२०२४ साली भारतात पंतप्रधानपदाची, तर अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. जगातील एक महत्त्वाची महासत्ता असल्यामुळे अमेरिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचेच लक्ष असते. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी आहेत. भारतासाठी ही एक भूषणावह बाब आहे. आता २०२४ साली होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती भाग घेणार का? असे विचाले जात होते. असे असतानाच आता रिपब्लिकन पक्षाचे हर्षवर्धन सिंह हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सिंह कोण आहेत? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? हे जाणून घेऊ या…
भारतीय वंशाचे हर्षवर्धन सिंह हे २०२४ साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरणार आहेत. २८ जुलै रोजी त्यांनी रिपब्लिकन पक्षाकडून निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले आहे. रिपब्लिकन पक्षाकडून निक्की हॅली आणि विवेक रामास्वामी हे आणखी दोन भारतीय वंशाचे उमेदवार राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.
“सध्या अमेरिकेला आणखी चांगल्या राष्ट्राध्यक्षाची गरज”
हर्षवर्धन सिंह हे स्वत: रिपब्लिकन पक्षाचे खंदे समर्थक असल्याचे सांगतात. ते ‘अमेरिकन फस्ट’ या धोरणाचा पुरस्कार करतात. आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या समाजमाध्यमावर एक चित्रफित प्रदर्शित केली. या चित्रफितीत त्यांनी कोरोना काळातील लसीकरण मोहिमेवर टीका केली. तसेच अमेरिकेत भ्रष्टाचार वाढला आहे, आपल्याला एक प्रभावी नेतृत्व हवे आहे, मागील काही वर्षांत चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत; हे नुकसान भरून काढण्यासाठी मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे सिंह आपल्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. यासह डोनाल्ड ट्रम्प हे माझ्या आयुष्यातील सर्वांत चांगले आणि सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष होते. मात्र, सध्या अमेरिकेला आणखी चांगल्या राष्ट्राध्यक्षाची गरज आहे, असेही सिंह आपल्या या चित्रफितीत म्हणताना दिसत आहेत.
हर्षवर्धन सिंह कोण आहेत?
हर्षवर्धन सिंह हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांनी न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून २००९ साली इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे. कोरोना लसीकरणाच्या ते विरोधात होते. याच कारणामुळे ते स्वत:ला ‘शुद्ध रक्ताचा एकमेव माणूस’ असे म्हणतात. त्यांनी अभियंता आणि फेडरल कॉन्ट्रॅक्टर म्हणून नोकरी केलेली आहे. कन्झरव्हेटिव्ह, उदारमतवादी, भारतीय, फिलिपिनो, हिस्पॅनिक, अमेरिकेचे कृष्णवर्णीय नागरिकांचा पाठिंबा आहे, असा दावा त्यांच्या संकेतस्थळावर करण्यात आलेला आहे. हर्षवर्धन सिंह हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले असले तरी त्यांनी हा निर्णय बराच उशिरा घेतल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत त्यांची माध्यमांनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली नाही.
भारतीय वंशाच्या लोकप्रतिनिधींचा मोदींकडून उल्लेख
सध्या अमेरिकेत भारतीय वंशाचे अनेक नागरिक आहेत. मागील काही दिवसांपासून या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. हर्षवर्धन सिंह हे देखील याचाच एक भाग आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वाढत्या महत्त्वाकांक्षेचा अलीकडच्या अमेरिका भेटीत उल्लेखही केला होता. अमेरिकन काँग्रेसमध्ये बोलताना त्यांनी ‘समोसा कॉकस’चा संदर्भ दिला होता. समोसा कॉकस हा शब्द अनौपचारिकरित्या अमेरिकन काँग्रेसमधील भारतीय वंशाच्या लोकांसाठी वापरला जातो.
नरेंद्र मोदींनी दिला कमला हॅरिस यांचा संदर्भ
“भारताशी भावबंध असलेले अमेरिकेत लाखो लोक आहेत. यातील काही लोक अभिमानाने लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. माझ्या मागेच यातील एक व्यक्ती बसलेली आहे. त्यांनी अमेरिकेत इतिहास रचला आहे”, असे मोदी म्हणाले होते. नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याबद्दल बोलत होते. कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. सध्या अमेरिकन काँग्रेसमध्ये भारताशी नाळ असलेले एकूण पाच लोकप्रतिनिधी आहेत; तर सहाव्या कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. हे सर्व लोकप्रतिनिधी डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत.
भारतीय वंशाच्या उमेदवाराला किती मते मिळणार?
फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने एका अहवालाचा दाखला देत एक वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तानुसार अमेरिकेतील भारतीय वंशाचे बहुतांश नागरिक हे डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या भारतीय वंशाच्या उमेदवाराला अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांची किती मते मिळणार हा एक प्रश्नच आहे. सिंह हे सातत्याने स्वत:च्या भारतीय वंशाचा उल्लेख करत असतात.
हर्षवर्धन सिंह निवडून येण्याची शक्यता काय?
हर्षवर्धन सिंह हे पहिल्यापासूनच वेगवेगळ्या संधींसाठी धडपडताना दिसलेले आहेत. २०१७ आणि २०२१ साली त्यांनी न्यू जर्सी येथील गव्हर्नर पदासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर सिनेटमध्ये जागा मिळावी यासाठी २०२० साली प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेले नाही. निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्या, निवडणुका यावर लक्ष ठेवणाऱ्या अमेरिकन वेबसाइट ‘फाइव्हथर्टीएट’च्या म्हणण्यानुसार जुलै २०२३ पर्यंत रिपब्लिकन पक्षाला मत देणाऱ्या साधारण ५२ टक्के लोकांचा पाठिंबा डोनाल्ड ट्रम्प यांना आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डेसॅन्टिस हे आहेत. त्यांना साधारण १५ टक्के मतदारांचा पाठिंबा आहे. रामास्वामी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना रिपब्लिकन पक्षाला मत देणाऱ्या साधारण ६.८ मतदारांचा पाठिंबा आहे.
रिपब्लिकन पक्ष आपला उमेदवार कधी जाहीर करणार आहे?
रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेदेखील या शर्यतीत आहेत. सध्या ट्रम्प यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. तरीदेखील ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत. येत्या १५ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जाणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे.
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे पुन्हा जो बायडेन?
या अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाचे इतर नेते आपल्या आवडीच्या नेत्याच्या नावाने मतदान करणार आहेत. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवाराची निवड करणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षातही हीच पद्धत राबवली जाणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षातर्फे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.