वजन वाढविण्यासाठी किंवा शरीर पिळदार करण्यासाठी हल्ली प्रोटीन शेक घेण्याचा पर्याय निवडला जातो. प्रोटीन शेकमुळे लंडनमधील रोहन गोधनिया या १६ वर्षीय मुलाचा १८ ऑगस्ट २०२० साली मृत्यू झाला होता. त्यानंतर आता युके कोरोनर यांनी प्रोटीन शेकवर आरोग्यासंबंधी इशारा छापावा, असे आवाहन केले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये प्रोटीन शेक घेतल्यानंतर तीन दिवसांनी वेस्ट मिडलसेक्स रुग्णालयात रोहन गोधनीयाचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण ब्रेन डॅमेज असल्याचे सांगण्यात आले. रोहन गोधनियाला नेमका कोणता आजार झाला होता? आणि प्रोटीन शेक धोकादायक आहे का? याबद्दल घेतलेला हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहनचा मृत्यू कसा झाला?

मेट्रो वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, रोहनचे वडील पुष्पा यांनी मुलासाठी प्रोटीन शेक विकत घेतले होते. रोहन खूप हडकुळा असल्यामुळे त्याचे वजन वाढावे, अशी वडीलांची इच्छा होती. या इच्छेखातर त्यांनी बाजारातून प्रोटीन शेकची खरेदी केली. “आम्हाला वाटले जर त्याचे स्नायू बळकट झाले तर त्याची उंची वाढायला मदत होईल”, अशी प्रतिक्रिया पुष्पा यांनी दिली. ‘मायलंडन’शी बोलत असताना पुष्पा म्हणाले की, शेक घेतल्यानंतर तो ठिक होता, पण दुपारचे जेवण झाल्यानंतर रोहनने पोटात दुखत असल्याची तक्रार केली. संध्याकाळी त्याला उलट्या सुरू झाल्या आणि सतत उलट्या होत होत्या.

मेट्रोने दिलेल्या बातमीनुसार, रोहनच्या कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी रुग्णालयात धाव घेतली. रोहनचा सीटी स्कॅन काढला असता त्याच्या मेंदूला सूज आल्याचे दिसले. न्युरोलॉजिस्ट यांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला, रोहनच्या हितासाठी असे करणे योग्य नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. १८ ऑगस्ट २०२० मध्ये रोहनचा मृत्यू झाला.

हे वाचा >> Proteins supplements घेणे फायदेशीर असते का? याचे सेवन कधी आणि किती प्रमाणात करणे योग्य असते?

प्रोटीन शेकमुळे रोहनच्या शरीरात ऑर्निथिन ट्रान्सकार्बामायलेजची (OTC) कमतरता निर्माण झाली. हा एक अनुवांशिक आजार असून या आजारामुळे शरीरातील अमोनियाची प्रक्रिया मंदावते. अमोनियाची प्रक्रिया मंदावल्यामुळे रक्तप्रवाहातील अमोनियाचे विघटन थांबते. आउटलेट वेबसाईटने सांगितले की, रोहनच्या मृत्यूचे कारण त्यावेळी समजू शकले नव्हते कारण मेंदू मृत झाल्यानंतर त्याचे अवयव दान करण्यात आले होते. ज्याला अवयव दान करण्यात आले, त्यांनाही वर्षभरात झटके येऊ लागल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

रोहनच्या मृत्यूनंतर कोरोनरने त्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन मृत्यूसाठी प्रोटीन शेक जबाबदार असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी प्रोटीनच्या पाकिटावर वैधानिक इशारा द्यावा, असे सूचविले आहे. कोरोनर टॉम ओसबोर्न यांनी बीबीसीला माहिती देताना सांगितले की, प्रोटीन शेकबद्दल मला काळजी वाटते. माझे प्राथमिक मत आहे की, नियामक मंडळांना पत्र लिहून प्रोटीनच्या पाकिटावर यासंबंधी वैधानिक इशारा देण्याची गरज आहे. ओटीसी ही जरी दुर्मिळ स्थिती असली तरी जर कुणी प्रोटीन शेक घेतला तरी त्याचे हानिकारक प्रभाव दिसू शकतात आणि प्रोटीनची पातळी अचानक वाढू शकते.

लंडनमध्ये एखाद्या व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कोरोनरला नेमले जाते.

प्रोटीन ड्रिंक्स अपायकारक आहेत?

टाइम्स नाऊच्या माहितीनुसार, प्रोटीन पावडर वनस्पती (सोयाबिन, कडधान्य, तांदूळ, बटाटे), अंडी आणि दूधापासून तयार करण्यात येते. बरेच लोक स्नायूंना बळकटी देण्यासाठी आणि शरीर पिळदार बनविण्यासाठी प्रोटीन शेक किंवा प्रोटीन पावडर घेणे पसंत करतात. आहारतज्ज्ञ कॅथी मॅकमॅनस म्हणाल्या की, मी शक्यतो प्रोटीन पावडर घेण्याची शिफारस करत नाही. जरी कुणाला प्रोटीन पावडर घ्यायचीच असेल तर डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी.

वॉशिंग्टन विद्यापीठातून स्पोर्ट्स मेडिसिन आणि ह्युमन परफॉर्मन्समध्ये शिक्षण घेतलेल्या जॅन ॲनीगन यांनी विकेंड डॉट कॉमला दिलेल्या माहितीनुसार, प्रोटीन पावडरमुळे एलर्जी होणे, पचन क्रिया बिघडणे, अवयवांचे नुकसान होणे, विषारी रसायनांचा धोका उद्भवणे, लठ्ठपणा वाढणे आणि काही प्रसंगी कुपोषणाची समस्या उद्भवते.

हे वाचा >> वजन करण्यासाठी High Protein घेतल्याने तुमची किडनी निकामी होऊ शकते; दिवसाला किती प्रोटीन घ्यावे? जाणून घ्या

जॅन ॲनीगन पुढे म्हणाल्या की, तुम्ही प्रोटीन शेकचा प्रमाणात वापर करत असाल तरी तुमच्या आरोग्यासाठी ते हानीकारक आहे. प्रोटीन तुमच्या शरीराला मानवले आहेत की नाही, हे तुमच्या शरीरशास्त्रावर ठरते. प्रोटीन शेक किंवा पावडरचा प्राथमिकदृष्ट्या तुम्हाला काही अडचण वाटत नसली तरी अशा शेकमुळे शरीरात विषारी रसायनांचा शिरकाव होतो, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

बीबीसीने २०२० साली नेचर मेटाबॉलिजम या जर्नलमध्ये आलेल्या एका अभ्यासाचा हवाला दिला होता, एका उंदराला प्रमाणापेक्षा अधिक प्रथिने देण्यात आले. उच्च प्रोटीन आहारामुळे त्याच्या धमन्यांमध्ये इतरांच्या तुलनेत प्लेग होण्याची संभावना ३० टक्क्यांनी वाढली होती. काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, प्रोटीन शेकमुळे सामान्य लोकांना कोणताही फायदा होत नाही. बीबीसीने आहारतज्ज्ञ स्टुअर्ट फिलिप्स यांना या विषयावर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, जर कुणी व्यक्ती अतिरिक्त प्रोटीन घेत असेल आणि आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा व्यायाम करत असेल तर त्याला याचा कमी फायदा होईल, जर एखादी व्यक्ती प्रोटीन घेऊन आठवड्यातून चार ते पाच वेळा व्यायाम करत असेल तर त्याला याचा थोडासा फायदा होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian origin teen rohan rohan godhania dies after having protein shake in uk are protein shakes dangerous kvg
Show comments