

वेदांमध्ये वरुणाला जलाचा नियंत्रक मानले गेले आहे. तो महासागर, नद्या आणि सागरी प्रवाह यांचा संरक्षक आहे. त्या काळातील नाविकांनी वरुणाला मार्गदर्शक मानले, जो समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या जलपोतांना आणि जलरथांना योग्य दिशा दाखवतो. ऋग्वेदामध्ये हिरण्यपक्ष या सुवर्णपंख असलेल्या पक्ष्याचा उल्लेख वरुणाचा दूत म्हणून केलेला आढळतो. वरुणाला नैतिक नियमांचे आणि सत्याचे अधिपती मानले जाते. ऋग्वेदातील अनेक ऋचांमध्ये वरुणाला असूर वर्गात समाविष्ट केलेले असले तरी नंतर त्याला देव म्हणून मान्यता मिळाली. त्याच्या सागरी ज्ञानामुळे भारतीय नौदलासाठी वरुणाचे हे ब्रीदवाक्य अत्यंत समर्पक आहे.

पुराणांमधील वरुण

पुराणांमध्ये वरुणाला दिशांचा रक्षक (दिक्पाल) मानले गेले आहे, तो पश्चिम दिशेचे रक्षण करतो. त्याचे वाहन मगर (मकर) आहे; त्याच्या हातात पाश आणि पाण्याचा कलश असतो. वरुणाच्या अनेक पत्नी होत्या आणि वसिष्ठासारख्या ऋषींचे पितृत्वही त्याने केले आहे. जैन धर्मग्रंथ, तोल्काप्पियम या तामिळ ग्रंथांमध्ये आणि जपानी बौद्ध पौराणिक कथांमध्येही वरुणाचा उल्लेख आढळतो. तोल्काप्पियममध्ये वरुणाला समुद्र आणि पावसाचा देव म्हटले आहे, तर जपानी बौद्ध धर्मात त्याला ‘सुईतेन’ म्हणून ओळखले जाते.

जपानी वरुण

उपनिषद आणि वैदिक ग्रंथांतील वरुण

उपनिषदांमध्ये वरुणाला ज्ञानाचा देव म्हटले आहे. तैत्तिरीय उपनिषदात वरुणाला ‘वरुणी’ म्हणून ओळखले जाते. वरुणीने भृगू ऋषींना ब्रह्मज्ञान शिकवले, ज्याचा उल्लेख ‘भृगु-वरुणी विद्या’ या नावाने प्रसिद्ध आहे. यजुर्वेदात वरुण आणि विष्णू यांना समान मानले गेले आहे, ज्यातून वरुणाची देवांमधील भूमिका स्पष्ट होते. बृहदारण्यक उपनिषदात वरुणाला पश्चिम दिशेचा देव मानले आहे.

रामायणातील वरुण

रामायणामध्ये वरुणाचा उल्लेख विशेषतः रामाच्या समुद्र पार करण्याच्या प्रसंगात येतो. लंकेला जाण्यासाठी रामाने तीन दिवस-रात्र वरुणाची प्रार्थना केली. वरुणाने प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे राम संतापला आणि समुद्र आटवून पार करण्याचा विचार केला. रामाचा संताप पाहून वरुण प्रकट झाला आणि नम्रतेने रामाला शांत केले. त्याने रामाला आश्वासन दिले की, पूल बांधण्यात कोणताही अडथळा तो आणणार नाही. रामायणातील हा प्रसंग वरुणाच्या सामर्थ्य आणि संतुलित दृष्टिकोनाचा उत्कृष्ट नमुना आहे. या कथेच्या अनेक आवृत्त्यांमध्ये वरुणाच्या जागी समुद्र देवाचा उल्लेख येतो.

वरुण आणि राम (विकिपीडिया)

सिंधी हिंदू आणि झूलेलाल

सिंधी हिंदू वरुणाला झूलेलालचा अवतार मानतात. त्यांनी अत्याचारी मुस्लिम शासक मीरखशाह यांच्या जुलुमांपासून त्यांचे रक्षण करावे यासाठी वरुणाला प्रार्थना केली होती. वरुण वृद्ध योद्धा उदेरोलाल या रूपात प्रकट झाला आणि धर्मस्वातंत्र्याचा संदेश दिला. सिंधी हिंदू चेटी चांद हा सण झूलेलालच्या सन्मानार्थ साजरा करतात. झूलेलाल केवळ हिंदूंसाठी नव्हे तर मुस्लिम सूफी अनुयायांसाठीही आदरणीय आहेत, ज्यांना “ख्वाजा खिजीर” म्हणून ओळखले जाते.

अधिक वाचा: Indian Navy Day 2024: छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक का मानले जाते?

शं नो वरुणः

भारतीय नौदलाने “शं नो वरुणः” हे ब्रीदवाक्य स्वीकारून जलसुरक्षा, नैतिकता आणि सागरी मार्गदर्शनासाठी वरुण देवतेचा आदर्श घेतला आहे. वरुण हा फक्त वैदिक देव नसून, तो विविध धर्म आणि संस्कृतींमध्ये सन्मानित आहे. भारतीय नौदलासाठी, वरुणाचे हे प्रतीक जलदर्शन आणि कर्तव्याच्या प्रतिकात्मक मार्गदर्शकाचा आधार ठरते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian navy day 2024 why did the indian navy adopt the slogan sham no varuna who is varun svs